पंढरपूर तालुक्‍यात 65 हजार हेक्‍टरवरील पिकांना फटका; भरपाईसाठी 98 कोटींची मागणी 

भारत नागणे
Friday, 30 October 2020

पीकनिहाय नुकसान झालेले क्षेत्र (हेक्‍टरमध्ये) 
ऊस - 20 हजार 721, मका - 9 हजार 542, बाजरी - 132, सोयाबीन - 206, ज्वारी - 421, भुईमूग - 28, कांदा - 4 हजार 392, भाजीपाला - 2 हजार 290, विविध फळबागा - 24 हजार 136, चारा पिके - 637, इतर - 1822. 

पंढरपूर (सोलापूर) : अतिवृष्टी आणि महापुरामुळे पंढरपूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले आहे. पंचनाम्यानुसार सुमारे 65 हजार हेक्‍टर क्षेत्रावरील विविध पिकांचे नुकसान झाले असून नुकसान भरपाईसाठी जवळपास 98 कोटी 42 लाख 44 हजार रुपयांची मागणी केली आहे. शासन आदेशानुसार शेतकऱ्यांना लवकरच मदत दिली जाईल, अशी माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी आज सकाळ शी बोलताना दिली. 
मागील अनेक वर्षानंतर यावर्षी पंढरपूर तालुक्‍यात मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर तालुक्‍यात 10 ते 16 ऑक्‍टोबरदरम्यान अतिवृष्टी झाली. तालुक्‍यात 15 ऑक्‍टोबरअखेर सरासरी 141.89 मिलीमीटर इतक्‍या पावसाची नोंद झाली आहे. वर्षिक सरासरीच्या पाच पट पाऊस झाल्याने भीमा, माणनदीसह अनेक छोट्यामोठ्या ओढ्यांना महापूर आला. महापुरामुळे पिकांची हाणी झाली. यामध्ये तालुक्‍यातील 69 हजार 500 शेतकऱ्यांच्या विविध पिकांचे नुकसान झाले. 
अतिवृष्टी आणि नद्यांना आलेल्या महापुरामुळे सर्वाधिक 24 हजार 136 हेक्‍टरवरील द्राक्ष, डाळिंब, पपई, आंबा, पेरु, चिकू, केळीसह इतर फळबागांचे नुकसान झाले आहे. त्या खालोखाल 20 हजार 720 हेक्‍टरवरील ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यासाठी कृषी, महसूल आणि जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. संयुक्त पथकाने तालुक्‍यातील नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे केले असून ते जवळपास पूर्ण झाले आहेत. नुकसान झालेल्या पिकांची आणि त्यासाठी लागणाऱ्या निधीची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आली आहे. पुराच्या पाण्यामुळे शहर व तालुक्‍यातील बाधित झालेल्या घरांचेही पंचनामे पूर्ण झाले आहेत. शासनाकडून निधी प्राप्त होताच शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा केला जाईल असेही श्री. ढोले यांनी सांगितले. 

पीकनिहाय नुकसान झालेले क्षेत्र (हेक्‍टरमध्ये) 
ऊस - 20 हजार 721, मका - 9 हजार 542, बाजरी - 132, सोयाबीन - 206, ज्वारी - 421, भुईमूग - 28, कांदा - 4 हजार 392, भाजीपाला - 2 हजार 290, विविध फळबागा - 24 हजार 136, चारा पिके - 637, इतर - 1822. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crops on 65000 hectares hit in Pandharpur taluka demand of Rs 98 crore for compensation