प्रशासनाच्या मोगलाई कारभारामुळे कोसळले शेतकऱ्यांवर अस्मानी संकट : धैर्यशील मोहिते-पाटील 

शशिकांत कडबाने 
Saturday, 24 October 2020

जिल्ह्याला अतिवृष्टीबरोबरच धरणातून सोडलेल्या पाण्याच्या पुरामुळे मोठा फटका बसला असून, प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे व मोगलाई कारभारामुळे पूर परिस्थिती हाताबाहेर गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पुराचे संकट हे फक्त अस्मानी नसून सुलतानी असल्याची भावना भाजप नेते धैर्यशील मोहिते-पाटील यांनी व्यक्त केली.

अकलूज (सोलापूर) : जिल्ह्याला अतिवृष्टीबरोबरच धरणातून सोडलेल्या पाण्याच्या पुरामुळे मोठा फटका बसला असून, प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे व मोगलाई कारभारामुळे पूर परिस्थिती हाताबाहेर गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पुराचे संकट हे फक्त अस्मानी नसून सुलतानी असल्याची टीका भाजप नेते धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केली.  

सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टी व पुरामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीबाबत पत्रकारांशी बोलताना मोहिते-पाटील पुढे म्हणाले, हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात सोमवारी (12 ऑक्‍टोबर) पाऊस सुरू झाला. उजनी धरण पूर्ण भरलेले असताना येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढतोय व वाढणारच आहे, हे माहीत असतानाही पुढील तीन दिवस फक्त 20 हजार क्‍युसेकने पाणी भीमा नदीत सोडले जात होते. तिसऱ्या दिवशी दुपारी तीनच्या सुमारास 40 हजार क्‍युसेकने, पाचच्या सुमारास 80 हजार क्‍युसेकने तर मध्यरात्रीपर्यंत सव्वादोन लाख क्‍युसेकने विसर्ग वाढवण्यात आला. 

वीर धरणातूनही बुधवारी (14 ऑक्‍टोबर) पर्यंत नीरा नदीत फक्त 600 क्‍युसेकने विसर्ग झाला तर रात्री आठनंतर 43 हजार क्‍युसेकने आणि रात्री बारानंतर 54 हजार 500 क्‍युसेकने पाणी नीरेत सोडण्यात आले. एकाच वेळी सुमारे दोन लाख क्‍युसेक इतक्‍या प्रचंड प्रमाणात नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. यामुळे पंढरपूरपासून ते अक्कलकोटपर्यंतच्या नदीकाठच्या तसेच नीरा नदीकाठच्या गावांत, वाड्या- वस्त्यांमध्ये पाणी शिरले. यात शेतकऱ्यांचे व नागरिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. 

उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तीन तासांत 250 मिलिमीटर पाऊस झाल्याने धरणाची पाणी पातळी वाढली व अचानक पाणी सोडावे लागले, असे जलसंपदा विभागाचे अधिकारी सांगत असले, तरी 14 ऑक्‍टोबरच्या दुपारपर्यंत पाणी सोडण्याबाबत उदासीन का होते? हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला होता. नदीकाठच्या गावांत दवंडी देत दक्षतेचा कोणताही इशारा प्रशासनाकडून का दिला नाही? तसेच नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे उपाय का केले नाहीत, आदी प्रश्न उपस्थित करीत, नैसर्गिक अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती आली असती, मात्र जलसंपदा व प्रशासनाच्या उदासीनतेमुळे परिस्थिती हाताबाहेर गेली. प्रशासनाच्या मोगलाई कारभारामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले, असे धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhairyashil Mohite Patil said that the flood crisis was due to wrong planning of the administration