लॉकडाउनच्या काळात करा अर्थार्जनाचे परफेक्‍ट नियोजन

संजय पाठक - सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

गरीब वर्गास सरकार मदत देत असते. मध्यम आणि उच्चमध्यमवर्गीयांना स्वतःच स्वतःला मदत करावी लागते. म्हणजे थोडीफार का असेना या वर्गास गुंतवणुकीवर लक्ष द्यावेच लागेल,

लॉकडाउन आता अंतिम टप्प्यात आला आहे. घरात बसून बोअर जरी झालं तरी आवडीचा विषय समोर आला तर कुणाच्याही मनात उत्साह निर्माण होतोच. अर्थात ज्यांना आवड आहे त्यांच्यासाठी अर्थकारण, गुंतवणूक, शेअर बाजार हे शब्द नक्कीच त्यांच्या मनात उत्साह वाढविणारे, आनंद देणारे, नवी ऊर्जा-उर्मी देणारे आहेत. यासाठी आज लॉकडाउनच्या या काळात जर आपण अर्थकारणाविषयी योग्य नियोजन केले तर आर्थिक वर्ष नक्कीच सुखावह जाईल. हा विचार करून आज याविषयी विख्यात करसल्लागार साईप्रसाद कामत यांच्याशी बातचीत केली. 

श्री. कामत याविषयी म्हणाले, कोरोना महामारीमुळे जगाला आर्थिक मंदीला सामोरे जावे लागणार आहे. याचे परिणाम गरीब, मध्यम व उच्चमध्यमवर्गींयांना मोठ्या प्रमाणात भोगावे लागणार आहेत. त्यातही गरीब जनतेसाठी राज्य व केंद्र सरकार सर्वप्रकारच्या आर्थिक उपाययोजना करत आहे. अशावेळी मध्यम व उच्चमध्यमवर्गीयांस व जे इन्कमटॅक्‍स रिटर्न भरतात त्यांना पीपीएफ, एनएससी, म्युच्युअल फंड यात गुंतवणूक करावीच लागते, पण सध्याच्या काळात म्हणजे अजून सहा महिने तरी त्यांना नेहमीसारखी गुंतवणूक करणे अवघड जाईल. म्हणून त्यांनी येते सहा महिने तरी थोडी थोडी गुंतवणूक करणे गरजेचे आहे. सध्या शेअर मार्केट खूपच खाली आले आहे. बऱ्याच चांगल्या कंपन्यांच्या शेअरच्या किमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे दीर्घकाळासाठी शेअर बाजारात गुंतवणूक करावी अशी सद्य:स्थिती आहे. ही गुंतवणूक मध्यमवर्गीयांसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. तसेच बॅंक एफ. डी., आर. डी यामध्येही थोडी थोडी गुंतवणूक करावी. 

गरीब वर्गास सरकार मदत देत असते. मध्यम आणि उच्चमध्यमवर्गीयांना स्वतःच स्वतःला मदत करावी लागते. म्हणजे थोडीफार का असेना या वर्गास गुंतवणुकीवर लक्ष द्यावेच लागेल, असे सूचवत श्री. कामत म्हणाले, त्यासाठी आताचा काळ नक्कीच सुवर्णकाळ आहे. सध्या जूनपर्यंत कर्जाचे हप्ते वसुली करण्यास मनाई आहे. अशावेळी ती रक्कम एफ. डी., म्युच्युअल फंड, शेअर बाजार अशा कोणत्याही योजनेत गुंतवावी. ते नक्कीच फायदेशीर ठरेल. सध्याचे आर्थिक वर्ष महामारीमुळे जागतिक मंदीचे असणार आहे. त्यामुळे थोडी थोडी रक्कम गुंतवणूक सर्वांनाच फायदेशीर ठरणारी असेल. 

गुंतवणुकीविषयी काही टीप्स 

  • योग्य नियोजन केल्यास आर्थिक वर्ष नक्कीच सुखावह जाईल 
  • येते सहा महिने थोडी थोडी तरी गुंतवणूक कराच 
  • शेअर बाजारात सध्या चांगल्या कंपन्यांचे शेअर स्वस्तात उपलब्ध आहेत, तिकडे लक्ष द्या 
  • एफ. डी., म्युच्युअल फंडसारखेही पर्यायही सध्या गुंतवणुकीस योग्य 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do it during lockdown Perfect money planning