बनावट जात प्रमाणपत्रप्रकरणी फेटाळला शिवसिद्ध बुळ्ळाचा जामीन ! वाचा सोलापुरातील गुन्हेगारी वृत्त

Solapur Crime
Solapur Crime

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांना बनावट जात प्रमाणपत्र दिल्याच्या संशयातून न्यायालयीन कोठडीतील शिवसिद्ध बुळ्ळा याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. 

खासदार डॉ. नुरंदस्वामी गुरुबसय्या हिरेमठ तथा जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांनी उमरगा तहसील कार्यालय व अक्‍कलकोट तहसीलमधील तत्कालीन अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांनी संगमत करून बेडा जंगम जातीचे (अनुसूचित जाती) बनावट जात प्रमाणपत्र बनवून घेतले. ते खोटे प्रमाणपत्र असल्याचे माहीत असतानाही त्या खोट्या प्रमाणपत्राचा दुरुपयोग करून डॉ. महास्वामींनी त्याचा उपयोग 2019 च्या लोकसभा निवडणुकीत केला. शासकीय व आर्थिक लाभ मिळविण्याच्या हेतूने शासनाची फसवणूक केल्याची फिर्याद प्रभारी तहसीलदार बाळासाहेब शिरसट यांनी न्यायालयात दिली. त्यानुसार या प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. 

पोलिसांनी यातील संशयित बुळ्ळा याला ताब्यात घेतले आणि न्यायालयाने त्यास पोलिस कोठडी ठोठावली. आता बुळ्ळा न्यायालयीन कोठडीत असून त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, या प्रकरणातील तपास अजून संपलेला नसून इतर संशयित आरोपींचा शोध घेणे सुरू आहे, असा युक्‍तिवाद सरकार पक्षाकडून करण्यात आला. या प्रकरणात सरकारतर्फे ऍड. पंडित जाधव यांनी काम पाहिले. 

चोरट्याने लांबविला महागडा मोबाईल 
राघवेंद्र नगरातील संदीप संभाजी कदम हे शुक्रवारी (ता. 19) मंगळवार पेठेतील सराफ बाजारात पूजेसाठी साहित्य खरेदी करीत होते. त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्याने रात्री सातच्या सुमारास त्यांच्या खिशातील 70 हजार रुपयांचा महागडा मोबाईल लंपास केला. त्यानंतर त्यांनी जोडभावी पेठ पोलिसांत तक्रार दिली असून पोलिस नाईक श्री. बर्डे हे पुढील तपास करीत आहेत. 

गोडाऊनमधील साउंड, फोकसची चोरी 
थोबडे नगरातील अवंती नगरलगत असलेल्या गोडाऊनमधून कामगारानेच सहा साउंड व एक फोकस चोरी केल्याची फिर्याद नितीन भगवान भांगे (रा. मुरारजी पेठ, निराळे वस्ती) यांनी फौजदार चावडी पोलिसांत दिली आहे. त्यानुसार संशयित पवन साठे याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तत्पूर्वी, सावळेश्‍वर (ता. मोहोळ) येथील श्रीनाथ कुंभार याने भांगे यांची भेट घेऊन सांगितले की, साठे याने त्याच्याकडील फोकस आणि साऊंउ विकत घेतो का म्हणून मला फोन केला होता. त्यानंतर भांगे यांनी गोडाऊनमध्ये जाऊन खात्री केल्यानंतर साउंड व फोकस चोरीला गेल्याची त्यांना खात्री पटली. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस नाईक श्री. शेख हे करीत आहेत. 

बनावट ले-आउटप्रकरणी राजकुमार मेश्रामचा जामीन फेटाळला 
महापालिकेचे नगररचना विभागातील कंत्राटी आवेक्षक राजकुमार मेश्राम याचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. डी. खेडेकर यांनी फेटाळला. त्याच्याविरुद्ध यापूर्वीच सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील यासिन मोतीवाला, रफिक मोतीवाला, वसीम मोतीवाला (रा. समर्थ नगर, उत्तर सदर बझार) यांनी त्यांची जागा विकसित करण्यासाठी महापालिकेच्या नगररचना विभागाकडून प्राथमिक ले-आउट मंजूर करून घेतला. 17 जानेवारी 2016 ते 27 ऑक्‍टोबर 2020 या काळात मेश्राम याच्याशी संगनमत करून बनावट अंतिम ले-आउट तयार करून घेतला. ज्यादा नफा मिळविण्याच्या हेतूने त्यांनी सोनाली मंहिद्रकर यांना ती जागा विकून महापालिका व महिंद्रकर यांची फसवणूक केली. त्यानंतर महेश क्षीरसागर (आवेक्षक, नगररचना) यांनी संबंधितांविरुद्ध पोलिसांत धाव घेतली होती. या प्रकरणात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांनी युक्‍तिवाद केला. तर संशयित आरोपींतर्फे ऍड. जयदीप माने यांनी काम पाहिले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com