पोलिसांवर हल्ला करणाऱ्या तिघांना पाच वर्षांची सक्तमजुरी ! वाचा सोलापुरातील गुन्हेगारी 

तात्या लांडगे 
Wednesday, 3 March 2021

सराईत गुन्हेगार बापू चव्हाण, लखन श्‍यामराव काळे व किसन श्‍यामराव काळे यांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर चिंचोली काटी येथे हल्ला झाला. या हल्ल्यात पोलिस नाईक सुभाष शेंडगे यांच्या डाव्या पायाच्या घोट्यास व हातास गंभीर जखम झाली. या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. पी. आव्हाड यांनी आरोपींना पाच वर्षांच्या सक्‍तमजुरीची शिक्षा ठोठावली. 

सोलापूर : सराईत गुन्हेगार बापू चव्हाण, लखन श्‍यामराव काळे व किसन श्‍यामराव काळे यांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर चिंचोली काटी येथे हल्ला झाला. या हल्ल्यात पोलिस नाईक सुभाष शेंडगे यांच्या डाव्या पायाच्या घोट्यास व हातास गंभीर जखम झाली. या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. पी. आव्हाड यांनी आरोपींना पाच वर्षांच्या सक्‍तमजुरीची शिक्षा ठोठावली. 

सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार लखन काळे व किसन काळे हे चिंचोली काटी (ता. मोहोळ) येथील त्यांचे नातेवाईक बापू चव्हाण यांच्या घरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर 1 नोव्हेंबर 2014 रोजी पोलिस उपनिरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दहा पोलिसांचे पथक त्या ठिकाणी पोचले. त्या वेळी चव्हाण याला पोलिस कारवाईची चाहूल लागली. त्यानंतर त्याने लखन व किसन काळे यांना सावध केले. चव्हाण हा कुऱ्हाड घेऊन बाहेर आला तर दोन्ही काळे तलवारी घेऊन घराबाहेर आले. पोलिस आणि त्यांच्यात झालेल्या झटापटीत एकाने पोलिस नाईक सुभाष शेंडगे यांच्या डोक्‍यात वार करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तो हुकवण्यासाठी उजवा हात समोर केला आणि त्यात त्यांच्या हाताचे हाड मोडले. त्यानंतर किसन काळे याने शेंडगे यांच्या पायावर वार करून त्यांचा घोटा तोडला. 

या प्रकरणानंतर मोहोळ पोलिसांनी तत्काळ तपास करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हल्ल्यानंतर तिघेही हत्यारे घेऊन पसार झाल्याने हत्यारे जप्त केलेली नव्हती. न्यायालयाने सरकारी वकिलांचा युक्‍तिवाद ग्राह्य धरून तिघांनाही पाच वर्षांच्या सक्‍तमजुरीची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकारतर्फे ऍड. शांतवीर महिंद्रकर यांनी तर आरोपींतर्फे ऍड. गडदे यांनी काम पाहिले. 

फ्रीजच्या आमिषाने लांबविले दागिने 
तुमच्या दुकानासाठी आडवी डीप फ्रीज मागवून देतो म्हणून एकाने कानातील दागिने नेल्याची फिर्याद कांताबाई बाबूराव कारभारी यांनी जोडभावी पेठ पोलिसांत दिली. तत्पूर्वी, कांताबाई या सोमवारी (ता. 1) त्यांच्या जगन्नाथ नगर (हैदराबाद रोड) येथील दुकानात बसल्या होत्या. त्या वेळी एक व्यक्‍ती त्या ठिकाणी आली. तिने त्यांचा विश्‍वास संपादन करून दुकानात डीप फ्रीज आणून देतो म्हणून दागिने काढून घेतले. मात्र, तो तिथून पसार झाल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास श्री. राठोड करीत आहेत. 

ग्रामसेवकाला मारहाण करणाऱ्या दोघांना सश्रम कारावास 
माहिती अधिकाराची माहिती उद्या देतो म्हणताच, नागनाथ दुपारगुडे व शिवदास दुपारगुडे या दोघांनी ग्रामसेवक बसवराज दहिवडे यांना पाइप व पाण्याच्या वॉल्व्हने मारहाण केली. या प्रकरणी मंद्रूप पोलिसांत गुन्हा दाखल झाला आणि न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सत्र न्यायाधीश आर. व्ही. मोहिते यांनी ग्रामसेवकाला मारहाण केल्याप्रकरणी दोघांनाही सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकारतर्फे ऍड. शांतवीर महिंद्रकर, ऍड. शैलजा क्‍यातम यांनी तर कोर्ट पैरवी म्हणून पोलिस हवालदार विजयकुमार जाधव यांनी काम पाहिले. आरोपींतर्फे ऍड. संजीव सदाफुले यांनी काम पाहिले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime news in and around Solapur city