घर फोडून पावणेचार लाख रुपयांची चोरी ! वाचा सोलापुरातील गुन्हेगारी वृत्त 

तात्या लांडगे 
Monday, 30 November 2020

विजयपूर रोडवरील विजयनगर सोसायटीतील घर फोडून चोरट्याने पावणेचार लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. सुहास नारायण जोशी (रा. विजय सोसायटी, दंतकाळे हॉस्पिटलमागे) यांनी विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली. 

सोलापूर : विजयपूर रोडवरील विजयनगर सोसायटीतील घर फोडून चोरट्याने पावणेचार लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. सुहास नारायण जोशी (रा. विजय सोसायटी, दंतकाळे हॉस्पिटलमागे) यांनी विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली. दरम्यान, घरातील सर्वजण जेवण करून दरवाजा बंद करून झोपले. त्या वेळी घराचा दरवाजा उघडून चोरट्याने घरात प्रवेश केला. जोशी यांच्या घरातून पावणेचार लाखांचे दागिने लंपास केले. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक श्री. बेंबडे हे करित आहेत. 

वाहनचालकांना 15 लाखांचा दंड 
शहरात विनामास्क वाहन चालविणाऱ्यांसह कागदपत्रे नसतानाही वाहने चालविणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध पोलिसांनी कारवाईची मोहीम उघडली आहे. 17 ऑगस्टपासून पोलिसांनी शहरातील विविध मार्गांवर ही कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत सुमारे 15 हजार बेशिस्त वाहनचालकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. त्यात त्यांच्याकडून शहर पोलिसांनी 15 लाख 20 हजारांचा दंड वसूल केला आहे. 

आयुक्‍तांच्या आदेशाला कर्मचाऱ्यांचीच बगल 
शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा या हेतूने महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणाऱ्यांसह मास्क न घालणारे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश सफाई अधीक्षकांना दिले आहेत. त्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळही देण्यात आले आहे. तत्पूर्वी, आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी मास्क न घालणाऱ्यांना पाचशे रुपयांचा दंड करण्याचे आदेश देऊनही काहीजणांकडून शंभर रुपये तर काहीजणांकडून पाचशे रुपयांचा दंड घेतला जात असल्याचे चित्र आहे. 

मुलीच्या विवाहासाठी गेल्यावर घरफोडी 
मुलीचा विवाह परगावी असल्याने सर्वजण घर बंद करून गेले होते. लक्ष्मीनारायण बिल्डिंग, बुधवार पेठ, सोलापूर येथील घरात चोरट्याने चोरी केली. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून त्यांच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. गोविंद लक्ष्मीनारायण राठी, नीलेश बालमुकुंद असावा, नंदकिशोर बालमुकुंद असावा असे गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

फिर्यादी दत्तात्रय शंकरराव दंडगल यांच्या मुलीचा विवाह 22 नोव्हेंबर रोजी हैदराबाद येथे होता. त्यांच्या कुटुंबातील सर्वजण हैदराबादला गेले होते. विवाह उरकून सर्वजण पहाटे दोन वाजता घरी आले. त्या वेळी पार्किंगमध्ये लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा गायब असल्याचे त्यांनी पाहिले. त्यानंतर ते घरात गेले आणि "डीव्हीआर' सीसीटीव्ही फुटेज पाहिले. त्यावेळी चेहऱ्यावर मास्क लावून चौथ्या मजल्यावरील खोलीचे कुलूप तोडून चोरटे घरात आल्याचे दिसले. त्यानंतर चोरट्यांनी घरातील दागिन्यांसह टीव्ही, सायकल, लोखंडी टेबल, खुर्च्यांसह इलेक्‍ट्रॉनिक टूलबॉक्‍स, सोफासेट, शैक्षणिक कागदपत्रे, प्रिंटर, स्कॅनर, दोन हजार शंभर रुपये रोख, ड्रॉइंग किट, दोन पासपोर्ट फोटो, असा मुद्देमाल चोरून नेला, असेही दंडगल यांनी पोलिसांना सांगितले. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. भोईटे हे करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime news in and around Solapur city