जोरदार पावसामुळे मारापूर परिसरातील पिके पाण्याखाली

धनाजी यादव 
Friday, 18 September 2020

काल मध्यरात्रीपासून झालेल्या पावसामुळे सपाट जमिनीमध्ये असलेली पिके पाण्याखाली गेली आहेत. खरीप हंगामामध्ये बाजरी, तूर, सूर्यफूल, मूग व मका ही पिके घेतली जात असून, खरीप पीक विमा भरताना तालुक्‍यामध्ये सूर्यफुलाचे पीक क्षेत्र असतानादेखील विमा कंपनीने व शासनाने सूर्यफुलाचे पीक वगळले आहे. अशा परिस्थितीत सध्या बहुतांश शेतकऱ्यांची पिके सध्या पाण्याखाली आहेत. 

मारापूर (सोलापूर) : परिसरात गुरुवारी मध्यरात्री ते शुक्रवारी पहाटेपर्यंत झालेल्या जोरदार पावसामुळे मारापूर परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांची अवस्था "कोरोना जगू देईना आणि पाऊस मरू देईना' अशी झाली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पेरू, चिक्कू, केळी, मका, कांदा, सूर्यफूल, डाळिंब, द्राक्ष या पिकांचे नुकसान झाले आहे. या भागातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा पीक विम्यावर आहे. त्यामध्ये दिगंबर यादव या शेतकऱ्याची तीन एकर पेरूची रोपे पूर्ण पाण्यात बुडाली. दुष्काळी तालुक्‍यामध्ये दरवर्षी खरीप पिकाच्या हंगामामध्ये पावसाने ओढ दिल्यामुळे पिके खराब झाल्याची आजपर्यंतची परिस्थिती आहे. यंदा मात्र पावसाने वेळेवर सुरवात केली. त्यामुळे तालुक्‍यामध्ये अपेक्षेपेक्षा चांगल्या पावसाची हजेरी लागल्यामुळे खरीप पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली. 

मात्र काल मध्यरात्रीपासून झालेल्या पावसामुळे सपाट जमिनीमध्ये असलेली पिके पाण्याखाली गेली आहेत. खरीप हंगामामध्ये बाजरी, तूर, सूर्यफूल, मूग व मका ही पिके घेतली जात असून, खरीप पीक विमा भरताना तालुक्‍यामध्ये सूर्यफुलाचे पीक क्षेत्र असतानादेखील विमा कंपनीने व शासनाने सूर्यफुलाचे पीक वगळले आहे. अशा परिस्थितीत सध्या बहुतांश शेतकऱ्यांची पिके सध्या पाण्याखाली आहेत. या पाण्याखालील पिकांचे पंचनामे करण्यासाठी महसूल खाते व कृषी खात्याने अद्यापही नियोजन केले नसल्यामुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. गतवर्षी रब्बीच्या हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करताना कृषी व महसूल खात्याच्या कर्मचाऱ्यांनी विमा भरलेल्या शेतकऱ्यांना वगळले. परंतु विमा कंपनीने देखील विमा दिला नसल्यामुळे शेतकरी ना शासनाची भरपाई, ना विमा कंपनीची भरपाई अशा दुहेरी संकटात सापडले आहेत. 

आपल्या पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत मारापूरचे शेतकरी दिगंबर यादव म्हणाले, देना बॅंक रोपळे शाखेकडून पीक कर्ज घेऊन शंभर रुपयांप्रमाणे व्हीएनआर जातीच्या पेरूची 2100 रोपे तीन एकरात लावली. पण पावसाने पूर्ण तीन एकराला पाण्याने घेरले आहे. यामुळे ही नवीन रोपे जळून गेली आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crops in Marapur area were submerged due to heavy rains