जन्म- मृत्यू दाखल्यासाठी जीव धोक्‍यात  सोलापूर महापालिकेत सोशल डिस्टन्सिंगचे पालन नाहीच; अधिकाऱ्यांकडून कानाडोळा 

 तात्या लांडगे 
Wednesday, 30 September 2020

महापालिकेने विविध प्रकारचा कर भरण्यासाठी ऑनलाइन सोय केली आहे. ऑनलाइन कर भरणाऱ्यांसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. बिल मिळाले नसले, तरीही चालू मिळकत करावर पाच टक्‍के तर ऑनलाइन कर भरणाऱ्यास एक टक्‍का ज्यादा सवलत जाहीर करण्यात आली आहे. तरीही नागरिक कर भरण्यासाठी महापालिकेत मोठी गर्दी करू लागले आहेत. 

सोलापूर : शहरातील कोरोनाचा संसर्ग आटोक्‍यात यावा या हेतूने पोलिसांकडून बेशिस्त वाहनांसह विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. आता महापालिका आयुक्‍तांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. शहरातील कोरोनाचा संसर्ग तथा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून चारपेक्षा अधिक व्यक्‍ती एकत्र जमणे गुन्हा आहे. तरीही महापालिकेत जन्म- मृत्यू दाखला काढण्यासाठी लांबलचक रांगा लागल्या असून सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसतानाही अधिकाऱ्यांकडून कानाडोळा केला जात आहे. 

शहरातील आठ विभागीय कार्यालयांमध्ये नागरिकांना जन्म- मृत्यूचे दाखले मिळतील, असे उपायुक्‍त धनराज पांडे यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. त्यानुसार दोन-चार दिवस कार्यवाही झाली. त्यानंतर नागरिकांच्या माहितीसाठी विभागीय कार्यालयांबाहेर फलक लावून दाखले देणाऱ्यांचे क्रमांक द्यावेत, अशा सूचनाही श्री. पांडे यांनी दिल्या. विभागीय अधिकाऱ्यांनी नागरिकांना जन्म- मृत्यूचे दाखले द्यावेत, असे आदेश देत पांडे यांनी विभागीय कार्यालयांत त्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्‍त केल्याचेही सांगितले. मात्र, अद्याप त्यानुसार कार्यवाही झाली नसल्याने नागरिक महापालिकेतच रांगा लावून दाखले घेत आहेत. दुसरीकडे मनुष्यबळ कमी आहे, दप्तर अपूर्ण आहे असे सांगून विभागीय कार्यालयातून नागरिकांना महापालिकेत पाठविले जात असल्याचेही काहींनी सांगितले.

दरम्यान, शहरातील कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा म्हणून उपाययोजना केल्या जात असतानाच महापालिकेत विनामास्क येणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. दुसरीकडे शहरातील विविध भागातून येणारे नागरिक थेट महापालिकेत प्रवेश करत आहेत. त्यावेळी त्यांची कोणत्याही प्रकारची टेस्ट किंवा तापमान तपासले जात नाही. त्यामुळे महापालिकेतील अधिकारी तथा कर्मचाऱ्यांना कोरोनाची भीती वाटू लागली आहे. 
 
ऑनलाइन असतानाही कर भरण्यासाठी गर्दी 
महापालिकेने विविध प्रकारचा कर भरण्यासाठी ऑनलाइन सोय केली आहे. ऑनलाइन कर भरणाऱ्यांसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. बिल मिळाले नसले, तरीही चालू मिळकत करावर पाच टक्‍के तर ऑनलाइन कर भरणाऱ्यास एक टक्‍का ज्यादा सवलत जाहीर करण्यात आली आहे. तरीही नागरिक कर भरण्यासाठी महापालिकेत मोठी गर्दी करू लागले आहेत. 

 

संपादन : अरविंद मोटे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crowd to pay taxes in Solapur Municipal Corporation