'आरटीई'अंतर्गत सवलतीच्या प्रवेशासाठी लागतात 'ही' कागदपत्रे ! 'एसईबीसी'साठी एक लाखाच्याच उत्पन्नाची मर्यादा

3RTE_Admission_0.jpg
3RTE_Admission_0.jpg

सोलापूर : बालकांचा मोफत व सक्‍तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार सर्व शाळांमध्ये 25 टक्‍के जागा राखीव ठेवल्या जातात. 'आरटीई'अंतर्गत 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी पालकांना अर्ज करण्यासाठी 3 ते 21 मार्च अशी मुदत देण्यात आली आहे.

अर्जासोबत लागणारी कागदपत्रे... 

  • निवासी पुरावा : रेशनकार्ड, वाहन परवाना, वीज, टेलिफोन बिल, प्रॉपर्टी टॅक्‍सची पावती, घरपट्टी, गॅस बूक, बॅंक पासबूक, आधार, मतदान कार्ड, पासपोर्ट यापैकी कोणताही एक कागदपत्र जोडावे. 
  • जन्म दाखला : ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका, रुग्णालयातील एएनएम रजिस्टरमधील दाखला, अंगणवाडी, बालवाडीतील रजिस्टर दाखला, आई-वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञा पत्राद्वारे केलेले स्वयं निवेदन, यापैकी एक पुरावा जोडावा. 
  • उत्पन्न दाखला : 15 मे 2018 च्या शासन निर्णयानुसार वंचित गटात विमुक्‍त जाती (अ), भटक्‍या जमाती (ब, क, ड), इतर मागासवर्ग (ओबीसी), विशेष प्रवर्ग (एसबीसी) या संवर्गांचा समावेश करण्यात आला. एससी, एसटी संवर्गातील पालकांना उत्पन्न मर्यादेची अट नाही. जात प्रमाणपत्राची गरज लागणार आहे. आर्थिक दुर्बल घटकातील (खुला) विद्यार्थ्यांच्या पालकांचा उत्पन्नाचा दाखला एक लाखांपेक्षा कमी उत्पन्नाचा असावा. 2021-22 मध्ये प्रवेश घेताना पालकांकडील 2019-20 व 2020-21 मधील उत्पन्न दाखला ग्राह्य धरावा. उत्पन्नाच्या दाखल्यासाठी पगारपत्रक, तहसिलदारांचा दाखला, एम्प्लॉयरचा दाखला ग्राह्य धरावा. 
  • घटस्फोटित महिला : न्यायालयाचा निर्णय, घटस्फोटित महिलेचा अथवा बालकाच्या आईचा रहिवाशी पुरावा, बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे अथवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला. 
  • न्यायप्रविष्ट घटस्फोट प्रकरणातील महिला : प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा, घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेचा तथा बालकाचा रहिवाशी पुरावा, बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास त्याच्या आईचा उत्पन्नाचा दाखला. 
  • विधवा महिला : पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, विधवा महिलेचा तथा बालकाचा रहिवासी पुरावा, बालक वंचित घटकातील असल्यास त्याच्या पालकाचा जातीचा दाखला आणि बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास पालकांचा उत्पन्नाचा दाखला जोडावा लागेल. 
  • अनाथ बालक व दिव्यांग बालक : अनाथ मुलांसाठी अनाथालयाची कागदपत्रे, अनाथ नसल्यास पालक सांभाळ करत असल्याचे हमीपत्र. तर दिव्यांग बालकांसाठी जिल्हा शल्यचिकित्स, वैद्यकीय अधिक्षक, अधिसुचित जिल्हा शासकीय रुग्णालयाचे 40 टक्‍क्‍यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक. 

आरटीईनुसार अर्ज करण्यासाठी पात्र असलेल्या पालकांनी अर्जातील संपूर्ण माहिती (घरचा पत्ता, जन्म दिनांक, उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र) अचूक भरणे आवश्‍यक आहे. अर्ज करण्यासंदर्भात पालकांना अडचणी आल्यास त्यांनी शहरातील महापालिकेचे प्रशासनाधिकारी, संबंधित तालुक्‍यांचे गटशिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. आरटीईअंतर्गत मुलांना सवलतीचा प्रवेश देताना एसईबीसी प्रवर्गातील मुलांचा वंचित गटात समावेश करण्यात आला आहे. पालकांनी अर्ज करताना सिंगल पॅरेंट पर्याय निवडला असल्यास संबंधितांनी जोडलेली कागदपत्रे प्रवेशासाठी ग्राह्य धरली जाणार आहेत. https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/rteindex या संकेतस्थळावर पालकांना अर्ज करता येईल अथवा प्रवेशासंबंधीची माहिती पाहता येणार आहे. पालकांनी चुकीची माहिती दिल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तर त्या विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द केला जाणार असून त्याची संपूर्ण फी पालकास भरावी लागणार आहे. यापूर्वी सवलत घेतलेल्यांना दुसऱ्यांदा संधी नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com