टेंभुर्णी उपजिल्हा रुग्णालय निर्मितीसाठी उपमुख्यमंत्री पवार सकारात्मक : आमदार बबनराव शिंदे 

संतोष पाटील 
Friday, 4 September 2020

आमदार बबनराव शिंदे यांनी फेब्रुवारीमध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन टेंभुर्णी येथील उपजिल्हा रुग्णालयासंदर्भात चर्चा केली होती. त्या वेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रस्तावातील त्रुटी पूर्ण करून फेरप्रस्ताव शासनाकडे सादर करावा, अशी सूचना आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार प्रस्ताव आरोग्य विभागाने शासनास सादर केलेला आहे. 

टेंभुर्णी (सोलापूर) : टेंभुर्णी (ता. माढा) येथे 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय निर्मितीसाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांच्याकडे केली असून, श्री. पवार हे उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी देण्याबाबत सकारात्मक असल्याची माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली. 

हेही वाचा : "या' योजनांतील भूसंपादनाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित जमा करा : आमदार शहाजी पाटील 

आमदार बबनराव शिंदे म्हणाले, टेंभुर्णी हे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचे शहर आहे. तेथील लोकसंख्या सुमारे वीस हजारांहून अधिक आहे. तसेच पंढरपूर, अहमदनगर, शिर्डी येथे जाणाऱ्या व येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. टेंभुर्णी येथे एमआयडीसी विकसित झालेली असून, परिसरातील 40 ते 50 गावांतील लोक तेथे दैनंदिन ये-जा करतात. सध्या या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहे. राष्ट्रीय महामार्गावरील अपघातग्रस्तांना व परिसरातील रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत म्हणून टेंभुर्णी येथे उपजिल्हा रुग्णालय होण्याची मागणी येथील जिल्हा परिषद सदस्य अंजनादेवी पाटील, जिल्हा दूध संघाचे माजी संचालक शिवाजीराव पाटील- चांदजकर, माजी कृषी सभापती संजय पाटील- भीमानगरकर, टेंभुर्णीचे सरपंच प्रमोद कुटे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील, विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे संचालक बबनराव पाटील, पंचायत समिती सदस्या प्रज्ञा कुटे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष रावसाहेब देशमुख, टेंभुर्णी येथील बशीर जहागीरदार आदींनी केली आहे. 

हेही वाचा : वडिलांनी स्वप्न दाखवले अन्‌ मुलाने केले पूर्ण; मुलगा अप्पर पोलिस अधीक्षकपदी ! 

आमदार बबनराव शिंदे यांनी फेब्रुवारीमध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन टेंभुर्णी येथील उपजिल्हा रुग्णालयासंदर्भात चर्चा केली होती. या वेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रस्तावातील त्रुटी पूर्ण करून फेरप्रस्ताव शासनाकडे सादर करावा, अशी सूचना आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार प्रस्ताव आरोग्य विभागाने शासनास सादर केलेला आहे. 

आमदार शिंदे म्हणाले, टेंभुर्णी उपजिल्हा रुग्णालयाला प्रशासकीय मान्यता देण्यासाठी माझा शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू असून, आरोग्य विभागाकडून सर्व बाबींची पूर्तता करून घेऊन सध्या याबाबतचा प्रस्ताव वित्त व नियोजन विभागाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र सध्याची निर्माण झालेली कोरोनाची परिस्थिती यामुळे नवीन प्रकल्पासाठी मंजुरी व निधी देण्याकरिता शासनाने स्थगिती दिलेली आहे. मात्र माढा तालुक्‍यामध्ये उपजिल्हा रुग्णालय नाही. टेंभुर्णीची लोकसंख्या वीस हजारांवर असून, त्या ठिकाणी 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी मंजुरी व निधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे. ते मंजुरी देण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेतील. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy Chief Minister Ajit Pawar is positive about the creat of Tembhurni Sub District Hospital