आता काय करावं! भाडेकरुनेच मागितली प्लॅटची मागणी; सोलापुरातील गुन्हेगारी नक्‍की वाचा 

crime news
crime news

सोलापूर : बुधवार पेठ परिसरातील झंवर मळा येथील लक्ष्मी नारायण बिल्डींग गोविंद लक्ष्मीनारायण राठी यांच्या मालकीच्या बिल्डींगमध्ये पाच वर्षांपूर्वी दत्तात्रय शंकरराव दंडगल एक महिन्यासाठी राहण्यास आले होते. महिन्यानंतर मी दुसरा प्लॅट शोधत असल्याचे सांगत दत्तात्रय दंडगल त्याठिकाणी राहायले. सातत्याने त्यांनी वेगवेगळी कारणे दिली. आता त्यांना तिथून जाण्यास सांगितले असता, तो प्लॅट माझ्या नावावर करा अन्यथा 50 लाख रुपये द्या, अशी मागणी ते करीत असल्याची फिर्याद गोविंद राठी यांनी फौजदार चावडी पोलिसांत दिली. 

प्लॅट नावावर करा, अन्यथा 50 लाख रुपये न दिल्यास माझ्याकडे फिरकू नका, असे म्हणत दंडगल याने बिल्डींगवरुन खाली फेकून देण्याची धमकी दिली. पत्नीला शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे. चौथ्या मजल्यावरील माझ्या खोलीचे कुलूप तोडून त्याठिकाणी स्वत:चे कुलूप लावल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी दंडगलविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. 

नाकाबंदीत 69 वाहनांवर कारवाई 
सोलापूर : शहरातील कोरोनाची स्थिती आटोक्‍यात यावी या हेतूने शहर हद्दीत आठ ठिकाणी नाकाबंदी पॉईंट उभारले आहेत. त्याठिकाणी शुक्रवारी रात्री आठ ते शनिवारी सकाळी (ता. 22) आठ वाजेपर्यंत पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करुन निघालेल्या 69 वाहनांवर कारवाई केली. त्या वाहनांमधील 53 व्यक्‍तींना होम क्‍वारंटाईन करीत काहींना वैद्यकीय तपासणीसाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठविले. दुसरीकडे आता राज्य परिवहन महामंडळाची सेवा सुरु झाल्यानंतर आणि गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर नाकाबंदी पॉईंटवरील बंदोबस्त कमी केल्याचे चित्र दिसून येते.

बंद घरातून दागिने, रोकड लंपास 
सोलापूर : कुमठा नाका परिसरातील प्रतिभा हौसिंग सोसायटीतील तन्वीर दाऊद खान यांच्या बंद घरातून चोरट्याने दागिने आणि रोकड चोरुन नेल्याची नोंद एमआयडीसी पोलिसांत झाली आहे. मागील दहा-बारा दिवसांपासून खर बंद असल्याची संधी साधून चोरट्याने घराचे कुलूप तोडले. घरातील डब्यात ठेवलेले सोने दागिने आणि 13 हजार रुपयांची रोकड चोरट्याने लंपास केली आहे. घरफोडी झाल्याची माहिती घराशेजारील व्यक्‍तीने तन्वीर खान यांना फोनवरुन दिली. 59 हजारांची दागिनेही चोरट्याने चोरुन नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सहायक पोलिस निरीक्षक श्री. खांडेकर या प्रकरणाचा तपास करीत आहेत. 

अवैधरित्या रिक्षात गॅस भरताना कारवाई 
सोलापूर : आकाशवाणी केंद्राजवळील जगदंबा नगरात घरगुती गॅस इंधन म्हणून रिक्षात भरताना एमआयडीसी पोलिसांनी दोघांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. तीन गॅस सिलेंडर, इलेक्‍ट्रिक वजन काटा, इलेक्‍ट्रिक मोटारसह रिक्षा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. सहायक पोलिस निरीक्षक संपत पवळ यांनी या प्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे. चंद्रकांत मारुती साठे (रा. दक्षिण सदर बझार), संतोष अंबादास पंगुडवाले (रा. जगदंबा नगर) या दोघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. 

सासरच्यांकडून विवाहितेचा छळ 
सोलापूर : माहेरुन दहा लाख रुपये आणि 15 तोळे सोन्याचे दागिने घेऊन ये म्हणून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पुण्यातील चौघांविरुध्द सलगर वस्ती पोलिसांत गुन्हा करण्यात आला आहे. देहू-आळंदी रोडवरील चिखली येथे राहणाऱ्या लक्ष्मण विठ्ठज जाधव, विवेक लक्ष्मण जाधव, बिना लक्ष्मण जाधव, स्वाती नागेश गायकवाड या चौघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, फिर्यादी विशाखा विवेक जाधव यांचा विवेक यांच्याशी 11 डिसेंबर 2019 रोजी विवाह झाला होता. विवाहानंतर काही महिन्यांतच सासरच्यांनी माहेरुन सोने, पैसे आण म्हणून छळ सुरु केला. पैसे, दागिने आण, नाहीतर आमच्या घरात राहू नको म्हणून शिवीगाळ व मारहाणही केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. त्यानुसार सासरच्या चौघांविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com