
भारतातील वस्तू परदेशी निर्यात करताना निर्यातदारांना येणारी कर्जाची मोठी अडचण आता लवकरच संपणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असून, याबाबत लवकरच आदेश काढला जाणार असल्याची माहिती आमदार सुभाष देशमुख यांनी दिली.
द. सोलापूर : भारतातील वस्तू परदेशी निर्यात करताना निर्यातदारांना येणारी कर्जाची मोठी अडचण आता लवकरच संपणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असून, याबाबत लवकरच आदेश काढला जाणार असल्याची माहिती आमदार सुभाष देशमुख यांनी दिली.
लॉकडाउनमुळे सोलापूरच्या चादरी, टॉवेल आणि गणवेशासह तयार कपड्यांच्या व्यवसायाचे नुकसान झाले आहे. यातून बाहेर काढण्यासाठी सोलापूर सोशल फाउंडेशनच्या शिष्टमंडळाने केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या शिष्टमंडळाचे नेतृत्व आमदार देशमुख यांनी केले होते. संचालक रवींद्र मणियार, सल्लागार व सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघाचे संचालक अमित जैन, रमेश डाकलिया व सोलापूर गारमेंटचे इतर पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
भारतातून परदेशात माल निर्यात करणाऱ्या उद्योजकांची परदेशातल्या आयातदारांकडून फसवणूक होऊ नये यासाठी "ईसीजीसी' ही एक सरकारी यंत्रणा कार्यरत आहे. निर्यातदारांची फसवणूक झाली आणि तिचे पैसे बुडाले तर ही यंत्रणा निर्यातदार व्यापाऱ्याला पैसे देते. या यंत्रणेमुळे निर्यातीला चालना मिळाली आहे. व्यापाऱ्यांच्या फसवणुकीचे प्रमाणही कमी झाले आहे. अशा निर्यातदाराला निर्यात करताना जी निर्यातीची ऑर्डर मिळते ती पूर्ण करण्यासाठी बॅंकेतून कर्ज काढावे लागते. पण कर्ज काढताना दोन जामीन द्यावे लागतात. "ईसीजीसी'कडून निर्यातदाराला जे हमीपत्र मिळते ते पत्रच बॅंकांनी जामीन समजून निर्यातदाराला कर्ज द्यावे, जर आयातदाराने निर्यातदाराला काही कारणामुळे पैसे नाही दिले तर "ईसीजीसी'कडून बिलाची रक्कमच परस्पर बॅंकेला कर्जाचा हप्ता म्हणून वळती करून घ्यावी, अशी मागणी आमदार देशमुख यांच्यासह शिष्टमंडळाने केली.
केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी या सूचनांचे स्वागत करत सकारात्मक प्रतिसाद दिला असून, उद्योग मंत्रालय, व्यापार मंत्रालय आणि अर्थ मंत्रालयांचा समन्वय घडवून या संबंधात योग्य त्या सूचना केल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले.
संपादन : श्रीनिवास दुध्याल