अतिवृष्टीच्या भरपाईसाठी सव्वादोनशे कोटींची गरज ! 'या' तालुक्‍यांमधील पावणेदोन लाख हेक्‍टरवरील पिकांना दणका

तात्या लांडगे
Sunday, 25 October 2020


तालुकानिहाय नुकसान (हेक्‍टरमध्ये) 

 • तालुका शेतीचे नुकसान
 • पंढरपूर : 29 हजार 943
 • बार्शी : 22 हजार 690 
 • मोहोळ : 18 हजार 186
 • द. सोलापूर : 18 हजार 69
 • सांगोला : 17 हजार 344
 • अक्‍कलकोट : 16 हजार 179
 • करमाळा : 14 हजार 664
 • माळशिरस : 11 हजार 145
 • माढा : नऊ हजार 445
 • मंगळवेढा : आठ हजार 345
 • उत्तर सोलापूर : सहा हजार 806,
 • एकूण : एक लाख 72 हजार 817
 •  

सोलापूर : जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे 21 व्यक्‍तींचा मृत्यू झाला आहे. तर 25 हजार 490 लहान- मोठी जनावरे वाहून गेली तथा मृत पावली आहेत. तसेच जिल्ह्यातील सात हजार 983 घरांची पडझड झाली असून सुमारे पावणेदोन लाख हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा नजर अंदाज अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाला सादर केला आहे. आता मंगळवारी अंतिम अहवाल शासन दरबारी पाठविला जाणार असून नुकसानग्रस्तांसाठी सुमारे सव्वादोशने कोटींची भरपाई द्यावी, अशी मागणी केली जाणार आहे. 

उजनी धरणातून सोडलेला भला मोठा विसर्ग आणि परिसरात पडणाऱ्या मुसळधार अतिवृष्टीने शेतीसह मनुष्य व पशुधनाची हानी झाली. जिल्ह्यातील मुस्ती, झरे, वडशिंगे, केत्तूर, श्रीपतपिंपरी, मुंगशी (वा.), बार्शी, चोपडी, हंगीरगे, माळशिरस, निमगाव टें., कुर्डू, परिते, सावळेश्‍वर येथील प्रत्येकी एक तर पंढरपुरातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील दहा जणांना प्रत्येकी चार लाखांप्रमाणे मदत देण्यात आली आहे. उर्वरित मृतांच्या नातेवाईकांना पुढील काही दिवसांत मदत दिली जाणार आहे. तहसिलदारांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी, मंडलाधिकारी पंचनामे करीत असून त्यांचा अहवाल अंतिम झाल्यानंतर तो अहवाल शासनाला पाठविला जाणार आहे. त्यानंतर शासनाकडून मदतीची रक्‍कम जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त होणार असून ती रक्‍कम तालुकानिहाय वितरीत केली जाणार आहे. त्यानुसार नुकसानग्रस्तांच्या बॅंक खात्यात भरपाईची रक्‍कम वितरीत केली जाईल, असेही जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमधील भरपाई नाहीच
जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सोलापूरसह राज्यातील काही जिल्ह्यांमधील शेतीला परतीच्या पावसाचा फटका बसला. त्यावेळी मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव सुभाष उमराणीकर यांनी सर्व विभागीय आयुक्‍तांना पत्र पाठवून पंचनामे अहवाल तत्काळ पाठविण्याचे आदेश काढले. मात्र, सप्टेंबरमध्ये पुन्हा पाऊस झाल्याने एकत्रित पंचनामे करुन अहवाल पाठविण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर 10 ते 15 ऑक्‍टोबरमध्ये पुन्हा अतिवृष्टी झाली. त्यामुळे मोठे नुकसान झाले. त्यामुळे आता ऑक्‍टोबरमधील नुकसानीची भरपाई देण्याचे ठरविण्यात आले असून यापूर्वीची भरपाई मिळणार नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

तालुकानिहाय नुकसान (हेक्‍टरमध्ये) 

 • तालुका शेतीचे नुकसान
 • पंढरपूर : 29 हजार 943
 • बार्शी : 22 हजार 690 
 • मोहोळ : 18 हजार 186
 • द. सोलापूर : 18 हजार 69
 • सांगोला : 17 हजार 344
 • अक्‍कलकोट : 16 हजार 179
 • करमाळा : 14 हजार 664
 • माळशिरस : 11 हजार 145
 • माढा : नऊ हजार 445
 • मंगळवेढा : आठ हजार 345
 • उत्तर सोलापूर : सहा हजार 806,
 • एकूण : एक लाख 72 हजार 817
 •  

  दोन दिवसांत शासनाला पाठविला जाईल पंचनामा अहवाल
  परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यातील शेती पिकांना फटका बसला आहे. नजरअंदाज अहवालानुसार सुमारे पावणेदोन लाख हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे चित्र आहे. आता अंतिम पंचनामे मंगळवारपर्यंत (ता. 26) होतील. त्यानुसार मदतीची मागणी शासनाकडे केली जाईल. 
  - अजित देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी, सोलापूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The district loss of crops on 2.5 lakh hectares. it will be demanded that 225 crores of rupees should be paid to the victims