esakal | धर्मराज काडादी म्हणाले, सिध्देश्‍वर साखर कारखान्याला लवकरच सुवर्णकाळ 
sakal

बोलून बातमी शोधा

sidheshwar karkhana

नेत्यांचे आभार 
होटगी रस्त्यावरील विमानतळाची साखर कारखान्याला अनेक वर्षे घरघर लागली होती. आता बोरामणी विमानतळासाठी पुढाकार घेऊन 50 कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री डॉ. सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, आमदार संजय शिंदे यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. त्याचप्रमाणे होटगी विमानतळ विकसित न करण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला असल्याचे काडादी यांनी सांगितले. 

धर्मराज काडादी म्हणाले, सिध्देश्‍वर साखर कारखान्याला लवकरच सुवर्णकाळ 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : सिध्देश्वर साखर कारखान्याने गेल्या सात-आठ वर्षांपासूनच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी सभासदांनी आपल्याच कारखान्यास ऊस देऊन सहकार्य केल्यास कारखान्याला पुनश्‍च सुवर्णकाळ प्राप्त होईल, असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी व्यक्त केला. आज कारखान्याच्या 48 व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ काडादी यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. 

प्रारंभी ग्रामदैवत श्री सिध्देश्वर आणि कारखान्याचे संस्थापक कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यकारी संचालक समीर सलगर यांनी सर्वांचे स्वागत करून अनंत अडचणींचा सामना करीत कामे पूर्ण करून हा हंगाम पार पाडण्यासाठी कारखाना सज्ज असल्याचे सांगितले. या समारंभास कारखान्याचे उपाध्यक्ष ऍड. दीपक आलुरे, ज्येष्ठ संचालक सिध्दाराम चाकोते यांची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्ष काडादी म्हणाले, गेल्या पाच-सात वर्षांत निसर्गाच्या अवकृपेने उसाचे कमी गाळप झाले. साधारणत: 160 ते 180 दिवस चालणारा कारखाना 100 ते 120 दिवस चालला. अत्यंत अडचणीच्या काळात ऊस उत्पादकांनी कारखान्यास ऊस देऊन सहकार्य केल्यास कारखान्याचा सुवर्णकाळ लांब नाही. उसाला चांगला भाव देण्यात येईल. कारखान्याने सामाजिक बांधिलकी पत्करुन शेतकरी सभासदांच्या हितासाठी आरोग्य, विमा, ठिबक सिंचन, उच्च प्रतीचे ऊस बेणे आदी सवलती राबविल्या. परंतु दुसऱ्या कारखान्यास ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या साखरेसारख्या सवलती नाइलाजाने थांबवाव्या लागल्या. 

यंदाच्या हंगामात प्रतिदिनी आठ हजार मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे उसाचे पीक मुबलक प्रमाणात आले आहे. तेव्हा सभासदांनी आपल्याच कारखान्यास ऊस देऊन सहकार्य करावे, असे आवाहन काडादी यांनी केले. अनेक साखर कारखान्यांसह वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने 0265 जातीच्या उसाची जात आता वगळली आहे. त्याला पर्यायी जातीचा ऊस उपलब्ध आहे. परंतु 15 जुलैपूर्वी लागवड केलेल्या 0265 जातीचा ऊस घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आपल्या कारखान्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन यंत्रसामग्री बसवली आहे. तेव्हा कामगारांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे. कारखाना पूर्ण क्षमतेने चालण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षाही काडादी यांनी व्यक्त केली. गाळप हंगाम सुरू होत असून ऊसतोड मजुरांची टोळी व वाहतूकदारांनी सज्ज राहावे. एकाच ठिकाणचे काम पूर्ण करण्याची बांधिलकी ठेवावी. त्यांच्यासाठी पुढच्या काळात आर्थिक अडचणी येणार नाहीत, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. 

कर्मचारी आणि कामगारांबद्दल नेहमीच सहानुभूती बाळगलेल्या काडादी घराण्याच्या पाठीशी आम्ही सदैव खंबीरपणे उभे राहू. त्याचप्रमाणे या हंगामात 12 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचा प्रयत्न करु, असे आश्वासन कामगार युनियनचे प्रमुख अशोक बिराजदार यांनी दिले. या कार्यक्रमास कारखान्याचे माजी संचालक शिवण्णा बिराजदार, शरणराज काडादी, सिध्देश्वर देवस्थानचे विश्वस्त नीलकंठप्पा कोनापुरे, बाळासाहेब भोगडे, मल्लिकार्जुन कळके यांच्यासह अन्य विश्वस्त तसेच कारखान्याचे आजी-माजी संचालक, सिध्देश्वर परिवारातील सदस्य तसेच शेतकरी सभासद, व्यापारी, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, कामगार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कारखान्याचे सचिव सिध्देश्वर शीलवंत यांनी तर आभारप्रदर्शन चाकोते यांनी केले. 

शेतकऱ्यांची थकीत रक्कम दोन टप्प्यात! 
गतवर्षी कारखान्याने सर्वाधिक प्रतिटन 2500 रुपये दर जाहीर केला होता. त्यातील ऊस उत्पादकांची 400 रुपयांची राहिलेली रक्कम काही दिवसात दोन टप्प्यात देण्याचे नियोजन आहे. राज्यातील सर्वात मोठ्या सहवीजनिर्मिती प्रकल्पाच्या कर्जाचा हप्ता व व्याज भरण्यामुळे आर्थिक अडचणींशी सामना करावा लागला. कामगारांचे थकीत वेतनही आता लवकरच अदा करण्यात येईल अशी माहिती काडादी यांनी दिली. कारखान्याचे कामगार अत्यंत प्रामाणिक आहेत. त्यांच्याकडून काही चुका झाल्यास त्यांना माफ करून पुढे जाण्याची गरज आहे. त्यांना काढून टाकण्याची वेगळी भूमिका प्रशासनाने घेऊ नये. कारखान्याच्या अडचणीच्या काळात जे अधिकारी आणि कर्मचारी काम सोडून निघून गेले, त्यांना आता भरभराटीच्या काळात प्रशासनाने पुन्हा कामावर घेऊ नये अशी सूचनाही काडादी यांनी केली. 

काडादी यांचे नेहमीच सहकार्य 
कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्यानंतर आता धर्मराज काडादी यांचे शेतकरी संघटनेला नेहमीच सहकार्य मिळत आले. अन्य सहकारी कारखान्यातील स्वाहाकार पाहिल्यानंतर अतिशय दु:ख होते. कारखान्याने गतवर्षी 2500 रुपयांचा दिलेला दर गौरवास्पद आहे. कारखान्यास ऊस पुरवठा न करणाऱ्या सभासदांची साखर अडवणे योग्य आहे. कारखान्याने अत्यंत अडचणीवर मात करून पुन्हा कारखाना सुव्यवस्थित चालविल्याबद्दल खूप मोठे समाधान आहे. कारखान्याची सभासदांना न्याय देण्याची भूमिका राहिल्याचे नेहमीच दिसून येते असल्याचे शेतकरी संघटना नेते शिवानंद दरेकर यांनी सांगितले.