
शहरातील गोवंशाची अवैध वाहतूकप्रकरणी विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल असलेल्या लाल अहमद महिबूबसाब कुरेशी (रा. कुरेशी गल्ली, शुक्रवार पेठ) याला पोलिसांनी एका वर्षासाठी तडिपार केले आहे. तत्पूर्वी, जेलरोड पोलिसांनी कुरेशीविरुद्ध तडिपारीचा प्रस्ताव पोलिस उपायुक्त, परिमंडळ यांच्याकडे पाठविला होता.
सोलापूर : शहरातील गोवंशाची अवैध वाहतूकप्रकरणी विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल असलेल्या लाल अहमद महिबूबसाब कुरेशी (रा. कुरेशी गल्ली, शुक्रवार पेठ) याला पोलिसांनी एका वर्षासाठी तडिपार केले आहे. तत्पूर्वी, जेलरोड पोलिसांनी कुरेशीविरुद्ध तडिपारीचा प्रस्ताव पोलिस उपायुक्त, परिमंडळ यांच्याकडे पाठविला होता. त्यानुसार पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर, सहाय्यक पोलिस आयुक्त कमलाकर ताकवले यांच्या मार्गदर्शनाखाली जेलरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वनाथ सिद, सहायक पोलिस निरीक्षक एस. एस. पवार, संजय क्षीरसागर, सैफन जमादार यांनी कुरेशीला कलबुर्गी (कर्नाटक) येथे सोडले.
रिक्षा अपघातात तरुणाचा मृत्यू
मुलास बरोबर घेऊन दुसऱ्या पत्नीकडे जेवायला जाताना एका वाहनाने रिक्षास धडक दिली. त्यात मुलगा यल्लप्पा बाबू केंगार (वय 40) हा गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची फिर्याद बाबू कामण्णा केंगार (रा. गरिबी हटाव झोपडपट्टी नं. दोन, हनुमान मंदिराजवळ, आम्रपाली चौक) यांनी विजापूर नाका पोलिसांत दिली. तत्पूर्वी, बाबू केंगार हे (एम. एच. 13/सी. टी. 1893) या रिक्षातून पहिली पत्नी मल्लव्वाकडे जेवायला निघाले होते. हत्तूरजवळ एका वाहनाने त्यांच्या रिक्षाला जोरात धडक दिली. या अपघातात रिक्षाचे नुकसान झाले, तर त्यांचा मुलगा यल्लप्पा हा गंभीर जखमी झाला. त्यानंतर यल्लप्पाचा मृत्यू झाल्याचेही बाबू केंगार यांनी पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलिस नाईक श्री. पाडवी हे पुढील तपास करीत आहेत.
गाडीत चार्जिंगला लावलेला मोबाईल चोरट्याकडून लंपास
मुर्ठी (ता. बारामती) येथील सचिन बाळू जगदाळे हे वैष्णवी नगरातील त्यांच्या सासरी भेटून मित्राच्या चुलत्याला भेटण्यासाठी गेले. त्यांनी गुरुदेवदत्त नगर येथे चारचाकी वाहन लावले. त्या वेळी जगदाळे यांनी त्यांच्याकडील मोबाईल गाडीतच चार्जिंगला लावला होता. चोरट्याने ही संधी साधून गाडीतील मोबाईल चोरून नेल्याची फिर्याद जगदाळे यांनी विजापूर नाका पोलिसांत दिली. मोबाईलची अंदाजित किंमत 30 हजार रुपये होती, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलिस नाईक श्री. गायकवाड हे चोरट्याचा तपास करीत आहेत.
संपादन : श्रीनिवास दुध्याल