भीमा नदीचा महापूर टाळता आला असता?

Bhima Flood.
Bhima Flood.

करकंब (सोलापूर) : तब्बल तेरा वर्षांनंतर भीमा नदीला आलेल्या महापुरामुळे शेतीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, शेकडो कुटुंबे बेघर झाली आहेत. मात्र उजनी धरणाच्या व्यवस्थापनाने हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्याची वेळीच दखल घेतली असती तर महापूर आणि त्यामुळे झालेले नुकसानही टाळता आले असते, असे जाणकारांचे म्हणणे आहे. 

विशेष म्हणजे याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल यांनी भीमा पाटबंधारे विभागाला वेळीच कल्पना देऊन जागे केले होते. मात्र त्यावर कार्यवाही झाली नसल्याने आता श्री. बागल न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. 

बुधवारी (ता. 14) ते शनिवार (ता. 17) दरम्यान सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. विशेष म्हणजे बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रवास सोलापूर-पुणे मार्गे अरबी समुद्र असाच दाखविला होता. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यासह उजनीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडणार हे निश्‍चित होते. याची दखल घेऊन 14 ऑक्‍टोबर पूर्वीच धरणातील पाणीसाठा काही अंशी कमी करणे आवश्‍यक होते. पण सोलापूर जिल्ह्यात बुधवारी (ता. 14) रोजी रेकॉर्डब्रेक पाऊस पडला. त्या दिवशीही धरणाची पाणीपातळी 111 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हवामान खात्याने अंदाज व्यक्त केल्याप्रमाणे पुणे आणि उजनीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे साहजिकच सर्व अतिरिक्त पाणी धरणातून सोडून देण्याशिवाय प्रशासनापुढे पर्यायच उरला नाही. परिणामी एकाच दिवशी दहा हजारावरून सव्वादोन लाख क्‍युसेकपर्यंत विसर्ग वाढवावा लागला. 

पण त्याच वेळी नीरा नदीतून येणारा विसर्ग आणि जिल्ह्यात भीमा नदीच्या खोऱ्यात पडलेल्या पावसाचाही विसर्ग नदीत येत होता. त्यामुळे पंढरपूर येथे पाण्याचे प्रमाण वाढून ते अपेक्षेपेक्षा जास्त शहराच्या भागात आणि नदीकाठच्या गावात शिरले. त्यामुळे अचानक लोकांची आणि प्रशासनाचीही तारांबळ उडाली. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्याची वेळीच दखल घेऊन उजनी व्यवस्थापन व भीमा पाटबंधारे विभागाने आगोदरपासूनच भीमा नदीतून पाणी सोडण्यास सुरवात केली असती तर महापूर आणि त्यामुळे झालेली अतोनात हानी निश्‍चितच टाळता आली असती. 

याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तानाजी बागल म्हणाले, उजनी धरण 111 टक्के भरल्यानंतरच आपण भीमा पाटभंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून आगामी काळात पडणाऱ्या पावसाची कल्पना देऊन धरणातील पाणीपातळी कमी करण्याची लेखी विनंती केली होती. त्याची दखल घेतली नाही. शिवाय त्यानंतर हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर तरी प्रशासनाने वेळीच सावध होत नदीतून पाणी सोडण्यास सुरवात करायला हवी होती. पण त्याकडेही गांभीर्याने पाहिले गेले नाही. शेवटी सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडून गेल्यावर व उजनीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस चालू झाल्यावर प्रमाणापेक्षा जास्त पाणी सोडल्याने महापुराचे संकट ओढावले. याला पूर्णपणे भीमा पाटबंधारे विभाग आणि उजनीचे व्यवस्थापन जबाबदार असून, त्याविरोधात आपण न्यायालयात दाद मागणार आहोत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com