आता मतदानानंतर गावगाड्यातील गप्पांच्या फडात ऐकू येतेय "कोण जिंकणार'ची भविष्यवाणी ! 

grampanchyat
grampanchyat

वैराग (सोलापूर) : ग्रामपंचायतीची निवडणूक म्हटलं, की संपूर्ण गावगाडा ढवळून निघणारच. यात एक वेगळाच हटके राजकीय रुबाबदार बाणा दिसून येतो. अगदी निवडणुकीची घोषणा झाली रे झाली, की हा गप्पांचा फड कधी गावकुशीच्या पारावर तर कधी पानटपरीवर चांगलाच रंगतो. आता काल मतदान झालेल्या आकडेवारीच्या दरम्यान गावोगावी गप्पांचा फड रंगतानाचे आणि सोबतीला चहाचे झुरके घेतानाचे चित्र दिसून आले. मध्ये - मध्ये हळुवार खटके आणि लगेच सुपारीचे खांड एकमेकांना देत ग्रामपंचायत निवडणुकीचे रागरंग उधळले जात आहेत. 

आपल्या ग्रामपंचायतीत कुणाचा बोलबाला राहणार, मागच्या खेपेस निवडून आलेल्या सदस्य - सरपंचाने काय केले, काय करायला हवे होते, निवडून येताच कोणते बदल झाले, कोण कसा आणि अमूक उमेदवार निवडून आल्यानंतर काय दिवे लावणार, इथंपासून सुरू झालेल्या या चर्चा कोरोना, धनंजय मुंडे, शेतकरी कायदा, राहुल गांधी ते थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इथंपर्यंत अगदी खमंग, बेभान आणि सुसाट झालेल्या ऐकताना दिसून येत आहेत. 

या पारांवरच्या गप्पांमध्ये वयस्कर आणि वृद्ध यांचाच घोळका दिसून येत आहे. दुसरीकडे, तरुणाई मतदारांची जुळवाजुळव आणि बूथच्या अवतीभोवती आपली फिल्डिंग कशी लावली होती याबाबत मतदानाच्या दिवशी सकाळी 7.30 वाजता ठिकठिकाणी सुरू झालेला हा गप्पांचा फड सायंकाळी मतदान संपल्यावरही सुरूच होता. आता मतमोजणीपर्यंत कुणाला, कुठून आघाडी मिळणार, कुणाचे गणित बिघडणार, कोण बाजी मारणार, कोणी कसे काम केले, मतदान वाढण्यासाठी कोणी कसे प्रयत्न केले व काय करायला हवे होते या चर्चांनी आता चांगलाच जोर धरला आहे. सोबतच 18 जानेवारीस निकाल लागल्यानंतर या गावगप्पांचा हा फड संवादापासून वाद - विवादापर्यंत राहील, हे मात्र नक्की ! 

एकूणच, ग्रामपंचायतीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून ते काल मतदान संपल्यानंतरही आज निवडणुकीसंबंधीच्या चर्चांना उसंत मिळेनासे दिसून आले. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आरक्षण कसे पडणार व कोण सरपंच होणार, याबाबतची भविष्यवाणीही काही गप्पांच्या फडांमध्ये ऐकावयास मिळत आहे. आता गप्पांमध्ये सामील तज्ज्ञांची भविष्यवाणी कितपत खरे ठरणार, हे सोमवारी निकालादिवशी स्पष्ट होणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com