धनगर समाजाच्या नेत्यांनीच केला आंदोलनाच्या संयोजकावर खुनी हल्ला 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 September 2020

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शुक्रवारी (ता. 25) "ढोल बजाओ - सरकार जगाओ' आंदोलन पुकारण्यात आले होते. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आंदोलनाची ही हाक दिली होती. सोलापुरातही हे आंदोलन करण्यात आले होते. मात्र धनगर समाजाच्या नेत्यांनीच आंदोलनाच्या संयोजकांवर चाकूने खुनी केल्याने खळबळ उडाली आहे. 

सोलापूर : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शुक्रवारी (ता. 25) "ढोल बजाओ - सरकार जगाओ' आंदोलन पुकारण्यात आले होते. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आंदोलनाची ही हाक दिली होती. मात्र त्यांच्या आंदोलनापूर्वीच धनगर समाजात दोन गट पडल्याचे दिसून आले होते. सोलापुरात हे आंदोलन करण्यात आले होते. मात्र धनगर समाजाच्या नेत्यांनीच आंदोलनाच्या संयोजकांवर चाकूने खुनी हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. 

अक्कलकोट रोडवरील मल्लिकार्जुननगर रोड येथे रविवारी रात्री ही घटना घडली. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक आणि सोलापुरातील आंदोलनाचे संयोजक शरणू हांडे यांनी शुक्रवारी आंदोलनाचे आयोजन केले होते. आंदोलनादरम्यान ढोल वाजवत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. मात्र मोर्चात धनगर नेते अर्जुन सलगर यांनी गोपीचंद पडळकरांवर टीका केली होती. त्यातूनच सोशल मीडियावर याचे पडसाद उमटून दोन्ही नेत्यांमध्ये वादाची ठिणगी पडली होती. त्यानंतर हा प्रकार घडला. 

या वादातूनच अर्जुन सलगर आणि शरणू हांडे यांच्यात वादविवाद सुरू झाला आणि त्यातूनच शरणू हांडे यांच्यावर रविवारी रात्री दहाच्या सुमारास पाच ते सहा तरुणांनी चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात शरणू हांडे जखमी झाले. 

या प्रकरणी धनगर समाजाचे नेते अर्जुन सलगर, सुजित कोपरे, अनिकेत तुळ, लखन गावडे आणि इतर चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhangar Samaj leaders carried out a murderous attack on the organizer of the Dhangar reservation agitation