'ऍन्टीजेन'वर विश्‍वास ठेवायचा का? चंदनशिवेंची पहिली टेस्ट निगेटिव्ह अन्‌ नंतर पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 September 2020

महापालिकेत वैद्यकीय पथकाचे ठाण 
नगरसेवक आनंद चंदनशिवे यांचा लोकसंपर्क दांडगा आहे. ते विविध कामाच्या निमित्ताने अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही भेटतात. सर्वसाधारण सभेला त्यांची उपस्थिती असल्याने त्यांच्या संपर्कात कोण कोण होते, याचा शोध घेतला जात आहे. त्यांची रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट केली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने एक वैद्यकीय पथक बोलावून घेतले असून त्यांच्या संपर्कातील सर्वच लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचाऱ्यांची टेस्ट केली जाणार आहे. दरम्यान, आपण त्यांना बोललो का, आपला त्यांचा संपर्क आला का, कितीवेळ बोललो, अंतर होते का, अशी चर्चा आता अधिकाऱ्यांमध्ये रंगली आहे. 

सोलापूर : कोरोनामुळे फेब्रुवारीपासून महापालिकेची एकही सर्वसाधारण सभा सभागृहात झाली नाही. मात्र, खूपच विषय प्रलंबित राहिल्याने आणि विविध विषयांवर चर्चा करण्याच्या अनुषंगाने 15 सप्टेंबरला (मंगळवारी) महापालिकेतील यशवंराव चव्हाण सभागृहात महापालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली. त्यावेळी सभागृहात उपस्थित नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी आपण रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट करुन आल्याचे सांगत रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे त्यांनी सभागृहात जाहीरपणे सांगितले. मात्र, त्यांना त्रास होऊ लागला आहे. 

सात महिन्यानंतर महापालिकेची सर्वसाधारण सभा नेहमीप्रमाणे सभागृहात पार पडली. त्या सभेला माजी सभागृह नेता तथा नगरसेवक सुरेश पाटील यांनी आवर्जुन उपस्थिती लावली. त्यावेळी त्यांना नगरसेवक चंदनशिवे यांनी आधार दिला होता. सभागृहात चंदनशिवे म्हणाले, मी ऍन्टीजेन टेस्ट करुन आलो आहे. मात्र, माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. दुसऱ्याच दिवशी चंदनशिवे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. त्यानंतर तत्काळ पाटील यांनी रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट करुन घेतली. त्यांच्या दोन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. पाटील यांनीही पहिल्या रिपोर्टवर विश्‍वास न ठेवता दुसरी टेस्ट केली. दरम्यान, महापौर श्रीकांचन्ना यन्नम यांनी उद्या (शनिवारी) होणारी सभा अनिश्‍चित काळासाठी पुढे ढकलल्याचे पत्र पदाधिकारी व अधिकाऱ्यांना पाठविले आहे. 

सभेवेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा 
राज्यातच नव्हे तर देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य स्तरावरुन बैठकांची संख्या कमी करण्यात आली असून ऑनलाइन बैठकांवर जोर देण्यात आला आहे. दुसरीकडे राज्यात चर्चेत असलेल्या सोलापूर शहरातील कोरोना पुन्हा वाढू लागला आहे. अशा परिस्थितीत महापालिकेच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी सभागृहात सर्वसाधारण सभा आयोजित केली. त्यावेळी सोशल डिस्टन या नियमांचा विसर सर्वांनाच पडला होता. अधिकारी एकमेकांच्या जवळ बसले होते, तर दुसरीकडे एकाच बाकावर दोन-तीन नगरसेवक, नगरसेविका बसल्या होत्या. आता त्याची चर्चा सुरु झाली असून लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना नियमांची शिकवण देणाऱ्यांनाच त्या नियमांचा विसर पडलाच कसा, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. 

चंदनशिवेंची पहिली टेस्ट निगेटिव्ह कशी? 

सर्वसाधारण सभेच्या सुरवातीला नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी सभागृहात जाहीरपणे सांगितले की, मी रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट करुन आलो आहे. परंतु, माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे सुटकेचा नि:श्‍वास सोडलेल्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांची चिंता दुसऱ्या दिवशी वाढली. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे सभेच्या दुसऱ्या दिवशी स्पष्ट झाले. मात्र, चंदनशिवे यांनी केलेली रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट निगेटिव्ह आलीच कशी, असाही प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. 

वैद्यकीय अधिकाऱ्यांचे नगरसचिवांना पत्र 
सर्वसाधारण सभा होत नाहीत, आयुक्‍तही सभेला हजर राहिले नाहीत, यातून वंचित बहूजन आघाडीचे गटनेते नगरसेवक चंदनशिवे यांनी आयुक्‍तांची खुर्ची उचलली होती. त्यादिवशी खूपजण त्यांच्यासोबत होते. तर त्यानंतर झालेल्या सभेपूर्वी व सभेदरम्यानही त्यांच्या संपर्कात काही नगरसेवक, अधिकारी होते. त्यांची यादी तयार करा, असे पत्र महापालिका आयुक्‍तांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांना दिले आहे. त्यांच्याकडून अद्याप यादी तयार झाली नाही. आता त्या सर्वांना 14 दिवस क्‍वारंटाईन राहावे लागणार असून त्यांना कोरोना टेस्ट करणे बंधनकारक असल्याचेही नगरसचिवांनी सांगितले. 

जन्म- मृत्यू दाखल्यासाठी गर्दी हटेना 
शहरातील आठ विभागीय कार्यालयात जन्म- मृत्यूचे दाखले देण्याची सोय केल्याचे उपायुक्‍त धनराज पांडे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले. शहरातील कोरोना वाढत असून त्याला निमंत्रण द्यायला नको या हेतूने ही सोय केल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, महापालिकेतील कार्यालयात अद्यापही गर्दी कमी झालेली नाही. त्याठिकाणी सोशल डिस्टन्सिंचा फज्जा उडाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्याठिकाणी रांगेत उभारलेल्यांवर कोणाचेही नियंत्रण नाही ना, कोणीही त्यांना नियमांचे पालन करण्यास सांगत असल्याचे दिसते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do you want to believe in antigens? The first test of Chandanshive was negative and then positive