कर्ज व्यवस्थापनाचा पॅटर्न यशस्वी ; मनोरमा बॅंकेचा सलग दोन वर्षे एनपीए शुन्यावर 

प्रकाश सनपूरकर
Sunday, 17 January 2021

मनोरमा बॅंकेने मागील दोन वर्षापासून शून्य टक्के एनपीएचा आकडा कायम ठेवला आहे. त्यासाठी बॅंकेने कर्जदार हा घटक प्राधान्याचा भाग मानला. बॅंकेने कर्जदाराच्या कर्ज वसुलीचे व्यवस्थापन करत असताना काही  निकष निश्‍चित केले. 

सोलापूरः येथील मनोरमा को-ऑप बॅंकेने कर्जवसुली व्यवस्थापनाच्या पॅटर्न तयार करुन अमलात आणला आहे. या पॅटर्नचा परिणाम म्हणून सलग दोन वर्षे एनपीए (नॉन परफॉर्मिंग ऍसेट) शुन्यावर ठेवण्याची कामगिरी बॅंकेने केली आहे. कर्जदारांच्या कर्जवसुलीचे व्यवस्थापनाच्या माध्यमातून बॅंकेला हे उद्दीष्ट साधणे शक्‍य झाले आहे. 
मनोरमा बॅंकेने मागील दोन वर्षापासून शून्य टक्के एनपीएचा आकडा कायम ठेवला आहे. त्यासाठी बॅंकेने कर्जदार हा घटक प्राधान्याचा भाग मानला. बॅंकेने कर्जदाराच्या कर्ज वसुलीचे व्यवस्थापन करत असताना काही नवे निकष निश्‍चित केले. 
कर्जदार हा बॅंकेला उत्पन्न देणारा घटक आहे हे समजून घेत कर्जदाराच्या समस्यावर व्यवस्थापनाने लक्ष केंद्रित केले. तेव्हा बॅंक व्यवस्थापनाला अनेक नव्या गोष्टी अनुभवता आल्या. एकतर प्रत्येक कर्जदार त्याच्या कर्जाचा हफ्ता नियमित भरण्यास तयार असतो. मात्र, केवळ काही तांत्रिक समस्या सोडवण्यापूरती मदत मिळली तर वसुली नियमित राहते. बॅंकेतील प्रत्येक कर्मचाऱ्यास कर्जदाराच्या संपर्कात राहण्याची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे कर्जदाराच्या बहुतांश अडचणीची स्पष्ट कल्पना बॅंक कर्मचाऱ्यांना मिळत राहिली. तसेच कर्जवसुलीतील नियमितता सातत्याने वाढत असल्याचे दिसून आले. तसेच कर्जदारांच्या स्वतःच्या आर्थिक व्यवस्थापनाचे नियोजन योग्य झाले की कर्जवसुली अधिक सोपी होते. हे कर्जदाराच्या समुपदेशन व संवादातून साधता आले. केवळ योग्य संवादातून कर्जवसुलीचे सर्वच प्रश्‍न सुटू शकतात हे स्पष्ट झाले. 
या संवादामुळे कर्ज दिल्यानंतर पहिल्याच महिन्यापासून कर्जवसुलीचा हफ्ता सुरळीत होत असल्याचे दिसून आले. बॅंकेने देखील आर्थिक वर्ष मार्चमध्ये संपले की लगेच एप्रिलपासून कर्जवसुलीबाबत मायक्रोप्लॅनिंगने कामाचे नियोजन केले. त्यामुळे संपूर्ण वर्षभर कर्जवसुलीची नियमितता अधिक काटेकोर करणे शक्‍य झाले. विशेष म्हणजे लेखापरिक्षकांनी एनपीएचा आकडा शून्य असल्याचे नोंदवले तरी त्याची फेरतपासणी रिझर्व्ह बॅंकेकडून केली जाते. या फेरतपासणीमध्ये शून्य टक्के एनपीएवल यावर शिक्कामोर्तब झाले. 

कर्जवसुली व्यवस्थापनाचा पॅटर्न 
- कर्जदारांशी नियमित संवाद व समुपदेशन 
- कर्जवसुलीचे पहिल्या महिन्यापासून सुक्ष्म नियोजन 
- सर्व कर्मचाऱ्यांचा कर्जदाराशी थेट संपर्क 
- कर्जदाराच्या आर्थिक व्यवस्थापनाचे निरीक्षण 
- कर्जदाराच्या अडचणी सोडवण्यासाठी मदत 

कर्जदार महत्वाचा घटक 
बॅकेने सातत्याने पारदर्शकतेची परंपरा जपत असताना कर्जदार हा महत्त्वाचा घटक मानून त्यावर लक्ष केंद्रीत केले. यावर्षी कोरोनाचे संकट असले तरी पुर्वीप्रमाणेच उत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न बॅंकेकडून केला जात आहे. 
- श्रीकांत मोरे, अध्यक्ष, मनोरमा को-ऑप. बॅंक, सोलापूर.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Debt management pattern successful; Manorama Bank's NPA at zero for two consecutive years