परिचारकांचा प्रश्‍न पालकमंत्र्यांनी मनावर घेतला अन्‌ अजित पवारांनी चुटकीसरशी सोडविला ! 

प्रमोद बोडके
Tuesday, 26 January 2021

अतिवृष्टीत सोलापूर जिल्ह्यातील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. आमदार प्रशांत परिचारक यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बंधाऱ्यांच्या दुरुस्तीला वाचा फोडली. सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हा प्रश्‍नावर मनावर घेतला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा प्रश्‍न निकाली काढला. 

सोलापूर : अतिवृष्टीत सोलापूर जिल्ह्यातील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. आमदार प्रशांत परिचारक यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बंधाऱ्यांच्या दुरुस्तीला वाचा फोडली. सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हा प्रश्‍नावर मनावर घेतला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा प्रश्‍न निकाली काढला. 

जलसंपदामंत्री जयंत पाटील बाहेरगावी असल्याने बंधारे दुरुस्तीची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लावा, अशी विनंती आमदार संजय शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी क्षणाचाही विलंब न करता आमदार परिचारकांच्या मागणीवर व आमदार संजय शिंदे यांच्या विनंतीवरून जिल्ह्यातील बंधारे दुरुस्तीची बैठक सोमवारी (ता. 25) घेण्याचे शनिवारी (ता. 23) झालेल्या सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जाहीर केले होते. सोमवारी (ता. 25) पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील बंधारे दुरुस्तीच्या विषयावर तत्काळ बैठक घेतली. आमदार परिचारक यांनी मांडलेला प्रश्‍न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत चुटकीसरशी सोडविला. सोलापूर जिल्ह्यातील बंधाऱ्यांसाठी 13 कोटी 50 लाख रुपयांचा निधी देण्याचे तत्त्वत: मान्यही केले आहे. 

बंधारे दुरुस्तीसाठी आपण सोलापूर जिल्ह्याला निधी दिला असल्याचा समज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा झाला होता. निधी मिळाला नसल्याचा मुद्दा आमदार परिचारक यांनी या बैठकीत निदर्शनास आणून दिला. त्यासाठी त्यांनी मदत व पुनर्वसनचे राज्याचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून खातरजमाही केली. सोलापूर जिल्ह्यातील बंधाऱ्यांचे एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना तुम्ही मला का कल्पना दिली नाही? अशी कानउघाडणीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांची केली. 

जिल्ह्यातील बंधारे दुरुस्तीसाठी दिलेला 13 कोटी 50 लाख रुपयांचा निधी तातडीने खर्च करा. कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी मार्गी लावा, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिल्या. या बैठकीला पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार प्रशांत परिचारक, आमदार शहाजी पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे, भगीरथ भालके आदी उपस्थित होते. 

सोलापूर जिल्ह्यातील भीमा, सीना, नीरा, बोरी नदीवरील जवळपास 35 कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांचे नुकसान झाले आहे. बंधाऱ्यांचे भराव वाहून गेले आहेत. त्यामुळे या बंधाऱ्यांवर असलेल्या पाणीपुरवठा योजनांना पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करताना अडथळे येत आहेत. पावसाळ्यापूर्वी बंधाऱ्यांची दुरुस्ती न झाल्यास आगामी काळात कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्‍यता असल्याने हा प्रश्‍न जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत व सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मांडला आहे. 
- प्रशांत परिचारक, 
आमदार 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy Chief Minister Ajit Pawar promised to provide funds for repairing dams in the district