पुण्याला जाणारा रस्ता 24 तास सुरु ठेवा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 मार्च 2020

जिल्हा बंदीचा निर्णय झाल्यानंतर पुणे- मुंबईकडील लोकांचा लोंढा थोपवण्यासाठी पोलिसांनी कोंढारचिंचोल येथील डिकसळ पुल मुरमाचा भरावा टाकून पुर्णपणे वाहतुक बंद केली.

करमाळा (सोलापूर) : कोंढारचिंचोली (ता. करमाळा) येथील सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर डिकसळ पुल येथे खोदलेला रस्ता व टाकलेला मुरमाचा भरावा काढुन रस्ता पुर्ववत करून बॅरेकेट बसवुन 24 तास पोलिस बंदोबस्त रस्ता सुरू ठेवावा व सोलापूर जिल्हा कोरोना पासुन वाचवावे, अशी मागणी कोंढारचिंचोली ग्रामपंचायत व अपत्ती व्यवस्थापन समीतीच्या वतीने पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांच्याकडे केली आहे. 
जिल्हा बंदीचा निर्णय झाल्यानंतर पुणे- मुंबईकडील लोकांचा लोंढा थोपवण्यासाठी पोलिसांनी कोंढारचिंचोल येथील डिकसळ पुल मुरमाचा भरावा टाकून पुर्णपणे वाहतुक बंद केली. दरम्यान कोंढारचिंचोल येथील शिवाजी सोपान डफळे यांचा ह्रदयविकाराच्या झटक्‍याने वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. त्यांना भिगवण येथे उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यावर मुरमाचा भरावा घालुन व रस्ता खोदुन बंद केला. त्या ठिकाणाहून पुढे उपचारासाठी घेणे जाण्यास वेळ लागला त्यामुळेच शिवाजी डफळे यांचा मृत्यू झाला. यानंतर करमाळा पोलिसांनी आपली बाजु मांडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान सोलापूरकडे जाणारा मार्ग भीमानगर येथे बंद केल्याने या डिकसळ पुलावरून सोलापूर, हौद्रबादकडे जाणारा पुणे- मुंबई कडील प्रवाशी जाऊ शकतात याबाबत कोंढारचिंचोल व टाकळी या डिकसळ पुलाजवळच्या गावांनी जबाबदारी घेण्याचे आव्हान करमाळा पोलिसांनी केले. त्यानंतर शनिवारी (ता. 28) कोंढारचिंचोल ग्रामपंचायत व आपत्ती व्यवस्थापन समीतीच्या वतीने रस्ता अत्यावश्‍यक सेवांसाठी सुरू करून 24 तास पोलिस सेवा देण्याची मागणी केली आहे. या निवेदनावर सरपंच निलिमा दिलीप गलांडे, गावकामगार तलाठी जे. एस. गोडसे, अंगणवाडी सेविका एस. आर. धुमाळ, उज्वला राऊत, हनुमंत भोसले, महादेव कांबळे, दुर्गा गलांडे, अलका गलांडे, सुरेश गोडगे, कांदा धमाले, मनीषा कांबळे, व्ही. गवळी, कुसुम धांडे, डॉ. प्रशांत पाटील, तलाठी जे. एस. गोडसे यांच्या सह्या आहेत. 

हा रस्ता वाहतुकीसाठी बंद

कोंढारचिंचोली ग्रामपंचायतीने पत्र दिले असले तरी या रस्त्यावरील डिकसळ पुल हा ब्रिटिशकालीन पुल असुन हा पुल धोकादायक असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केलेला आहे. तशा आशयाचा फलकही येथे लावला आहे. तरीही येथुन प्रवाशी ये- जा करतात. त्यामुळे या ठिकाणी बॅरेकेट बसवुन पोलिस बंदोबस्त देऊ शकत नाही. या रस्त्याचा काय निर्णय घेयचा तो सार्वजनिक बांधकाम विभागाने घ्यावा. याबाबत करमाळा पोलिस स्टेशनकडुन सार्वजनिक बांधकाम विभागाला तसे पञही दिले आहे. 
- श्रीकांत पाडुळे, पोलिस निरीक्षक, करमाळा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for removal of fill on dikasl bridge