स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने बोलावून केला तरुणांवर शस्त्राने हल्ला; वाचा सोलापुरातील गुन्हेगारी 

तात्या लांडगे 
Tuesday, 27 October 2020

कमी दरात सोने देण्याचे आमिष दाखवून राहुल भोसले व पिंट्या पवार या दोघांनी तिघांना तेरामैल येथे बोलावून तिथून औराद रोडने एक किलोमीटर आतमध्ये येण्यास सांगितले. त्यानंतर तिघांवर धारदार शस्त्राने वार केले व लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. 

सोलापूर : कमी दरात सोने देण्याचे आमिष दाखवून राहुल भोसले व पिंट्या पवार या दोघांनी तिघांना तेरामैल येथे बोलावून तिथून औराद रोडने एक किलोमीटर आतमध्ये येण्यास सांगितले. त्यानंतर विश्‍वनाथ गडाळे याच्या डाव्या हातावर धारदार शस्त्राने वार केले. तर मला स्वत:ला व मित्र नागराज म्हाळाप्पा पुजारी यांना हाताने व लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केल्याची फिर्याद सोहेल अलीमअहमद मुल्ला (रा. जमखंडी रोड, कर्नाटक) यांनी पोलिसांत दिली होती. त्यानुसार सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन थेटे, पोलिस उपनिरीक्षक गणेश पिंगूवाले, पोलिस हवालदार विश्‍वास पवार, भरत चौधरी, यशवंत कलमाडी, किरण चव्हाण, संजय कांबळे, अमोल वाघमारे, महांतेश मुळजे, ओंकार व्होनमाने, सायबरचे रवी हालकिले यांनी 24 तासांत संशयित आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली. मोहोळजवळील नायकोडे वस्ती येथून पोलिसांनी अशोक ऊर्फ आशिकाऱ्या छपरू काळे याला अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून फिर्यादीच्या मित्राची दुचाकी आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. नायकोडे याच्याविरुद्ध मंद्रूप पोलिसांत चार, हिंगोली, सेलू पोलिसांत एक आणि परभणीतील पूर्णा येथील पोलिसांत गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी पत्रकाद्वारे दिली. 

मुलीला कपडे घ्यायला गेले ! महिलेची पर्सच चोरट्याने लांबविली 
विजयपूर रोडवरील मुक्‍ती नगरातील लक्ष्मीबाई वसंत अंबलगी या आपल्या मुलीला कपडे घेण्यासाठी नवी पेठेत गेल्या होत्या. कपडे खरेदी करताना त्यांनी स्वत:कडील पर्स पिशवीत ठेवली होती. त्या वेळी कोणीतरी पर्स लांबविली. त्या पर्समध्ये दोन हजारांच्या रोकडसह 25 हजार 100 रुपयांचे दागिने होते, अशी फिर्याद अंबलगी यांनी फौजदार चावडी पोलिसांत दिली आहे. पोलिस नाईक श्री. शेख हे पुढील तपास करीत आहेत. 

पादचाऱ्याच्या खिशातील लांबविला मोबाईल 
व्यायाम करून घराकडे जात असताना अमोल तात्यासाहेब साळुंखे (रा. चंदन नगर, सुविधा अपार्टमेंट) यांच्या खिशातून अनोळखी दुचाकीस्वारान मोबाईल लांबविला. अमोल हे पायी घराकडे निघाले होते. त्या वेळी मागून आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांच्या खिशातील मोबाईल चोरला. चोर चोर म्हणून आरडाओरड सुरू असतानाच दुचाकीस्वार पसार झाल्याची फिर्याद अमोल साळुंखे यांनी विजापूर नाका पोलिसांत दिली आहे. पोलिस नाईक श्री. वाल्मिकी पुढील तपास करीत आहेत. 

शेतीच्या वादातून जिवे मारण्याची धमकी 
शेतीची मशागत करण्यासाठी शेतात गेल्यानंतर प्रवीण करबसू (रा. सेटलमेंट कॉलनी) आणि मोजेस प्रदीप बनसोडे (रा. रंगभवन, हार्ट लॅण्ड कंपाउंडजवळ) या दोघांनी शेतीचा कब्जा सोड, नाहीतर जिवे मारीन, अशी धमकी दिल्याची फिर्याद शिवाजी सोपान पाटील (रा. सोरेगाव, डोणगाव) यांनी सलगर वस्ती पोलिसांत दिली आहे. चाकूचा धाक दाखवून पत्नीला ढकलून देऊन प्रवीण करबसू याने मला चापट मारल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे. 

बेशिस्त वाहनांवर वाहतूक पोलिसांची नजर 
शहरातील रस्त्यांवरून धावणाऱ्या अवैध रिक्षा, ज्या वाहनांकडे विमा नाही तथा पासिंग झालेले नाही, अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांच्या आदेशानुसार रस्त्यालगत थांबलेली बेशिस्त वाहने, परवाना नसलेल्या वाहनांवरही कारवाई केली जात आहे. संबंधित वाहनचालकांना नोटीस देऊन आरटीओ कार्यालयात दंड भरून वाहन घेऊन जाण्याचे आवाहन केले जात आहे. वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष काणे, बाळासाहेब भालचिम यांच्या माध्यमातून ही कारवाई सुरू आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime news like theft, assault, fraud etc. in Solapur