वारकऱ्यांचे लागले आता ‘या’कडे लक्ष

अशोक मुरुमकर
Sunday, 17 May 2020

वर्षभर काम करण्यासाठी ऊर्जा मिळावी म्हणून माऊली माऊलीचा जयघोष करत कोणताही भेदभाव न पाळता वारकारी चालतात. पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आधीच वारकऱ्यांची तयारी सुरु असते. मात्र, यंदा कोरोना व्हायरसच्या सावटात वारी होणार की नाही, कशी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सुखा लागी करीसी तळमळ।
तरी तु पंढरीसी जाय एकवेळ॥
मग अवघाचि सुखरूप होसी।
जन्मोजन्मीचे दुःख विसरशी॥
या अभंगाप्रमाणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने पायी चालत दींड्यामधून वारकरी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला आपल्या लाडक्या सावळ्या विठ्ठुरायाच्या दर्शनासाठी येतात. वर्षभर शेतात काम करुन अनेक वारकरी खास वारीसाठी १५ ते ३० दिवस वेळ काढतात. सर्व देहभान विसरुन पंढरीच्या दिशेने वारकारी येतात. यात नोकरदार वर्ग सुद्धा मागे राहत नाही. अनेक नोकरदार खास वारीसाठी रजा टाकतात. वर्षभर काम करण्यासाठी ऊर्जा मिळावी म्हणून माऊली माऊलीचा जयघोष करत कोणताही भेदभाव न पाळता वारकारी चालतात. पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आधीच वारकऱ्यांची तयारी सुरु असते. मात्र, यंदा कोरोना व्हायरसच्या सावटात वारी होणार की नाही, कशी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
वैभवशाली परंपरा असलेल्या आषाढी वारीबाबत यावर्षी जगभर थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसमुळे प्रश्‍न चिन्ह निर्माण झाले आहे. कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी दीड महिन्यापासून लॉकडाऊन सुरु आहे. ‘घरातच बसा बाहेर फिरु नका’ असे आवाहन सरकार करत आहे. गर्दीमुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे सुरु केलेल्या लॉकडाऊनचा सर्वच घटकांवर परिणाम झाला आहे. पंढरपूरमधील विठ्ठल मंदीर सुद्धा सध्या बंद आहे. त्यात यंदा वारी होणार की नाही असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
वारकऱ्यांची भावना.... 
सुख पाहिजे असेल तर एकदा पंढरीला गेले पाहिजे. पंढरीला गेल्यानंतर सर्व सुखच सुख मिळते. जन्मोजन्मीचे दुः ख नाहीसे होईल हे खरेच आहे. या सुखाची प्रचिती वारीत पंढरपूरातपर्यंत पायी चालत गेल्यानंतर येते. कामातला देव शोधण्यासाठी पायी चालत वारी करायची असते. वारकरी देखील याच देवाला शोधण्यासाठी लाखोंच्या संख्येने पंढरीच्या वारीत सामील होतात. आषाढी यात्रा सोहळ्यात सावळया विठ्ठलाच्या भक्‍तीरसात न्हाऊन गेलेले वारकरी टाळ मृंदगाच्या गजरात ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात तल्‍लीन होतात. कोणताही भेदभाव यामध्ये केला जात नाही. सर्व जाती धर्माचे लोक यामध्ये वारकरी म्हणून सहभागी होतात. आपली वारी सावळया विठुरायाच्या चरणी समर्पित करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या भाविकांच्या मेळयाने अवघी पंढरी न्हाऊन जाते. खांद्यावर घेतलेल्या भगव्या पताक्यांनी पंढरीतील रस्ते भगवे होतात. आणि टाळ, मृदंगाच्या निनादात ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषाने पंढरीचा आसमंत दुमदुमला जातो. १५ ते ३० दिवसाचा खडतर पायी प्रवास करून सावळया विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने वारकरी सावळया विठ्ठलाला भेटून आंतरमनातून सुखावतो. विठ्ठल नामाचा जयघोष करत लाखो वारकरी भक्‍त देहभान विसरून जातात. वारीमध्ये लीनतेची आणि समतेची भावना वारकर्‍यांच्या मनात असते. महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर अनेक यात्रा भरतात पण ही पंढरीची आषाढी वारी ही एक अनोखी वारी आहे. या वारीमध्ये अनेक राज्यातील भाविक भक्‍त सामील होतात. अनेक जाती धर्माचे वारकरी, सामील होतात. या वारीमध्ये जात- पात- धर्म मानला जात नाही. लहान- थोर स्त्री- पुरूष भेद भाव केला जात नाही. उच्च नीच समजला जात नाही. सारेजण विठुरायाची लेकरेच आहेत असे मानले जाते. माऊली- माऊलीचा जयघोष करत वारकरी मुक्कम दर मुक्काम करत पंढरपूरला येतात. 

