विभागीय आयुक्‍त म्हणाले ! श्री सिध्दरामेश्‍वरांची यात्रा निर्बंध घालूनच होईल

तात्या लांडगे
Sunday, 3 January 2021

यात्रेसंबंधीचे प्रस्ताव...

  • परंपरेनुसार यात्रा साजरी करण्यास शासनाकडून मिळावी परवानगी : मानकरी
  • सात नंदीध्वजासाठी प्रत्येकी 25 जणांना असावी परवानगी : आमदार संजय शिंदे
  • मानकऱ्यांसह एक हजार भाविकांना द्यावी अक्षता सोहळ्यासाठी मान्यता : आमदार प्रणिती शिंदे
  • ग्रामदैवतांच्या यात्रेसाठी प्रशासनाने निर्बंध शिथिल करुन मानकऱ्यांसह काही भाविकांना द्यावी परवानगी : पंच कमिटी
  • उपमुख्यमंत्र्यांसह विधी व न्याय विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली निवेदने; निर्णय विभागीय आयुक्‍तांकडे सोपविला

सोलापूर : ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्‍वरांची यात्रा पंरपरेनुसार साजरी करण्यास परवानगी द्यावी, एक हजार भाविकांना उपस्थित राहण्यास परवानगी द्यावी, प्रत्येक नंदीध्वजामागे 25 धारकऱ्यांना परवानगी द्यावी, असे प्रस्ताव शासन दरबारी प्राप्त झाले आहेत. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव आणि ब्रिटनमध्ये आढळलेला कोरोनाचा दुसरा विषाणू, या पार्श्‍वभूमीवर सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाईल. धार्मिक भावनांचा मान राखून धार्मिक विधीसाठी परवानगी देऊन संतुलित निर्णय घेतला जाईल, असे स्पष्टीकरण विभागीय आयुक्‍त सौरभ राव यांनी 'सकाळ'शी बोलताना दिले.

यात्रेसंबंधीचे प्रस्ताव...

  • परंपरेनुसार यात्रा साजरी करण्यास शासनाकडून मिळावी परवानगी : मानकरी
  • सात नंदीध्वजासाठी प्रत्येकी 25 जणांना असावी परवानगी : आमदार संजय शिंदे
  • मानकऱ्यांसह एक हजार भाविकांना द्यावी अक्षता सोहळ्यासाठी मान्यता : आमदार प्रणिती शिंदे
  • ग्रामदैवतांच्या यात्रेसाठी प्रशासनाने निर्बंध शिथिल करुन मानकऱ्यांसह काही भाविकांना द्यावी परवानगी : पंच कमिटी
  • उपमुख्यमंत्र्यांसह विधी व न्याय विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली निवेदने; निर्णय विभागीय आयुक्‍तांकडे सोपविला

कोरोनाची स्थिती सुधारु लागल्याने राज्य सरकारने पुन:श्‍च आरंभअंतर्गत विविध उद्योग व व्यवसायांना परवानगी दिली. मात्र, यात्रा, सार्वजनिक उत्सव, विवाह समारंभ यासह अन्य कार्यक्रमांसाठी व्यक्‍तींची मर्यादा घालून दिली आहे. जेणेकरुन कोरोनाचा कमी होत असलेला प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये, हा त्यामागचा हेतू आहे. काही दिवसांपूर्वी ब्रिटनमध्ये कोरोनाचा दुसरा विषाणू आढळला असून त्याची काहीजणांना बाधा झाली आहे. त्यामुळे सरकारने शहरांमध्ये रात्री 11 ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. सार्वजनिक कार्यक्रम, सण- समारंभांसाठी निर्बंध घातले आहेत. या सर्व बाबींचा विचार करुन धार्मिक भावनांचा आदर केला जाईल. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन संतुलित निर्णय घेण्यात येणार आहे. त्यासंबंधी वरिष्ठ पातळीवरही बोलणे चालू असून जिल्हा प्रशासनासोबतही बैठक घेतली जाणार आहे. श्री सिध्दरामेश्‍वरांचा अक्षता सोहळा 13 जानेवारीला असून गुरुवारपर्यंत (ता. 7) अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही विभागीय आयुक्‍तांनी यावेळी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Divisional Commissioner Saurabh Rao said! The yatra of village deity Shri Siddharmeshwar will be celebrated with restrictions