विधान परिषदेसाठी डॉ. धवलसिंहांचे नाव चर्चेत; एका दगडात अनेक पक्षी मारण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न 

भारत नागणे
Wednesday, 12 August 2020

संधी दिली तर जोमाने काम करू 
राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत आपण काम करत आहोत. विधानसभा निवडणुकीत पक्षाला मदत केली आहे. कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून राज्यभरात काम सुरु केले आहे. क्रीडा क्षेत्राबरोबरच कृषी क्षेत्रात देखील माझे काम सुरु आहे. आमचे नेते शरद पवार नक्की विचार करतील, त्यांनी संधी दिली तर आपण आणखी जोमाने पक्षवाढीसाठी काम करु. 
डॉ. धवलसिंह मोहिते पाटील 

पंढरपूर (सोलापूर) : राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य निवडीची पुन्हा एकदा चर्चा सुुरु झाली आहे. राज्यात नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीकडून संभाव्य उमेदवारांची चाचपणी देखील सुरु झाली आहे. साहित्य, कला, क्रिडा, समाजसेवा आदी क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या व या क्षेत्रात आपले योदान देणाऱ्या व्यक्तींना राज्यपालांकडून विधान परिषदेवर सदस्य म्हणून नियुक्त केले जाते. विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 रिक्त जागांवरती निवड केली जाणार आहे. राज्यात विविध क्षेत्रात कामगिरी केलेल्या आणि महाविकास आघाडीशी संबंधित असलेल्या उमेदवारांचा तिन्ही पक्षाकडून सध्या शोध सुरु आहे. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष आणि माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. 

डॉ. धवलसिंहांना विधानपरिषदेवर संधी देवून एका दगडात अनेक पक्षी मारण्यासाठी राष्ट्रवादीकडून तसे प्रयत्न सुरु आहेत. मोहिते पाटील यांना संधी दिली तर सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला आणखी बळ मिळेल, असा आशावाद ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये बळावला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपासून शरद पवार आणि राष्ट्रवादी पक्षाबरोबर सोबत असलेले माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते व त्यांचे पुत्र आमदार रणजितसिंह यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपात प्रवेश केला. तेव्हापासून जिल्ह्यात राष्ट्रवादीकडे पक्ष नेतृत्वाची उणीव आहे. लोकसभेपाठोपाठ विधानसभेलाही राष्ट्रवादीला माळशिरस तालुक्‍यात फटका बसला. विधानसभेनंतर सावध झालेल्या राष्ट्रवादीने आता पक्ष वाढीसाठी पावले टाकण्यास सुरवात केली आहे. 
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे. सत्तेच्या जोरावर राज्यात व विशेषतः सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी अधिक भक्कम करण्यासाठी पक्ष नेतृत्वाने तसे जोरदार प्रयत्नही सुरु आहेत. पक्षाला अधिक उभारी देणाऱ्या आणि पक्ष संघटन वाढीसाठी नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना विधानपरिषदेवर संधी देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहे. यामध्ये अकलूज येथील डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. 

सध्या डॉ. धवलसिंह हे विजयसिंह व रणजितसिंह यांच्यापासून दूर आहेत. विधानसभा निवडणुकीत डॉ. धवलसिहांनी राष्ट्रवादीला मदत केली होती. त्यानंतर आता धवलसिंहांच्या रुपयाने जिल्ह्यात युवा चेहरा देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरु असल्याची खात्रीशीर माहिती आहे. 

डॉ. धवलसिंहांना राष्ट्रवादीने राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदारकी दिली तर जनसेवेचे जिल्ह्यातील हजारो कार्यकर्त्यांबरोबरच माजी मंत्री (कै.) प्रतापसिंह मोहिते पाटील यांना मानणारे अनेक जुने कार्यकर्ते पुन्हा राष्ट्रवादीत सक्रीय होतील, अशी आशाही राष्ट्रवादीच्या नेत्यांना आहे. भाजपात गेलेले माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील व आमदार रणजितसिहांना राजकीय शह देण्यासाठी मोहिते पाटील घराण्यातीलच डॉ. धवलसिंहांना राष्ट्रवादीकडून आमदारकीचे बक्षीस दिले जाईल, अशी शक्‍यता राजकीय जाणकारांमधून वर्तवली जात आहे. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr DhavalSinh Mohite patils name discussion for Legislative Council election