हेही वाचा : महत्त्वाची माहिती; सोलापूरचे नाव सोलापूरच का? जाणून घ्या कारण
कधी आहे आषाढी एकादशी...

१ जूलैला यावर्षी आषाढी एकादशी आहे. मात्र, एकादशीच्या आधीपासूनच येणाऱ्या वारकाऱ्यांच्या व्यवस्थेसाठी प्रशासनाकडून तयारी केली जाते. पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची गैरसोय होणार याची काळजी घेतात. संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो वारकारी देहू आणि आळंदी येथे येतात. त्यानंतर पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाल्यानंतर एकापाठोपाठ एक अशा दिंड्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतात. मुक्काम दर मुक्काम करत पालखी सोहळा पंढरपूरमध्ये येतो.

या दिवशी पालखी सोहळ्याचे प्रस्थान कसे होणार?
१ जुलैला आषाढी एकादशी आहे. त्यानिमित्त येणाऱ्या दिंड्या, पालख्या आधीच निघतात. यामध्ये सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या ज्ञानेश्‍वर महाराज व तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान १२ व १३ जूनला होणार आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे नियोजनाप्रमाणे १२ व संत ज्ञानेश्‍वर माऊली महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान नियोजनाप्रमाणे १३ जूनला होणार होते. मात्र, यंदा कोरोना व्हायरसमुळे नियोजनाप्रमाणे पालखी सोहळ्याचे कसे प्रस्थान होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रस्थान झाले तर कसे होणार, अशी चर्चा आता गावागावात केली जाऊ लागली आहे. 

पालकमंत्री काय म्हणाले...
आषाढी वारीबाबत चर्चा करण्यासाठी शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात बैठक झाली. या बैठकीत व्हीसीद्वारे पालकमंत्री दत्तात्रय भरणे सहभागी झाले होते. त्याची माहिती देताना पंढरपूरच्या आषाढी वारीबाबत ३० मे नंतर निर्णय घेतला जाईल, असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधनाताई भोसले, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, पंढरपूरचे उपविभागीय अधिकरी सचिन ढोले, पंढरपूरचे नगरपरिषद मुख्यधिकारी अनिकेत मानोरकर आदी उपस्थित होते.

पंढरपूरकरांच्या आरोग्याचा प्रश्‍न
पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांनी सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता यंदा आषाढी वारी भरवली जाऊ नये. पंढरपूरकरांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो, असे सांगितले.

परंपरा पाळली जावी...
गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले, वारी सोहळ्याचे प्रातिनिधीक स्वरुपात आयोजन करुन संत परंपरा पाळली जावी. याबाबत राज्य शासनाच्या निर्णयाचे पालन केले जाई.

२० वारकऱ्यांसोबत पालखी सोहळा
यंदाच्या आषाढी वारीबाबत आळंदीच्या ग्रामस्थांनी पर्याय सुचवला होता. त्यात त्यांनी म्हटले होते फक्त २० वारकऱ्यांच्या सोबत पालखी सोहळा पंढरपूरला न्या. पालखी सोहळा वद्य अष्टमी म्हणजेच 13 जून रोजी करु नका, त्याऐवजी थेट आषाढ शुद्ध दशमी म्हणजे 30 जून रोजी मोजक्या वीस वारकऱ्यांसोबत माऊलींची पालखी पंढरपूरला न्या. सोहळा वाटेत कोठेही न थांबता थेट पंढपूरला न्या, अशी सूचना त्यांनी केली होती. याबाबत एका वृत्तवाहीनीत वृत्त प्रसिद्ध झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Curiosity about how Pandharpur Ashadhi Wari will be this year