esakal | लाख रुपयांचे दिवे खरेदी करून सोलापूरचे सुपुत्र, कोडरमाचे जिल्हाधिकारी घोलप यांनी केली कारागिरांची दिवाळी गोड !
sakal

बोलून बातमी शोधा

Collector Gholap

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्‍यातील महागावचे सुपुत्र व झारखंड राज्यातील कोडरमा जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी रमेश घोलप यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसोबत मेहनती, कुशल व गरीब कारागिरांच्या घरी जाऊन एक लाख रुपयांचे मातीचे दिवे खरेदी करीत कारागिरांची दिवाळी गोड केली. 

लाख रुपयांचे दिवे खरेदी करून सोलापूरचे सुपुत्र, कोडरमाचे जिल्हाधिकारी घोलप यांनी केली कारागिरांची दिवाळी गोड !

sakal_logo
By
शांतिलाल काशीद

मळेगाव (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्‍यातील महागावचे सुपुत्र व झारखंड राज्यातील कोडरमा जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी रमेश घोलप यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसोबत मेहनती, कुशल व गरीब कारागिरांच्या घरी जाऊन एक लाख रुपयांचे मातीचे दिवे खरेदी करीत कारागिरांची दिवाळी गोड केली. 

दिवाळी दिव्यांचा सण म्हणून ओळखला जातो. दिवा हा अंध:कार नष्ट करून प्रकाशाकडे जाण्याचं प्रतीक आहे. अशातच रमेश घोलप यांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकत, प्लास्टिकचे दिवे खरेदी न करता मातीचे दिवे खरेदी करून सर्वसामान्य गरीब कुटुंबीयांच्या घरात प्रकाश निर्माण केला. एक लाख रुपयांचे दिवे खरेदी केल्याने कोडरमा येथील कारागिरांच्या कुटुंबांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. तसेच कुटुंबातील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून ज्ञानाचा दिवा लावण्यासही ते विसरले नाहीत. 

याअगोदर देखील श्री. घोलप यांनी पाच अनाथ मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेत कुटुंबाला आर्थिक मदत केली आहे. कोरोना महामारीचा फटका सर्वच व्यवसायांना व सणांना बसला आहे. व्यवसाय ठप्प असल्याने अनेकांचे जगणे मुश्‍कील झाले आहे. अशातच रमेश घोलप यांनी बाजारपेठेतील झगमगाटापासून दूर राहात मातीच्या पणत्या विकत घेत समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. तसेच त्यांनी इतरांनाही चिनी वस्तू टाळत मातीचे दिवे खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. 

दुःख, गरिबी, हालअपेष्टा सहन करीत जिल्हाधिकारी पदावर पोचलेले रमेश घोलप सर्वसामान्य, गरीब कुटुंबांचा आधार बनले आहेत. कोरोना महामारीच्या काळात दाखवलेली सतर्कता, गरिबांच्या झोपडीत जाऊन लहान मुलाला कडेवर घेत फिरवलेला मायेचा हात, वृद्ध, निराधारांची काठी बनून केलेले काम पाहून घोलप यांनी एक वेगळाच नावलौकिक मिळवला आहे. 

दीपावली सणानिमित्त खरेदी करताना प्लास्टिकचे आकाश कंदील, दिवे व इतर वस्तू घेणे टाळावे. होतकरू, कुशल, गरीब कुटुंबातील कारागिरांनी तयार केलेले मातीचे दिवे व आकाश कंदील खरेदी करून कारागिरांची दिवाळी गोड करावी. गरिबांच्या झोपडीत दिवा लावण्यासाठी समाजातील अनेक घटकांनी, संघटनांनी पुढे यावे. 
- रमेश घोलप,
जिल्हाधिकारी, कोडरमा, झारखंड 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

go to top