पंचनामे करत वेळ घालवण्यापेक्षा द्या सरसकट हेक्‍टरी 50 हजार रुपये मदत : "स्वाभिमानी'ची मागणी 

हुकूम मुलाणी 
Saturday, 17 October 2020

चित्राच्या नक्षत्रामध्ये तालुक्‍यामध्ये सर्वदूर दमदार पावसाच्या हजेरीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून वेळ वाया घालवण्यापेक्षा सरसकट हेक्‍टरी 50 हजार रुपये मदत करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्याकडे करण्यात आली.

मंगळवेढा (सोलापूर) : चित्राच्या नक्षत्रामध्ये तालुक्‍यामध्ये सर्वदूर दमदार पावसाच्या हजेरीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून वेळ वाया घालवण्यापेक्षा सरसकट हेक्‍टरी 50 हजार रुपये मदत करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्याकडे करण्यात आली. 

निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र युवा आघाडीचे ऍड. राहुल घुले, तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार, शंकर संगशेट्टी ,दिलीप खडतरे, अशोक हत्ताळी, सचिन जिगजेणी, सोमशंकर मलगोडे यांच्या सह्या आहेत. निवेदनात म्हटले, की अतिवृष्टीमुळे तालुक्‍यातील फळपिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले खरिपाचे पीक वाया गेले तर रब्बीची पेरणी लांबणीवर पडली. सध्या पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले असले तरी गावपातळीवर हे अधिकार तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांना दिले आहेत. परंतु या तिन्ही खात्यांकडे कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्यामुळे पंचनामा करण्यासाठी विलंब लागणार आहे. त्यामुळे नुकसानीची निश्‍चित आकडेवारी काढण्यास व भरपाई मिळण्यास उशीर होणार आहे. नुकसान हे ठराविक शेतकऱ्यांचे नसून सरसकट शेतकऱ्यांचे झाले आहे. 

शिवाय हवामानावर आधारित कृषी पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठीची माहिती मोबाईल ऍपवर भरावयाचे आहे. मात्र पाऊस आतापर्यंत टप्प्या-टप्प्याने पडला असल्यामुळे नुकसानीत कोणत्या तारखेला पाऊस दाखवायचा, हाही प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. कारण, त्या दिवशी पडलेल्या पावसाच्या नोंदीवर नुकसान निश्‍चित होणार नाही. त्यामुळे आतापर्यंत पडलेल्या पावसाचा विचार करता, विमा भरला किंवा नाही भरला हा नियम बाजूला सारून आता सरसकट सारासार विचार करून भरपाई देण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for assistance of rs 50 thousand per hectare for damaged crops