वळसे पाटलांचे ठरलं! एवढा वेळ असणार सोलापूरकरांना

अशोक मुरूमकर
Sunday, 26 January 2020

जिल्हा वार्षिक योजना २०२०-२१ साठी आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये सर्वसाधारण, अनुसुचित जाती उपाययोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरील प्रारूप आराखड्यासाठी यंत्रणेणी ८४१.८१ कोटीची मागणी केली आहे. त्यापैकी ५०५.६९ कोटीच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली असून ११६.०० कोटीची अतिरिक्त मागणी सरकारकडे केली जाणार आहे.

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील शनिवारपासून सोलापूर दौऱ्यावर आहेत. रविवारी (ता. २६) जिल्हा वार्षिक नियोजन समितीची बैठक झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी महत्त्वाच्या कार्यक्रमाशीवाय महिन्यातील दोन दिवस सोलापुरात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रविवारी पालकमंत्री वळसे पाटील सकाळपासून प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात होते. त्यानंतर नियोजन भवनात जिल्हा वार्षिक योजनाची बैठक झाली. यामध्ये जिल्ह्याच्या प्राधान्यांच्या योजना लक्षात घेवून सर्वसाधारण वार्षिक योजनेसाठी ११.६ कोटीची अतिरिक्त मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. याबरोबर २०१९-२० मध्ये सर्वसाधारण, अनुसुचित जाती उपाययोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपाययोजनांच्या १५ जानेवारी २०२० अखेपर्यंतच्या खर्चाचा त्यांनी आढावा घेतला. २०१९-२० साठी जिल्ह्याला सरकारकडून ६० टक्के निधी उपलब्ध झाला आहे. त्याप्रमाणे सर्वसाधारण, अनुसुचित जाती उपाययोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपाययोजनांवर ७६ टक्के खर्च झाला असल्याचे सांगितले. ज्या भागाचा खर्च राहिला आहे. त्यांनी मार्च अखेरपर्यंत खर्च करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
 

२०२०-२१ चा आराखडा...
जिल्हा वार्षिक योजना २०२०-२१ साठी आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये सर्वसाधारण, अनुसुचित जाती उपाययोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरील प्रारूप आराखड्यासाठी यंत्रणेणी ८४१.८१ कोटीची मागणी केली आहे. त्यापैकी ५०५.६९ कोटीच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली असून ११६.०० कोटीची अतिरिक्त मागणी सरकारकडे केली जाणार आहे. यासाठी पुण्यात सोमवारी (ता. २७) राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याबरोबर सर्व जिल्ह्यांची बैठक होणार आहे. त्यात निधीची मागणी केली जाणार असल्याचे पालकमंत्री वळसे पाटील यांनी सांगितले. 

असा असणार सोलापूरकरांना वेळ
पालकमंत्री वळसा पाटील यांनी पत्रकारांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले की, सोलापूरात महत्त्वाच्या कामासाठी मी कायम येणार आहे. याशिवाय कार्यक्रम व महत्त्वाचे कार्यक्रम सोडून जिल्ह्यासाठी महिन्यातील दोन दिवस देणार आहे. त्यामध्ये आर्धा दिवस सर्वसामान्यांना भेटण्यासाठी वेळ असणार. अर्धा दिवस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी वेळ असणार तर एक दिवस जिल्ह्यातील पंचायत समित्या, नगरपालिका व इतर ठिकाणी भेटी यांना वेळ दिला जाणार असल्याचे सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dilip Walse Patil District Planning Committee Meeting