जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केली मोहिते पाटील गटाच्या बंडखोर सदस्यांची मागणी 

प्रमोद बोडके
Tuesday, 10 November 2020

हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापुढे असल्याने आम्हाला पुढील तारीख मिळावी अशी मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. त्यांनी ही मागणी मान्य केली आहे. पुढील तारखेबाबत आम्हाला कळवू असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 
- ऍड. दत्तात्रेय घोडके 

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांविरुद्ध बंडखोरी करणाऱ्या माळशिरस तालुक्‍यातील मोहिते-पाटील गटाच्या सहा जिल्हा परिषद सदस्यांची मागणी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मान्य केली आहे. उच्च न्यायालयाने फेटाळलेल्या  आमच्या याचिकेच्या निकालावर आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी 16 नोव्हेंबरला आहे. आपल्याकडे होणाऱ्या सुनावणीसाठी आम्हाला मुदत द्या अशी मागणी या बंडखोर सदस्यांनी वकिलांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी शंभरकर यांच्याकडे केली.

त्यांची ही मागणी मान्य करत सुनावणीला मुदतवाढ देण्यात आली आहे. या सहा बंडखोर सदस्यांची सुनावणी आज दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे झाली. या सदस्यांना अपात्र करावे, अशी मागणी गटनेते तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे. 

उच्च न्यायालयाने बंडखोर सदस्यांची याचिका फेटाळल्यानंतर आता या सदस्यांच्या अपात्रतेबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे सुनावणी झाली. माळशिरस तालुक्‍यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या स्वरुपाराणी मोहिते-पाटील, शितलादेवी मोहिते पाटील, अरुण तोडकर, मंगल वाघमोडे, सुनंदा फुले आणि गणेश पाटील या सदस्यांनी राष्ट्रवादीचा व्हिप डावलत जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत बंडखोरी केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: District Collector agrees to demand of rebel members of Mohite Patil group