
महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे आणि विभागीय अधिकारी नीलकंठ मठपती यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा काळे यांच्यावर सदर बझार पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
सोलापूर : महापालिकेचे उपमहापौर राजेश काळे यांच्याविरुद्ध दुसऱ्यांदा खंडणी मागितल्याप्रकरणी शहर पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे उपमहापौर राजेश काळे हे आता चांगलेच अडचणीत आले असून, त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांकडून त्यांची शोधमोहीम सुरू झाली आहे.
महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे आणि विभागीय अधिकारी नीलकंठ मठपती यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा काळे यांच्यावर सदर बझार पोलिस ठाण्यात कलम 353, 385, 504, 506, 294 यानुसार दाखल झाला आहे. महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
जुळे सोलापूर परिसरात मेहता प्रशालेच्या प्रांगणावर लोकमंगल परिवाराच्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यात सुविधा उपलब्ध करण्याच्या पार्श्वभूमीवर संतापलेल्या राजेश काळे यांनी महापालिकेचे आयुक्त, उपायुक्त आणि विभागीय अधिकारी यांना फोनवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. आपण उपमहापौर आहोत, याची जाणीव अधिकाऱ्यांनी ठेवायला पाहिजे, अधिकारी बाहेरचे आहेत, आपण स्थानिक आहोत, असंही काळे यांनी म्हटलं होतं.
आरोग्य विभागातील कामं आपण सांगेल त्या कंत्राटदाराला देण्यात यावी, मला टक्केवारी दिल्याशिवाय कोणाचीही कामे मंजूर करू नका, याशिवाय मी अनेक लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून अनेकांना कामाला लावले आहे, अधिकाऱ्यांवर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून मी अधिकाऱ्यांना कामाला लावू शकतो, असंही काळे यांनी म्हटलं होतं. आयुक्त, उपायुक्त, विभागीय आयुक्त यांना काळे यांनी धमकीही दिली आहे.
"लोकमंगल'कार आणि भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांचे कट्टर समर्थक असलेले राजेश काळे लोकमंगल विवाह सोहळ्याच्या निमित्ताने सुविधा निर्माण करण्याच्या प्रकरणात अधिकाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून चांगलेच अडचणीत आले आहेत. सदर बझार पोलिसांकडून काळे यांचा शोध सुरू आहे.
मला वेठीस धरणाऱ्यांचा एक ना एक दिवस छडा लागतोच
माझा निर्भीडपणा व अन्याय सहन न करण्याची विचारधारा नेहमी मला वादग्रस्त ठरवते. केवळ मी चुकीचे काम दर्शवून देतो आणि या गोष्टी अनेकांना खटकतात, का तर त्यांची आर्थिक कुचंबणा होते. शासकीय कामात जनतेचे हक्क हिरावून घेऊ पाहणाऱ्यांवर माझी करडी नजर असते, पण हे काय अधिकारी व राजकीय मंडळींच्या पचनी पडत नाहीत. सदैव मला माझ्या कामात अडथळे निर्माण करतात व वादात्मक ठरवून देऊन त्याला वेगळा रंग लावतात. मी पारधी समाजातून येऊन उच्च शिक्षण घेऊन राजकारणात उपमहापौरसारखे पद भूषवित आहे, हे बऱ्याच लोकांना खटकते व माझी नाहक बदनामी करून माझे मनोबल तोडण्याचा प्रयत्न करतात. पण मी खचणाऱ्यांपैकी नाही, मला बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने पूर्ण हक्क दिला आहे, माझे मत मांडायचा. चुकीच्या अफवा पसरवून मला वेठीस धरणाऱ्यांचा एक ना एक दिवस छडा लागतोच, सत्याचा विजयच होत असतो.
- राजेश काळे,
उपमहापौर, महापालिका
संपादन : श्रीनिवास दुध्याल