अहो, पंढरपुरातील गाढवांचं नशीबच पालटलं ! जाणार थंड हवेचे ठिकाण असलेल्या ऊटीला 

अभय जोशी 
Monday, 11 January 2021

गाढवांना ठेवण्यासाठी महाराष्ट्रात कोठेही कोंडवाडा नसल्याने तमिळनाडू राज्यातील इंडिया प्रोजेक्‍ट फॉर ऍनिमल अँड नेचर संस्था, निलगिरी, उटी येथे पाठवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दिले आहेत. या आदेशानुसार पंढरपूर पोलिसांनी पकडलेल्या 36 गाढवांची रवानगी आता निलगिरी, उटी येथे करण्यात येत असून, त्यामुळे पंढरपूरची गाढवे ऊटीच्या दिशेने रवाना करण्यात आली आहेत. 

पंढरपूर (सोलापूर) : भीमा नदीच्या काठी वाळवंटात उन्हात वाळू उपसा करणाऱ्या तब्बल 36 गाढवांच्या नशिबी आता चक्क तमिळनाडूतील थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचा योग आला आहे. तब्बल 36 गाढवांना ऊटी या हिल स्टेशनला पाठवण्यात आले आहे. 

पंढरपूर शहर व तालुक्‍यात भीमा नदीकाठी अहोरात्र वाळूचा उपसा करण्यासाठी वाळू चोरांकडून ट्रॅक्‍टर आणि बहुतेक वेळा गाढवांचा वापर केला जातो. बेकायदेशीर वाळू वाहतुकीसाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या 36 गाढवांना पंढरपूर शहर पोलिसांनी पकडले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार आता याच सर्व गाढवांना तमिळनाडू येथील इंडिया प्रोजेक्‍ट फॉर ऍनिमल अँड नेचर संस्था येथे पाठवण्यात आले. 

पंढरपूर शहर व तालुक्‍यातून गाढवांच्या सहाय्याने वाळू चोर अहोरात्र वाळूचा उपसा करत असतात. पोलिस आणि महसूल विभागाच्या वतीने अनेक वेळा संबंधित वाळू चोरांना पकडण्याचा प्रयत्न केला जातो; परंतु पोलिसांची चाहूल लागताच वाळू चोरटे पळून जातात आणि सापडतात फक्त वाहतूक करणारी गरीब बिचारी गाढवे. अनेक वेळा असे प्रकार झाल्यानंतर आता पोलिसांनी या गाढवांच्या विरोधातच कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे आणि वाळवंटात उन्हात फिरणाऱ्या गाढवांच्या नशिबी आला थंड हवेच्या ठिकाणी राहायला जायचा योग. 

पंढरपूर शहर पोलिसांनी भीमा नदी काठावर तीन ठिकाणी वाळू वाहतूक करणाऱ्या 36 गाढवांना पकडले आहे. या गाढवांना कुठे ठेवायचे आणि काय करायचे, असा प्रश्न पोलिसांपुढे निर्माण झाला. गाढवांना ठेवण्यासाठी महाराष्ट्रात कोठेही कोंडवाडा नसल्याने तमिळनाडू राज्यातील इंडिया प्रोजेक्‍ट फॉर ऍनिमल अँड नेचर संस्था, निलगिरी, ऊटी येथे पाठवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दिले आहेत. या आदेशानुसार पंढरपूर पोलिसांनी पकडलेल्या 36 गाढवांची रवानगी आता निलगिरी, ऊटी येथे करण्यात येत असून, त्यामुळे पंढरपूरची गाढवे ऊटीच्या दिशेने रवाना करण्यात आली आहेत. 

आता तरी वाळू उपशावर परिणाम होईल का? 
वाळू चोर वाळूचा अवैध उपसा करून गाढवांच्या साहाय्याने वाहतूक करत असतात. आता पोलिसांनी चक्क गाढवांवरच कारवाई करून त्यांची रवानगी ऊटी या हिल स्टेशनला केली असल्यामुळे अवैध वाळू उपशाचे प्रकार कमी होणार की, वाळू चोरांवर कारवाई करून त्यांची रवानगी तुरुंगात होणार का? याकडे आता पंढरपूरवासीयांचे लक्ष लागले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The donkeys from Pandharpur were sent to Uti hill station