कॉंग्रेस पाळत नाही आघाडीचा धर्म ! कोठे म्हणाले, मुख्यमंत्र्यांना सांगणार कॉंग्रेसच्या करामती

तात्या लांडगे
Saturday, 31 October 2020

शिवसेना विरोधी पक्षनेत्यांना आश्‍वासनाचा विसर
मागच्यावेळी परिवहन सभापती शिवसेनेचा झाला. त्यावेळी कॉंग्रेसने शिवसेनेला मदत केली होती आणि पुढच्यावेळी परिवहन सभापती कॉंग्रेसचा होण्यासाठी शिवसेना मदत करेल, असे ठरले होते. त्यासाठी मी दोनदा विरोधी पक्षनेते महेश कोठे यांच्या दालनात भेटायला गेलो होते. तरीही त्यांनी आता परिवहन समितीचा सभापती निवडताना कॉंग्रेससोबत काहीच चर्चा केली नाही. दिलेला शब्द शिवसेनेने पाळला नाही. तरीही आता 'जे झाले ते गंगेला मिळाले' असे समजून पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे पदाधिकारी काम करतील, असा विश्‍वास आहे.

सोलापूर : राज्यात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस महाविकास आघाडीची सरकार स्थापन झाले. मात्र, सोलापूर महापालिकेत पक्षीय राजकारणाला बगल देऊन सोयीच्या राजकारण केले जात असल्याची चर्चा आहे. भाजपमधील एका ज्येष्ठ नगरसेवकाला विषय समित्यांचा सभापती करण्यासाठी कॉंग्रेसचे काही नेते भाजपसोबत जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी केला आहे. सत्तेची समिकरणे बदलूनही कॉंग्रेसने शिवसेनेविरुध्द केलेल्या कारस्थानाचा अहवाल पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पाठविला जाईल, असेही कोठे यांनी 'सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले.

महापालिकेचे यंदा वार्षिक बजेटच झाले नाही, नागरिकांना चार ते सहा दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. करवसुली खूपच कमी असल्याने नगरसेवकांना विकासकामांसाठी पुरेसा भांडवली निधी मिळालेला नाही, कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाचा विषय प्रलंबित आहे. काही दिवसांपूर्वी आर्थिक परिस्थितीचे कारण देत दोनशे सफाई कर्मचाऱ्यांना घरी बसविले. कोरोनाच्या नावाखाली अधिकाऱ्यांनी मंजुरीशिवाय कोट्यवधींचा खर्च केला आणि त्यात गैरव्यवहार झाल्याचा संशयही सभागृहात व्यक्‍त करण्यात आला. स्मार्ट सिटीच्या कामांत दिरंगाई व गुणवत्तेचा प्रश्‍न, असे अनेक विषय महत्त्वाचे आहेत. मात्र, विरोधक एकमेकांकडे बोट दाखवून मोकळे होत आहेत. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असतानाही महापालिकेत मात्र, कॉंग्रेस- शिवसेना आमने-सामने पहायला मिळत आहे. त्यावर कॉंग्रेसचे शहराध्यक्ष म्हणतात, मी महापालिकेचा सदस्य नसून त्याबद्दल गटनेत्यांकडून माहिती घ्यावी लागेल. आमचे सर्व निर्णय ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे या घेतात. तर शिवसेनेचे विरोधी पक्षनेते महेश कोठे म्हणतात की कॉंग्रेस मदत करत नाही. दरम्यान, जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आमदार तानाजी सावंत नॉट रिचेबल असल्याने आणि संपर्कमंत्री शंकरराव गडाख यांचा सोलापूर दौरा अद्याप निश्‍चित नसल्याने कोठेंनी पाठविलेल्या अहवालावर पक्षप्रमुख काय भूमिका घेतात, याची उत्सुकता आहे.

'स्वच्छता व उपविधी'वर कॉंग्रेसची दुटप्पी भूमिका
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने आणि महापालिकेत स्वच्छता व आरोग्य उपविधी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनेच घेतल्याने शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सावध भूमिका घेतली. दुसरीकडे कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या सोलापुकरांना स्वच्छता व आरोग्य उपविधी कराचा बोजा नको, अन्यथा कॉंग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशारा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी निवेदनाद्वारे दिला होता. मात्र, निवेदन देऊन एक महिना होऊनही कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांना त्या इशाराची आठवण झालेली नाही. त्यामुळे कॉंग्रेसच्या दुटप्पी भूमिकेवरुन शहरवासियांमध्ये नाराजीचा सूर निघू लागला आहे.

शिवसेना विरोधी पक्षनेत्यांना आश्‍वासनाचा विसर
मागच्यावेळी परिवहन सभापती शिवसेनेचा झाला. त्यावेळी कॉंग्रेसने शिवसेनेला मदत केली होती आणि पुढच्यावेळी परिवहन सभापती कॉंग्रेसचा होण्यासाठी शिवसेना मदत करेल, असे ठरले होते. त्यासाठी मी दोनदा विरोधी पक्षनेते महेश कोठे यांच्या दालनात भेटायला गेलो होते. तरीही त्यांनी आता परिवहन समितीचा सभापती निवडताना कॉंग्रेससोबत काहीच चर्चा केली नाही. दिलेला शब्द शिवसेनेने पाळला नाही. तरीही आता 'जे झाले ते गंगेला मिळाले' असे समजून पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे पदाधिकारी काम करतील, असा विश्‍वास आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Despite changing the equation of power, a report on the conspiracy hatched by the Congress against the Shiv Sena will be sent to party chief and Chief Minister Uddhav Thackeray, Kothe said while talking to 'Sakal'.