ह.भ.प. रामदास महाराज कैकाडी (जाधव) यांचे निधन; वारकरी संप्रदायामध्ये शोककळा 

भारत नागणे 
Friday, 25 September 2020

संत कैकाडी बाबांचे पुतणे आणि येथील संत कैकाडी महाराज पुण्यधाम मठाचे विश्वस्त, प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. रामदास महाराज कैकाडी (जाधव) (वय 77) यांचे आज कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या निधनाने वारकरी सांप्रदायामध्ये शोककळा पसरली आहे. 

पंढरपूर (सोलापूर) : संत कैकाडी बाबांचे पुतणे आणि येथील संत कैकाडी महाराज पुण्यधाम मठाचे विश्वस्त, प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. रामदास महाराज कैकाडी (जाधव) (वय 77) यांचे आज कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या निधनाने वारकरी सांप्रदायामध्ये शोककळा पसरली आहे. 

मागील पंधरा दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर अकलूज येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शुक्रवारी (ता. 25) दुपारी त्यांचे निधन झाले. मनमाड हे त्यांचे मूळ गाव होते. वारकरी सांप्रदायामध्ये त्यांना मानाचे स्थान होते. संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांची नितांत श्रद्धा होती. संत गाडगेबाबा आणि संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा पगडा होता. समाजातील अंधश्रद्धा, बुवाबाजी याविषयी ते आपल्या कीर्तनातून परखडपणे मत मांडत असत. बहुजन समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी तळमळीने काम केले. संत तुकाराम महाराज बीजेच्या निमित्ताने देहू ते पंढरपूर अशी विठ्ठल पालखी रथ सोहळ्याची परंपरा त्यांनीच सुरू केली होती. 

येथील विश्व पुण्यधामच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता. पुण्य धाममधूनच संत कोंडीराम काका आणि रामदास महाराज जाधव यांनी जगाला अध्यात्म, विज्ञान आणि शांतीचा संदेश दिला आहे. सामाजिक समतेच्या विचारावर उभारलेल्या येथील विश्व पुण्यधामाला देशभरातील अनेक विठ्ठलभक्त, पर्यटक आणि विचारवंतांनी भेटी दिल्या आहेत. 

रामदास महाराज जाधव यांनी आपल्या कीर्तनातून अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी, प्रथा आणि परंपराविषयी जनजागृती केली. कीर्तनातून त्यांनी संत गाडगेबाबा आणि संत तुकाराम महाराजांची विचारधारा अधिक लोकांपर्यंत पोचवली. हे काम करत असताना त्यांना अनेकवेळा वारकरी संप्रदायातील काही तथाकथित महाराज मंडळींकडून अवहेलना देखील सहन करावी लागली. त्यांचे वारकरी संप्रदायातील स्थान लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री (कै.) विलासराव देशमुख यांनी त्यांची विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीवर अध्यक्ष म्हणून निवड केली होती. परंतु राजकीय साठमारीमध्ये समितीचे अध्यक्षपद हे त्यांच्यासाठी औटघटकेचे ठरले होते. 

गरीब, अपंग, कुष्ठरोगी आणि निराधार लोकांच्या सेवेसाठी त्यांनी अनेक वर्षे काम केले. त्यांच्या मठामध्ये आजही अन्नदान सेवा सुरू आहे. त्यांनी येथील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे अनेक वर्षे सदस्य म्हणून काम पाहिले. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्‍चात मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The demise of Ramdas Maharaj Kaikadi (Jadhav) created an atmosphere of grief in the Warkari sect