आणखी एक पुतण्या काकांविरोधात उतरणार मैदानात ! धवलसिंह मोहिते-पाटील कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार 

Dhawalsinh
Dhawalsinh

नातेपुते (सोलापूर) : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे अकलूज येथील डॉ. धवलसिंह मोहिते- पाटील उद्या (गुरुवारी) आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. 

राज्य कुस्तीगीर संघटनेचे उपाध्यक्ष असलेले डॉ. धवलसिंह हे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर धवलसिंह आणि राष्ट्रवादीचे जवळचे संबंध निर्माण झाले होते. विधानसभा निवडणुकीत धवलसिंह यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम जानकरांचा प्रचारही केला होता. परंतु, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आपली दखल घेतली नसल्याने ते नाराज होते. त्यानंतर त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या (गुरुवारी) मुंबईत टिळक भवनात कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत डॉ. धवलसिंह हे पत्नी उर्वशीराजे मोहिते- पाटील यांच्यासह कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. 

जनसेवा संघटनेचे सर्वेसर्वा, राज्य कुस्तीगीर संघटनेचे प्रांत उपाध्यक्ष आणि माजी सहकारमंत्री दिवंगत लोकनेते प्रतापसिंह मोहिते- पाटील यांचे पुत्र डॉ. धवलसिंह मोहिते- पाटील हे गुरुवारी (ता. 28) आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह मुंबई येथील टिळक भवनात कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, आमदार धीरज देशमुख यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. 

डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यात कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभी केलेली आहे. त्यांनी गत लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत सहसंपर्क प्रमुखपदाची धुरा संभाळली होती. परंतु, आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर धवलसिंह आणि राष्ट्रवादीचे जवळचे संबंध निर्माण झाले होते. विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम जानकरांचा प्रचारही केला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचा डॉ. धवलसिंह यांच्याशी सतत संपर्क होता. तरीही त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे राजकारणाची सोलापूर जिल्ह्यातील गणिते बदलणार आहेत. सध्या कॉंग्रेसकडेही ग्रामीण भागाशी निगडित प्रभावी असलेला चेहरा नव्हता. धवलसिंह मोहिते - पाटील यांच्या कॉंग्रेस प्रवेशानंतर जिल्ह्याच्या राजकारणात नवीन रंगत येणार आहे. 

डॉ. धवलसिंह यांनी नुकत्याच पार पडलेल्या माळशिरस तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकीत अकलूज ग्रामपंचायतीसह तालुक्‍यातील बऱ्याच ठिकाणी करिश्‍मा दाखवला होता. तसेच करमाळा तालुक्‍यात नरभक्षक बिबट्याला ठार मारल्यानंतर डॉ. धवलसिंह मोहिते - पाटील यांची जिल्ह्यातील लोकप्रियतेत वाढ झाली आहे. जनसेवा संघटनेच्या माध्यमातून डॉ. धवलसिंह यांचे जिल्ह्यात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे पसरलेले आहे. 

यापूर्वी लोकनेते प्रतापसिंह मोहिते - पाटील हे कॉंग्रेसमध्ये असताना जिल्ह्यात त्यांनी पक्ष वाढीसाठी मोठे काम केले होते. जिल्ह्यात कॉंग्रेसच्या वतीने काढलेल्या इंदिरा रॅलीत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली प्रतापसिंह मोहिते - पाटील यांनी पक्षाला मोठ्या उंचीवर नेले होते. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडक कार्यकर्ते सोबत मुंबईमध्ये कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. त्यानंतर सोलापूरला हजारो समर्थकांच्या सोबत भव्य मेळावा घेतला जाणार आहे. 
- डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com