
ठळक बाबी...
सोलापूर : शिधापत्रिकाधारकांनी कुटुंबातील सर्व सदस्यांनी आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक लिंक करुन घ्यावा. त्यासाठी 31 जानेवारीपर्यंतच मुदत देण्यात आली आहे. आधार व मोबाइल क्रमांक लिंक नसल्यास 1 फेब्रुवारीपासून धान्य मिळणार नाही, असे अन्नधान्य वितरण अधिकारी अप्पासाहेब समिंदर यांनी स्पष्ट केले आहे.
ठळक बाबी...
शिधापत्रिकेत नोंद असणाऱ्या सर्व लाभार्थ्यांचे आधार आणि मोबाईल क्रमांक लिंक करुन घेणे बंधनकारक आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा योजनेतील 82 टक्के लाभार्थ्यांचे आधार सिडींग झाले आहे. मात्र, काही लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक बदलले आहेत. त्यामुळे अशा नागरिकांनी धान्य घेत असलेल्या स्वस्त धान्य दुकानदार आणि परिमंडळ कार्यालयाशी संपर्क साधून आधार व मोबाइल लिंक करुन घ्यावे, असेही समिंदर यांनी सांगितले. शहरात एक लाख 17 हजार शिधापत्रिकाधारक असून त्याअंतर्गत साडेपाच नागरिकांची नोंदणी आहे. त्यातील सव्वाचार लाख नागरिकांचे आधार व मोबाइल सिडींग झाले असून उर्वरित 75 हजार नागरिकांना जानेवारीअखेर मुदत देण्यात आली आहे. शहरातील दोन हजार 60 शिधापत्रिकाधारकांनी अद्याप आधार व मोबाइल क्रमांक लिंक केलेला नाही, असेही समिंदर यांनी यावेळी सांगितले.
सहा लाख लोकांचे आधार सिडींग नाहीच
सोलापूर जिल्हाभरात चार लाख 15 हजार 334 शिधापत्रिकाधारक आहेत. त्याअंतर्गत 20 लाख चार हजार 804 सदस्यांची नोंदणी आहे. मात्र, त्यापैकी 14 लाख 81 हजार 558 सदस्यांचे आधार व मोबाइल क्रमांक सिडींग झाले आहे. अद्याप पाच लाख 23 हजार 246 सदस्यांचे आधार सिडींग राहिले असून त्यांच्यासाठी जानेवारीअखेरची मुदत आहे. पंढरपूर तालुक्यातील अवघ्या 64 टक्के लोकांनीच आधार व मोबाइल सिडींग केले आहे. त्यानंतर मोहोळ व मंगळवेढा तालुक्यातील प्रत्येकी 70 टक्के आधार सिडींग झाल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल कारंडे यांनी दिली. दुसरीकडे शहरातील 75 हजार सदस्यांनी आधार व मोबाइल क्रमांक सिडींग केला नसून दोन हजार 60 शिधापत्रिकाधारक ऑनलाइन लिंकपासून दूरच आहेत.