"मकाई'चा पहिला हप्ता 2200 रुपये जमा ! ऊस घालून सहकार्य करण्याचे अध्यक्ष बागल यांचे आवाहन 

संतोष केसकर 
Tuesday, 15 December 2020

श्री मकाई सहकारी साखर कारखाना शेतकरी, सभासद, कामगार यांच्या मालकीचा कारखाना असून, आपले हित जपण्यासाठी व कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी करमाळा तालुक्‍यातील शेतकरी, सभासद या कारखान्याला ऊस घालून सहकार्य करत आहेत. इतर कारखान्यांच्या बरोबरीने उसाला भाव देणार असल्याचे अभिवचन दिले होते. याची वचनपूर्ती आपण करणार असून, पहिला उसाचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे, असे दिग्विजय बागल यांनी सांगितले. 

जिंती (सोलापूर) : भिलारवाडी (ता. करमाळा) येथील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याने या वर्षीच्या गाळप हंगामातील पहिला उसाचा हप्ता 2200 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला असून, मकाईला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शेतकऱ्यांनी मकाईला ऊस घालून सहकार्य करावे, असे आवाहन मकाईचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी केले. 

श्री मकाई सहकारी साखर कारखाना शेतकरी, सभासद, कामगार यांच्या मालकीचा कारखाना असून, आपले हित जपण्यासाठी व कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी करमाळा तालुक्‍यातील शेतकरी, सभासद या कारखान्याला ऊस घालून सहकार्य करत आहेत. आपला साखर कारखाना इतर कारखान्यांच्या बरोबरीने उसाला भाव देण्याचे काम करणार असल्याचे अभिवचन दिले होते. याची वचनपूर्ती आपण करणार असून, पहिला उसाचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे, असे दिग्विजय बागल यांनी सांगितले. 

कारखान्याने या हंगामातील पहिला उसाचा हप्ता 2200 रुपये जमा केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनंत अडचणीवर मात करून उसाचे गाळप यशस्वीपणे चालू असून शेतकऱ्यांमधून ऊस दराबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मकाई कारखान्याचे गाळप यशस्वीपणे होण्यासाठी कारखान्याचे सर्व कर्मचारी, उपाध्यक्ष बाळासाहेब पांढरे, कार्यकारी संचालक हरिश्‍चंद्र खाटमोडे, शेतकी विभाग अधिकारी परिश्रम घेत आहेत, असेही बागल यांनी सांगितले. 

आर्थिक अडचणीमुळे मकाई कारखाना गतवर्षी बंद होता. यावर्षी कोरोनाचे महासंकट असताना देखील श्री. बागल यांनी मकाईसाठी गाळप परवाना मिळवला. कारखाना सुरू झाला आहे. कामगारांचे थकलेले पगार हा मोठा प्रश्न व्यवस्थापनासमोर होता. कामगारांची दिवाळी गोड झाली नाही. अशा परिस्थितीत कारखान्याला शेतकरी ऊस देतील का, अशी शंका निर्माण झाली होती. परंतु सभासदांनी सहकार जिवंत ठेवत दिग्विजय बागल यांच्यावर विश्वास ठेवून मकाईला ऊस देण्यास सुरवात केली आणि पहिली उचल जाहीर झाल्यावर शेतकऱ्यांमध्ये आणखी विश्वास निर्माण झाला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Digvijay Bagal appealed to farmers that cooperate by giving sugarcane to Makai Sugar factory