धोका वाढतोय; पंढरपुरातील नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज 

अभय जोशी
Sunday, 24 May 2020

15 दिवस विलगीकरण सक्तीचे करावे 
परजिल्ह्यातून आणि परराज्यातून पंढरपूर शहर व तालुक्‍यात येणाऱ्या नागरिकांमुळे पंढरपूर शहर व तालुक्‍यात कोरोनाचा संसर्ग फैलावू नये यासाठी बाहेरून येणाऱ्या नागरिकांना आता थेट त्यांच्या घरी जाऊ देण्याऐवजी 15 दिवस संस्थात्मक विलगीकरण करावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. 

पंढरपूर (जि. सोलापूर) : प्रशासकीय अधिकाऱ्यांची सतर्कता, उत्तम समन्वय आणि काही प्रमाणात नागरिकांनी घेतलेली दक्षता यामुळे राज्याची अध्यात्मिक राजधानी पंढरी गुरुवारपर्यंत कोरोनामुक्त राहिली होती. मुंबईवरून तालुक्‍यातील उपरी येथे आलेल्या एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव आल्यामुळे नागरिकांनी आता अधिक सतर्क होण्याची गरज आहे. 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी सुरुवातीपासून पंढरपूर उपविभागातील महसूल, पोलिस, आरोग्य, नगरपालिका, पंचायत समिती अशा विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी सतर्कता बाळगली आहे. उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तहसीलदार वैशाली वाघमारे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ.जयश्री ढवळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले यांनी चांगला समन्वय ठेवत यंत्रणा राबवली आहे. पंढरपूरकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर वाहनांची तपासणी केली जात असून त्यामधून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवले जात आहे. परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. नगरपालिकेने देखील अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे विठुरायाची नगरी कोरोनामुक्त राहिली होती. तथापि आता मुंबईवरून उपरीमध्ये आलेल्या एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. 
शासनाने परवानगी दिलेली सर्व प्रकारची दुकाने उघडण्यात आली आहेत. त्यामुळे खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर येऊ लागले आहेत. महत्वाचे म्हणजे 20 मेपर्यंत राज्यातील रेड झोन म्हणून घोषित झालेल्या काही जिल्ह्यातून पंढरपूर शहर व तालुक्‍यात चार हजार लोक आले आहेत. येत्या आठ दिवसात आणखी शेकडो लोक पंढरपूर शहर व तालुक्‍यात येणार आहेत. 

यासंदर्भात उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांना विचारले असता ते म्हणाले, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक , मालेगाव , नागपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला अशा रेडझोन भागातून वीस मेअखेर पंढरपूर शहर व तालुक्‍यात सुमारे चार हजार लोक आले आहेत. 31 मेपर्यंत हा आकडा सात हजारावर जाण्याची शक्‍यता आहे. हे लक्षात घेऊन पंढरपूर उपविभागातील नागरिकांनी तसेच सर्व व्यापाऱ्यांनी येत्या काळात अधिक दक्षता घेण्याची गरज आहे. शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे. बाजारात खरेदीसाठी गर्दी होऊ नये म्हणून नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे. बाजारपेठेत एकाच वेळी गर्दी झाल्यास सामुहिक संसर्गाची भीती नाकारता येत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त काळजी घ्यावी असे आवाहन उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The danger is growing the citizens of Pandharpur need to be more vigilant