श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिराच्या विकास आराखडा कामाला प्रारंभ; होतेय इन्फ्रा रेड कॅमेऱ्यांनी मंदिराचे स्कॅनिंग 

Vitthal Mandir dpr
Vitthal Mandir dpr

पंढरपूर (सोलापूर) : श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिराच्या मजबुतीकरण आणि संवर्धनासाठी आवश्‍यक असलेला विकास आराखडा (डीपीआर) बनवण्याच्या कामाला सुरवात करण्यात आली आहे. इन्फ्रा रेड कॅमेऱ्यांच्या मदतीने मंदिराचे स्कॅनिंग करण्यात येत आहे. कुठे तडे गेले आहेत, पावसाचे पाणी कुठे झिरपते आहे हे पाहून कोणत्या उपाययोजना करणे आवश्‍यक आहेत याची नेमकी माहिती या आराखड्यामुळे मिळणार आहे. 

मंदिराच्या भिंतींना अनेक ठिकाणी तडे गेले असले तरी आवश्‍यक उपाययोजना पुढील काळात त्या-त्या वेळी चांगल्या पद्धतीने केल्या तर अनेक वर्षे मंदिराला कोणताही धोका होणार नाही, असा विश्वास या कामासाठी पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून नियुक्त केलेले आर्किटेक्‍ट प्रदीप देशपांडे (औरंगाबाद) यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केला. 

लाखो भाविक वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेले श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराचा डीपीआर बनवण्याची गरज होती; परंतु असा प्लॅन बनवला न गेल्याने गेल्या काही वर्षांपासून त्या-त्या वेळचे कार्यकारी अधिकारी आणि मंदिर समितीचे अध्यक्ष यांच्या मनाप्रमाणे मंदिरात दुरुस्ती आणि सुधारणांची कामे केली जात होती. आराखडा बनवण्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. सध्याचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी यांनी या आरखड्याची गरज सर्व संबंधितांना पटवून देऊन त्यासाठी पाठपुरावा केला होता. 

दरम्यान, मंदिर समितीने देखील आराखडा तयार करण्यास मंजुरी दिली. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी काही महिन्यांपूर्वी श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिराबरोबरच राज्यातील अन्य काही देवस्थानांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्या वेळी त्यांनी देखील श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिराचा आराखडा तयार करण्याविषयी सूचना केल्या होत्या. त्यानंतर पुरातत्त्व विभागाचे आर्किटेक्‍ट प्रदीप देशपांडे (औरंगाबाद) यांची त्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. 

श्री. देशपांडे व त्यांच्या 13 सहकाऱ्यांनी कामाला सुरवात केली आहे. त्यासंदर्भात श्री. देशपांडे यांनी पत्रकारांना माहिती दिली. यापूर्वी तीन-चार वेळा येऊन संबंधितांनी मंदिराची पाहणी केली होती. सर्व्हे केला होता. मंदिराचे आर्किटेक्‍चरल ड्रॉइंग नव्हते, ते तयार केले जात आहे. पुण्यावरून इन्फ्रा रेडची टीम आली असून मंदिराच्या भिंतींमध्ये कुठे कुठे पाणी मुरत आहे, तडे कुठे कुठे गेले आहेत याची माहिती त्यांच्याकडून स्कॅनिंग केल्यानंतर नेमकेपणाने समजू शकणार आहे. दुरुस्तीची कोणकोणती कामे करावी लागतील आणि त्यासाठी अंदाजे किती खर्च येईल याची माहिती तयार केली जाणार आहे. व्हिडीओ शूटिंग, ड्रोन कॅमेऱ्यांच्या मदतीने चित्रीकरण केले जात आहे. मंदिराच्या डॉक्‍युमेंटेशनसाठी त्याचा उपयोग होणार आहे. संपूर्ण मंदिराचे मोजमाप घेऊन त्याच्या नोंदी करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. 

ड्रेनेज, इलेक्‍ट्रिक वायरिंग, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या केबलिंगसाठीच्या उपाययोजना नमूद केल्या जातील. सुमारे आठशे ते नऊशे वर्षे जुने मंदिर आहे. मंदिराची देखभाल आणि दुरुस्ती यापुढील काळात त्या-त्या वेळी योग्य पद्धतीने केली गेली तर पुढील शेकडो वर्षे मंदिराला कोणताही धोका होणार नाही. प्राथमिक माहितीनुसार मंदिराला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. त्यावर कोणत्या पद्धतीने उपाययोजना करता येतील याविषयी आराखड्यात स्पष्टपणे नमूद केले जाणार आहे. 

विकास आराखडा येत्या दीड महिन्यात तयार होणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी बैठक घेऊन स्वतः लक्ष घालून या कामाला चालना दिली आहे. या कामासाठी सुमारे 27 लाख रुपये खर्च होणार आहेत. त्यानंतर पुरातत्त्व विभागाची मान्यता मिळाल्यावर मंदिर समितीच्या बैठकीत मंजुरी घेऊन आरखडा विधी व न्याय विभागाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर कामांचा प्राधान्यक्रम ठरवून तातडीने पुढील आवश्‍यक कामे केली जाणार आहेत, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी यांनी दिली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com