सोलापुरातील गुन्हेगारी ! पैसे मागितल्याने भाच्याने दिली महिलेला पाय बांधून तलावात टाकण्याची धमकी

तात्या लांडगे 
Thursday, 4 March 2021

सासूने दिलेले पाच लाख रुपये परत दे, म्हणताच प्रदीप सिद्राम शिंगाडे याने सुमन संतोष व्हनमाने (रा. गरिबी हटाव झोपडपट्टी क्र. एक, जुना विजयपूर नाका) यांना मारहाण करीत घर सोडून जा, नाहीतर तुझे पाय बांधून कंबर तलावात टाकतो, अशी धमकी दिली. 

सोलापूर : सासूने दिलेले पाच लाख रुपये परत दे, म्हणताच प्रदीप सिद्राम शिंगाडे याने सुमन संतोष व्हनमाने (रा. गरिबी हटाव झोपडपट्टी क्र. एक, जुना विजयपूर नाका) यांना मारहाण करीत घर सोडून जा, नाहीतर तुझे पाय बांधून कंबर तलावात टाकतो, अशी धमकी दिली. या प्रकरणी विजापूर नाका पोलिसांत चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

फिर्यादी व्हनमाने यांचा प्रदीप हा भाचा आहे. व्हनमाने यांच्या सासूने प्रदीपला पाच लाख रुपये दिले होते. ते पैसे परत दे म्हणून व्हनमाने यांनी प्रदीपला हटकले. त्यानंतर तू वाड्याच्या बोळात दुचाकी का लावतेस, तू मलकप्पा वाघे याला घरात का घेतेस, म्हणून हातातील स्टीलसारख्या साधनाने दोन्ही हातांवर मारहाण केली. तर अर्चना शिंगोडे हिने हाता-पायाने मारहाण केली. मंजू पुजारी व शिवप्पा पुजारी (रा. दोघेही विजयपूर) यांनी दागिन्यांचे कारण देत मारहाण केल्याचेही व्हनमाने यांनी पोलिसांना सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक वाल्मीकी हे करीत आहेत. 

पोलिस केसच्या खर्चासाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ 
माहेरील लोकांनी आमच्याविरुद्ध पोलिसांत दाखल केलेली केस लढण्यासाठी झालेला एक लाखाचा खर्च माहेरून घेऊन ये, म्हणून सासरच्यांनी शिवीगाळ करीत मारहाण केल्याची फिर्याद भीमाबाई हणमंतू माने (रा. अर्जुनसोंड, ता. पंढरपूर) यांनी सलगर वस्ती पोलिसांत दिली. माने या सध्या सेटलमेंट फ्री कॉलनी क्रमांक सहा या ठिकाणी राहतात. सासरच्यांनी पैशासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याचेही त्यांनी पोलिसांना या वेळी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार श्री. पवार हे करीत आहेत. 

ब्रेक का मारला म्हणून मारहाण 
चारचाकी वाहनातून जात असताना जोडबसवण्णा चौकात अचानक ब्रेक का मारला म्हणून दोघांनी मारहाण केल्याची फिर्याद सुनील प्रभुलिंग लंगडेवाले (रा. बेडरपूल) यांनी जेलरोड पोलिसांत दिली. त्यावरून दत्ता यलप्पा तेलंग (रा. नवीन घरकुल) आणि चंद्रशेखर शांतीलिंग हिरेमठ (रा. समाधान नगरामागे, न्यू आशा नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या दोघांनी वाहन अडवून तोंडावर डाव्या डोळ्याच्या खाली मारून जखम केल्याचेही लंगडेवाले यांनी पोलिसांना सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस नाईक श्री. जाधव हे करीत आहेत. 

पाच व्यक्‍ती एकत्र फिरण्यास मनाई 
शहरात आगामी काळात महाशिवरात्री असून मराठा आरक्षण, शेती सुधारणाविषयक कायद्यांच्या विरोधात आंदोलने केली जात आहेत. शहरात मोठ्या प्रमाणावर सभा, मिरवणुका काढल्या जातील, अशी शक्‍यता आहे. सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी शहरात प्रतिबंध लावण्यात आला आहे. 19 मार्चपर्यंत शहरात अंत्ययात्रा, लग्न समारंभ, मिरवणूका, मोर्चे, रॅली, आंदोलने, धरणे व सभांना सक्षम पोलिस प्राधिकरणाची परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. 5 ते 19 मार्च या काळात पाच अथवा पाचपेक्षा अधिक व्यक्‍ती एकत्र फिरण्यास मनाई असल्याचे आदेश आज सहाय्यक पोलिस आयुक्‍त अभय डोंगरे यांनी काढले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime news in and around Solapur city