
सोलापूर : एसटी स्टॅंडसमोरील अनिल कॉटेज येथे शहर पोलिसांनी छापा टाकला. त्या वेळी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकातील पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात घेतले.
हॉटेल अमृततुल्यजवळील अनिल कॉटेज येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी मंगळवारी (ता. 24) सापळा रचून छापा टाकला. त्या ठिकाणी सोलापुरातील दोन महिला पोलिसांना आढळल्या. त्यांच्याकडे विचारपूस केल्यानंतर त्यांनी विकी ऊर्फ विक्रम याने आम्हाला बोलावल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी विक्रम ऊर्फ विकी महादेव पवार (रा. वसंत विहार), गिरीश अनिल पवार (मुरारजी पेठ), मोहसीन सरदार तांबोळी (निराळे वस्ती) व सुतार या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे यांच्या पथकाने केली. दरम्यान, महिलांना डांबून त्यांची शारीरिक पिळवणूक करून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचेही पोलिस आयुक्तालयाकडून सांगण्यात आले.
रिक्षातून चोरी करणाऱ्या तीन महिलांना पकडले
मित्रनगर, शेळगी येथून सराफ बाजारात रिक्षातून जात असताना वाटेत तीन अनोळखी महिला रिक्षात बसल्या. मंगळवार बाजार परिसरात गर्दी असल्याने रिक्षाचा वेग कमी झाला होता. त्या वेळी त्या महिलांनी ढकलाढकली करत नजर विचलित केली. त्यानंतर त्यांनी हिसका मारून दागिने असलेली पिशवी घेऊन पलायन केले, अशी फिर्याद शाहेद फरीद शेख यांनी जेलरोड पोलिसांत दिली.
तत्पूर्वी, शेख यांनी आरडाओरड सुरू करत त्यांचा पाठलाग केला. नागरिकांच्या मदतीने ममता संभाजी भोसले, सविता विनोद भोसले, लक्ष्मी शिवाजी भोसले (रा. साई नगर, अक्कलकोट रोड) या तिघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
एमआयडीसी परिसरातून चोरट्यांकडून शेळीची चोरी
एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आदर्श नगर (लक्ष्मी नारायण टॉकीज परिसर) येथील दीपक भगवान पवार यांच्या घरासमोरील शेळी चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद पवार यांनी एमआयडीसी पोलिसांत दिली. दोन व्यक्ती, एक महिला आणि एक लहान मुलगा सोबत असलेल्यांनी पाच हजार रुपयांची शेळी चोरल्याचेही पवार यांनी पोलिसांना सांगितले. फिर्यादीच्या सांगण्यानुसार पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
घराच्या कारणावरून मारहाण
अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील नीलमनगर (राजरत्न नगर) या ठिकाणी राहणारे मल्लेशाम हनमंतू गोरंटला यांना किरकोळ कारणावरून मारहाण केल्याप्रकरणी नरेश म्याकल याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. गोरंटला हे दुचाकीवरून कामाला जात असताना नरेश म्याकल याने नीलमनगर चौकात दुचाकी अडविली. त्यावेळी, तू मला घर खाली कर का म्हणाला, असा जाब विचारला. त्या वेळी काहीही न बोलता दुचाकी घेऊन पुढे गेल्यानंतर म्याकल याने पाठलाग केला. गाडी थांबवून जवळील लोखंडी सळई डोक्यात मारून जखमी केल्याचेही गोरंटला यांनी पोलिसांना सांगितले. त्यानुसार म्याकलविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बसमध्ये चढताना मोबाईलची चोरी
लिमयेवाडी येथील ओंकार बाळकृष्ण जाधव हे पुण्याला जाण्यासाठी सोलापूर बस स्थानकावर आले. पुण्याला जाणारी बस स्थानकात आल्यानंतर बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने खिशातील मोबाईल लंपास केला. मोबाईल चोरी झाल्याचे समजातच जाधव यांनी फौजदार चावडी पोलिस ठाणे गाठले. स्थानक परिसरातील सीसीटिव्हीचा आधार घेत पोलिस चोरट्याचा शोध घेत आहेत.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.