यंदाच्या शिवजयंतीला भगव्या झेंड्यांना दुप्पट मागणी

श्रीनिवास दुध्याल
Monday, 17 February 2020

शिवजयंतीनिमित्त शहरात विविध मंडळांकडून जोरदार तयारी सुरू आहे. कमानी, विद्युत रोषणाई, संपूर्ण मांडव व व्यासपीठ भगवेमय झाले आहेत. रिक्षा, दुचाकी, सायकल, चारचाकी वाहनांवर तसेच मंडळाच्या दुतर्फा व रस्ता दुभाजकांवर भगवे झेंडे झळकत आहेत.

सोलापूर : यंदाची शिवजयंती राज्यात जल्लोषात साजरी केली जात आहे. कारण, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली असून, मुख्यमंत्रिपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विराजमान झाल्याने राज्यभरात शिवजयंतीनिमित्त भगव्या झेंड्यांचे वादळ दिसून येत आहे. त्यामुळे यंदाच्या शिवजयंतीला भगव्या झेंड्यांना व अन्य साहित्यांना दुप्पट मागणी असल्याची माहिती येथील झेंड्यांची निर्मिती करणारे पिसे झेंडेवाले यांनी दिली.

हेही वाचा - गाडी घासल्याची मिळाली "ही' शिक्षा

पदाधिकारी व कार्यकर्ते वेधून घेताहेत लक्ष
शिवजयंतीनिमित्त शहरात विविध मंडळांकडून जोरदार तयारी सुरू आहे. कमानी, विद्युत रोषणाई, संपूर्ण मांडव व व्यासपीठ भगवेमय झाले आहेत. रिक्षा, दुचाकी, सायकल, चारचाकी वाहनांवर तसेच मंडळाच्या दुतर्फा व रस्ता दुभाजकांवर भगवे झेंडे झळकत आहेत. कार्यकर्त्यांच्या डोक्‍यावर भगव्या टोप्या, पदाधिकाऱ्यांच्या डोक्‍यावर भगवे फेटे, शर्टवर बिल्ले, मनगटी बॅंड, शेला, शिवरायांच्या प्रतिमा असलेल्या अंगठ्या, पेन, कीचेन, टी-शर्ट, भगवे मणी, रुद्राक्ष, कपाळावर चंद्रकोर अशा पेहरावातील कार्यकर्ते व पदाधिकारी लक्ष वेधत आहेत. शहरातील मधला मारुती, नवी पेठ, अशोक चौक आदी भागांत झेंडे विक्रेत्यांकडे शिवजयंतीनिमित्त आवश्‍यक विविध साहित्यांची मागणी वाढत आहे. त्याप्रमाणे विक्रेते आठवडाभर साजरी होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त आवश्‍यक साहित्यासह सज्ज आहेत.

डिजिटल प्रिंटिंगच्या झेंड्यांना जास्त मागणी
राज्यात शिवसेनेचे सरकार असल्याने राज्यभरात शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी केली जात आहे. जिल्हाभरातूनच नव्हे, राज्य व परराज्यांतून आमच्याकडील झेंडे व अन्य साहित्यांना मागणी आहे. यंदा दरवर्षीपेक्षा मागणी दुप्पट आहे. त्यातही सर्वांना डिजिटल प्रिंटिंगमध्ये साहित्य हवे आहे. मागणी वाढणार असल्याने पूर्वीपासूनच नियोजन करून साहित्यांची निर्मिती केली असल्याची माहिती पिसे झेंडेवाले यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Double demand to saffron flags for this Shiv Jayanti