पंढरपुरात ग्रामपंचायत सदस्यांसाठी संवाद ग्राम कार्यशाळा ! भास्करराव पेरे-पाटील करणार मार्गदर्शन 

भारत नागणे 
Wednesday, 20 January 2021

पंढरपूर तालुक्‍यात नुकत्याच पार पडलेल्या 72 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सुमारे 776 सदस्य नव्याने निवडून आले आहेत. या सर्व ग्रामपंचायत सदस्यांना ग्रामपंचायतीच्या कारभाराविषयी आणि विविध विकास योजनांसंदर्भात सविस्तर माहिती व्हावी यासाठी तालुक्‍यात प्रथमच संवाद ग्राम या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. 

पंढरपूर (सोलापूर) : तालुक्‍यातील ग्रामपंचायतींचे पदाधिकारी आणि नव्याने निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांसाठी येत्या 24 जानेवारी रोजी पंढरपुरात संवाद ग्राम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. डीव्हीपी उद्योग समूहाचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी पुढाकार घेऊन या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी पाटोद्याचे (जि. औरंगाबाद) माजी सरपंच भास्करराव पेरे- पाटील हे उपस्थित राहणार आहेत. 

पंढरपूर तालुक्‍यात नुकत्याच पार पडलेल्या 72 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सुमारे 776 सदस्य नव्याने निवडून आले आहेत. या सर्व ग्रामपंचायत सदस्यांना ग्रामपंचायतीच्या कारभाराविषयी आणि विविध विकास योजनांसंदर्भात सविस्तर माहिती व्हावी यासाठी तालुक्‍यात प्रथमच संवाद ग्राम या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. 

ही कार्यशाळा इसबावी येथील श्रीराम मंगल कार्यालयात होणार आहे. सकाळी 10 वाजता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. स्वामी यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्‌घाटन होणार आहे. या वेळी ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचला पाटील, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांच्यासह इतर मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेसाठी येताना ग्रामपंचायत सदस्य व सरपंचांनी आधार कार्ड सोबत आणावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A dialogue village workshop has been organized for Gram Panchayat members in Pandharpur