ठाकरे सरकारने आपला नाकर्तेपणा केंद्रावर ढकलू नये : प्रवीण दरेकर

राजशेखर चौधरी 
Tuesday, 20 October 2020

ठाकरे सरकारने जबाबदारी झटकू नये. आपला नाकर्तेपणा केंद्रावर ढकलू नये. उद्धव ठाकरे यांनी स्वतःच मागणी केली होती की जिरायत 25 हजार तर बागायत क्षेत्राला 50 हजार रुपये देण्याची, आता त्यांचा शब्द त्यांनी पाळावा. ठाकरे यांना सत्ता मिळाली आहे आणि त्याचा सदुपयोग करावा, असा सल्ला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारला दिला. 

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट तालुक्‍यातील सांगवी (बु) येथील पूरस्थितीनंतर उद्भवलेल्या स्थितीचा विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा पाहणी दौरा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी, बोरी नदीवरील बंधारे पाहणी, गावातील रस्ते नादुरुस्त पाहणी आदींनी आरंभ झाला आहे. 

या वेळी त्यांच्यासोबत खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार राम सातपुते, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सचिन कल्याणशेट्टी, भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, तहसीलदार अंजली मरोड, गटविकास अधिकारी महादेव कोळी, सूर्यकांत वडखेलकर, मोतीराम राठोड, महेश हिंडोळे, परमेश्वर यादवाड, आनंद तानवडे, बसवंत कलशेट्टी, भीमाशंकर इंगळे, किरण केसूर, दयानंद उंबरजे, राजशेखर मसुती, खय्युम पिरजादे, राजेंद्र बंदीछोडे, गुंडप्पा पोमाजी, शिवशरण जोजन, मीलन कल्याणशेट्टी, अविनाश मडिखांबे, राहुल रुही, प्रदीप पाटील, राजशेखर चौधरी (संगोगी), कांतू धनशेट्टी आदींची उपस्थिती होती. 

या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना दरेकर म्हणाले, ठाकरे सरकारने जबाबदारी झटकू नये. आपला नाकर्तेपणा केंद्रावर ढकलू नये. उद्धव ठाकरे यांनी स्वतःच मागणी केली होती की जिरायत 25 हजार तर बागायत क्षेत्राला 50 हजार रुपये देण्याची, आता त्यांचा शब्द त्यांनी पाळावा. ठाकरे यांना सत्ता मिळाली आहे आणि त्याचा सदुपयोग करावा; तसेच केंद्र तरी मदत करणार आहेच आणि आम्ही ती मिळवू देखील; पण तुमचे काम काही आहे की नाही, याचा विचार करावा. अक्कलकोट तालुक्‍यातील नदीकाठचा शेतकरी पूर्ण उद्‌ध्वस्त झाला आहे. घरी जेवायला काही नाही, शेतातील पिके वाहून गेली आहेत. जमिनीवरची माती वाहून ती आता खडकाळ बनली आहे. त्याला आधार सत्वर हवा आहे. मदत दोन टप्प्यांची करावी. पहिला टप्पा तातडीचा पंधरा हजार द्यावा तसेच दुसऱ्या टप्प्यात झालेले सर्व नुकसान भरून द्यावे. ज्यांचे घर वाहून गेले आहे, त्यांना पक्के घर बांधून देण्याचे आश्वसन देऊन धीर दिला. त्यानंतर त्यांनी आंदेवाडी येथील चौकातील वाहून गेलेल्या शेतीची पाहणी केली आणि त्यांना धीर दिला, की आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू आणि तुम्हाला उभे करू. 

प्रारंभी दरेकर यांनी संगोगी (ब) येथील गावाजवळ पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने हतबल झालेल्या व नुकसानीची स्वतः घरी जाऊन भेट घेतली. त्या सर्वांना दिलासा देत, आपणास मदत मिळण्याकामी पाठपुरावा करू, अशी ग्वाही दिली. गावालगत बंद पडलेले वीज रोहित्र तातडीने दुरुस्त करावेत आणि रस्ते तातडीने दुरुस्त करून द्यावेत, अशी सूचना केली. संगोगी गावात बंधाऱ्यावरील ऊस, तूर व इतर शेती जमीनदोस्त झाली आहे. तिथले शेतकरी भवानराय बिराजदार व त्यांच्या पत्नी सिद्धम्मा यांनी दरेकर यांच्यासमोर अश्रू ढाळले व माझी अडीच एकर ऊसशेती व काळी जमीन माती वाहून जाऊन भले मोठे खड्डे पडल्याचे दाखविले. त्यांना दरेकर यांनी वैयक्तिक 25 हजारांची मदत देखील देऊ केली. 

त्यांनी संगोगी बंधारा तसेच रुद्देवाडी तसेच अंदेवाडी परिसराची पाहणी केली. या वेळी सर्व ठिकाणी नुकसानग्रस्त ग्रामस्थ तसेच स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकऱ्यांची उपस्थिती होती. 

दरेकर यांच्या दौऱ्याची वैशिष्ट्ये 

  • थेट शेतकरी बांधावर आणि नुकसान स्थळी भेट दिल्याने नागरिक समाधानी दिसले 
  • संगोगी बंधारा, पूर्ण रस्ता वाहून गेल्याने बोरिटीकडे जाणारी वाहतूक पूर्ण बंद 
  • शेतकरी वर्ग हा पूर्ण पिके वाहून गेल्याने आता करायचे काय या विवंचनेत 
  • ऊस, तूर व इतर पिकेही पुन्हा उभे राहण्याची शक्‍यता नाही 
  • संगोगी (ब) शेतकऱ्यास दरेकरांनी दिली वैयक्तिक 25 हजारांची मदत 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Darekar gave personal help of Rs. 25 thousand to the farmer