esakal | तब्बल सात महिन्यांनंतर गजबजली पंढरी; कमला एकादशीनिमित्त भाविकांची गर्दी 
sakal

बोलून बातमी शोधा

Crowd of devotees in Pandharpur after seven months

विठुराया, लवकरच जवळून दर्शन होऊ दे 
शेकडो वारकऱ्यांनी मास्क लावून सोशल डिस्टन्सचे पालन करत टाळ मृदंग वाजवत आणि हरिनामाचा जयघोष करत नगरप्रदक्षिणेचा सोहळा केला. कोरोनाचा वाढता संसर्ग थांबून लवकरात लवकर मंदिरात जाऊन विठूरायाचे दर्शन घेण्याची संधी मिळू दे, असे साकडे घातल्याचे अनेक भाविकांनी सांगितले. 

तब्बल सात महिन्यांनंतर गजबजली पंढरी; कमला एकादशीनिमित्त भाविकांची गर्दी 

sakal_logo
By
अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एसटी आणि खासगी वाहतूक सुरु झाल्यामुळे अधिक महिन्यातील कमला एकादशीच्या निमित्ताने आज शेकडो वारकऱ्यांनी पंढरपुरात येऊन श्री विठ्ठल-रूक्‍मिणी मंदिराच्या कळसाचे दर्शन घेतले. तब्बल सात महिन्यानंतर मंदिर परिसरात आज भाविकांची गर्दी झाली. मास्क आणि सोशल डिस्टन्सचे पालन करत वारकऱ्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात नगरप्रदक्षिणा केली. 
दर तीन वर्षातून येणारा अधिक महिना सध्या सुरु आहे. या महिन्यात तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जाऊन दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करतात. परंतु कोरोनाच्या भितीमुळे 17 मार्चपासून येथील श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर भाविकांसाठी बंद आहे. एसटी आणि खासगी वाहनांवर देखील निर्बंध होते. त्यामुळे यंदा चैत्री आणि आषाढी, यात्रा भरु शकल्या नाहीत. अधिक महिना सुरु झाला असला तरी शासनाकडून अद्याप निर्देश आलेले नसल्यामुळे मंदिरात भाविकांना प्रवेश दिला जात नाही. यात्रा काळात आणि दररोज येणाऱ्या भाविकांकडून होणाऱ्या खरेदीमुळे येथील बाजारपेठेत उलाढाल होत असते. परंतु मार्चपासून भाविक येणे बंद असल्याने येथील मंदिर परिसरातील फुल विक्रेते, तुळशीमाळा, चुरमुरे, बत्तासे, पेढे विक्रेत्यांसह प्रासादिक वस्तुंचे व्यापारी अडचणीत आले आहेत. मंदिर समितीला भाविकांच्या देणगीच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न बंद आहे. आतापर्यंत मंदिर समितीचे सुमारे 17 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. 
दरम्यान, आता एसटी आणि खासगी वाहनांची वाहतूक सुरु झाली असल्याने आज अधिक महिन्यातील कमला एकादशीच्या निमित्ताने शेकडो भाविक येथे आले होते. चंद्रभागा नदीत स्नानाची पर्वणी साधून श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिराच्या संत नामदेव पायरी जवळ उभा राहून भाविकांनी कळसाचे दर्शन घेतले. 
शेकडो वारकऱ्यांनी मास्क लावून सोशल डिस्टन्सचे पालन करत टाळ मृदंग वाजवत आणि हरिनामाचा जयघोष करत नगरप्रदक्षिणेचा सोहळा केला. कोरोनाचा वाढता संसर्ग थांबून लवकरात लवकर मंदिरात जाऊन विठूरायाचे दर्शन घेण्याची संधी मिळू दे, असे साकडे घातल्याचे अनेक भाविकांनी सांगितले. 

संपादन : वैभव गाढवे