नसानसांत क्रिकेट भिनलेला आकाश विचारतो, "ज्यांच्याकडे लाखो रुपये आहेत त्यांनीच खेळात पुढे जायचे का?' 

Akash Rathod
Akash Rathod

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट शहरातील शिवाजीनगर येथे राहणाऱ्या आकाश राठोड याचा क्रिकेटचा खेळ हा त्याच्या नसानसात भिनलेला व उत्कृष्ट असा आहे. असे असूनही घरच्या आर्थिक तसेच संघात समावेशासाठी सतत येत असलेल्या समस्येने योग्य दिशाही मिळेनाशी झाली आहे. त्याचा खेळ हा उच्च दर्जाचा असूनही यशासाठी सध्या गावोगाव भटकून क्रिकेट खेळण्याचे आणि स्थानिक खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचे काम मात्र नित्याचे होऊन बसले आहे. 

शिवाजीनगरच्या आकाश राठोड याचे वडील विश्वनाथ हे मिळेल तिथे मोलमजुरी करतात आणि कुटुंबाचा चरितार्थ चालवितात. आकाशचे शिक्षण बीएस्सी भौतिकशास्त्र पूर्ण असून त्याला लहानपणापासूनच क्रिकेटचे वेड आहे आणि त्यातून त्याची उत्कृष्ट फलंदाजी व गोलंदाजी करणे सुरू झाले. खेळही बहरत गेला. त्याला पुढे ओढ लागली ती तालुका, जिल्हा तसेच वेगवेगळ्या राज्यांच्या संघातून खेळण्याची. त्यासाठी तो प्रयत्न करीत राहिला. त्यास प्रत्येक ठिकाणी ओळख आणि संघात समावेश होण्यासाठी भरावयाची विशिष्ट रक्कम यामुळे सारखी अडचण येत गेली आणि त्यातून तो सारखा संघाबाहेर राहात गेला. त्याला थोडेबहुत यश मिळाले ते हैदराबाद टायटन, गोवा व मध्य प्रदेश येथील संघाबरोबर खेळण्याच्या मिळालेल्या संधीने. आजपर्यंत त्याने अंबाती रायडू, राहुल त्रिपाठी, ऋतुराज गायकवाड या तिन्ही आयपीएल खेळाडूंबरोबर क्रिकेट खेळले आहे आणि चांगले यश देखील मिळालेले आहे. 

आपल्या समस्येबाबत "सकाळ'शी बोलताना आकाश म्हणाला, आजपर्यंत मला जिल्हा पातळीवर खेळण्यासाठी कुणीही सहकार्य केले नाही. स्थानिक पातळीवर आमदार व खासदार यांनी लक्ष घालून मला मदत केल्यास मी निश्‍चित दमदार कामगिरी करून दाखविणार आहे. जिल्हा क्रीडा खातेसुद्धा याबाबत जागरूक नाही. आपली स्थानिक मुले पुढे जातात तर त्याला सहकार्याची भूमिका घेतली जात नाही. फक्त ज्यांच्याकडे लाखो रुपये आहेत त्यांनीच खेळात पुढे जायचे का? गरीब घरातील मुले कौशल्य असूनही आर्थिक अडचणीने पुढे जायचेच नाही का? याची खंत मात्र मला सतत सतावत आहे. 

आकाश हा सध्या अक्कलकोट तालुका, सोलापूर, मराठवाडा परिसर, विजयपूर, अफझलपूर, कलबुर्गी, शहाबाद, गाणगापूर आदी भागातील संघांकडून बोलावणे आल्यास जातो आणि तिथे चमकदार कामगिरी करून संघांना विजय मिळवून देतो. त्या मिळालेल्या मानधनातून आपले क्रिकेट साहित्य जसे बॅट, बॉल, ग्लोव्ह्‌ज, पॅड आदी साहित्य विकत घेतो आणि आपले किरकोळ खर्च देखील भागवत असतो. त्याला आजपर्यंत आनंद स्पोर्टस क्‍लबचे रणजीपटू खेळाडू प्रवीण देशेट्टी यांचे मात्र आर्थिकसह सर्व बाबतीतही सहकार्य मिळाले आहे. 

स्वतःची निराशा लपवत खेळाडूंना मार्गदर्शन 
आकाशने सध्या आपल्या स्वतःला संधी मिळेल किंवा नाही याची वाट पाहात निराश न होता आपल्या तालुक्‍यातील गुणी खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचे काम हाती घेतले आहे. लॉकडाउनपूर्वी मंगरुळे प्रशालेच्या मैदानावर दररोज 70 मुलांचा मोफत क्रिकेट शिकविणे व सराव घेण्याचे काम करीत होता. आजच्या घडीलाही वीसेक मुलांना प्रशिक्षण देत आहे. त्यासाठी त्याने श्री स्वामी समर्थ स्पोर्टस क्‍लबची स्थापना केली आहे. दररोज तीन ते सहा या वेळेत सराव घेऊन दर रविवारी त्यांचा सराव सामना घेत आहे. 

आकाश राठोड म्हणतो, माझ्यात गुणवत्ता असूनही मला ओळख व आर्थिक अडचणीने जिल्हा व राज्य संघात स्थान मिळत नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी व स्वयंसेवी संस्था यांनी सहकार्य करावे जेणेकरून मी माझी गुणवत्ता सिद्ध करून पुढे जाऊ शकेन. घरची गरिबी ही माझ्या विकासात अडथळा ठरू नये, ही माझी अपेक्षा आहे. आता याशिवाय मी पोलिस प्रशिक्षण सुद्धा घेऊन सराव करीत आहे. निदान त्यात तरी यशस्वी होईन याची आशा आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com