सांगोला तालुक्‍यातील खतांचा काळाबाजार रोखा; अन्यथा आंदोलन! "या' संघटनेने दिला इशारा 

Sangola
Sangola

महूद (सोलापूर) : चालू हंगामात पाऊस समाधानकारक पडत असल्याने सांगोला तालुक्‍यात खरीप पिकांची मोठ्या प्रमाणावर पेरणी झाली आहे. मात्र सांगोला तालुक्‍यात खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करून खते चढ्या दराने विकली जात आहेत. याबाबत तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांनी खतांचा काळाबाजार करणाऱ्यावर कठोर कारवाई करून शेतकऱ्यांना खते उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी सांगोला तालुका पुरोगामी युवक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. 

शेतकरी कामगार पक्ष अंतर्गत असलेल्या सांगोला तालुका पुरोगामी युवक संघटनेच्या वतीने तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात संघटनेने म्हटले आहे की, चालू हंगामात आतापर्यंत समाधानकारक पाऊस पडलेला आहे व पडतो आहे. गेल्या अनेक वर्षांतून खरीप पिकासाठी पोषक वातावरण असल्याने सांगोला तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पेरणी करून पिके उभी केली आहेत. या पिकांना रासायनिक खतांची आवश्‍यकता आहे. मात्र, तालुक्‍यातील अनेक भागांत रासायनिक खतांचा विशेषतः युरियाचा तुटवडा भासू लागला आहे. शेतकरी खत विक्रेत्यांकडे वारंवार हेलपाटे मारत आहेत. यावर विक्रेते युरिया शिल्लक नसल्याचे सांगतात आणि पुन्हा हीच खते चढ्या दराने शेतकऱ्यांना विकली जात आहेत. रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करून त्यांचा चालू असणारा काळाबाजार रोखावा. ज्यादा पैशांसाठी शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या खत विक्रेत्यांवर कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना युरिया व खते योग्य त्या दरामध्ये उपलब्ध व्हावीत यासाठी आपल्या स्तरावर योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी पुरोगामी युवक संघटनेने दिलेल्या निवेदनात केली आहे. निवेदनाची प्रत माजी आमदार डॉ. गणपतराव देशमुख यांनाही देण्यात आली आहे. पुरोगामी युवक संघटनेचे सांगोला तालुकाध्यक्ष दीपक गोडसे, हनुमंत कोळवले, ऍड. धनंजय मेटकरी, अक्षय बोत्रे, शंकर माने आदी निवेदन देताना उपस्थित होते. 

सांगोला तालुका पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष श्री. गोडसे म्हणाले, सांगोला तालुक्‍यातील रासायनिक खतांचा काळाबाजार रोखून शेतकऱ्यांना योग्य दरात खते उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करावी; अन्यथा माजी आमदार डॉ. गणपतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्‍यात आंदोलन केले जाईल. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com