पोलिस चौकात तैनात; मात्र शेवटच्या कडक लॉकडाउनचा उडतोय गल्लीबोळात बोजवारा !

Lockdown Fail
Lockdown Fail

सोलापूर : शहरात कडक लॉकडाउन असूनही नागरी वसाहत व झोपडपट्टी परिसरात मात्र नागरिक मोकाट फिरत आहेत. पोलिसांचा बंदोबस्त मुख्य चौकात आहे व त्यांच्याकडून दुचाकीस्वारांची चौकशी होते. मात्र कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरी वसाहतीत फिरून गर्दी करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. लॉकडाउन ही शेवटचीच संधी प्रशासनाला असणार आहे, कारण पालकमंत्र्यांनी सोलापुरात पुन्हा लॉकडाउन होणार नसल्याचा खुलासा दोनच दिवसांपूर्वी केला आहे. त्यामुळे आताच संधी आहे, कोरोनाचा अटकाव करण्याची; अन्यथा हा लॉकडाउन पूर्वीप्रमाणेच पुन्हा कुचकामी ठरण्याची शक्‍यता आहे. 

लॉकडाउनच्या पहिल्या दिवशी नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले, मात्र त्यानंतर भाजी व किराणा दुकाने बंद असतानाही शहर परिसरात सकाळी बिनधास्त बाहेर मोकाट फिरणारे दिसत आहेत. त्यात तरुणांची संख्या जास्त आहे. दुपारी वातावरण शांत असते मात्र दुपारी चारनंतर गल्लीत दाटीवाटीने गप्पा मारणाऱ्यांच्या मैफली रंगलेल्या असतात, त्या रात्री बारापर्यंत. त्यात स्त्रिया, वृद्ध, लहान मुले व तरुणांचाही समावेश असून, अनेकांच्या तोंडावर मास्कही नसतात. सकाळी महापालिकेच्या विविध झोनमार्फत दूध वाटप करणाऱ्यांवर मास्क, हॅंडग्लोव्ह्‌ज नसल्याचे कारण देऊन कारवाई केली जात आहे; मात्र दिवसभर गल्लीबोळात कोरोना विषाणू फैलावणाऱ्या गर्दीवर मात्र पोलिस प्रशासनाची कारवाई अपेक्षित असताना तसे होताना दिसून येत नाही. अपवाद वगळता रस्त्यावरून पोलिसांचे वाहन नागरिकांना घरात बसण्याचे व विनाकारण घराबाहेर पडू नका, असे आवाहन करत जाते; मात्र विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने आता नागरिकांना कोरोनासह पोलिसांची भीतीही राहिली नसल्याचे दिसून येते. 

या परिसरात झुंडीच्या झुंडी फिरताहेत 
लष्कर, नळ बाजार, लोधी गल्ली, मोदी पोलिस स्टेशनच्या मागील बाजू ते पत्रकार भवन, रामवाडी, राहुल गांधी झोपडपट्टी, बुधवार पेठ, पूर्व भागातील कुचन नगर झोपडपट्टी, फलमारी झोपडपट्टी, अक्कलकोट रोडवरील गांधीनगर झोपडपट्टी, नीलमनगर, विनायक नगर आदी शहरातील विविध परिसरात दुपारी चारनंतर तरुणांच्या झुंडीच्या झुंडी गल्लीबोळातून फिरताना दिसून येतात. ज्येष्ठ नागरिक, महिला व मुलेही रस्त्यावरील कट्ट्यांवर कुठल्याच सुरक्षा साधनांशिवाय गटा-गटाने गप्पा मारत असतात तर लहान मुले क्रिकेट खेळताना व पतंग उडवताना दिसून येतात. सोशल डिस्टन्सिंग कोठेही पाळले जात नाही. पोलिस आले की पळून जाणे व पुन्हा पाच मिनिटांत एकत्र येत गर्दी करणे हे आता नित्याचेच झाले आहे. लोधी गल्लीतील नागरिक म्हणतात, काम नाही धंदा नाही तर दिवसभर घरात बसून काय करणार?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com