पालकमंत्र्यांची उचलबांगडी ; सोलापूर कॉंग्रेस अडचणीत 

विजयकुमार सोनवणे
Tuesday, 31 March 2020

देशमुख, ढोबळेंचे कौतुक ठरला कळीचा मुद्दा 
नगरसेविका फुलारे यांनी आपल्या मागणीच्या निवेदनात भाजपचे आमदार विजय देशमुख आणि सध्याचे भाजप नेते लक्ष्मण ढोबळे यांचे कौतुक केले. कॉंग्रेसच्याच नगरसेविकेने भाजप नेत्यांचे कौतुक केल्याने पालकमंत्री बदलण्यामागचा कळीचा मुद्दा ठरल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या सभागृहाला कुलुप लावण्याच्या प्रकरणात कॉंग्रेसने त्यांना साथ न दिल्यामुळे फुलारे यांनी पक्षाकडे राजीनामा दिला आहे, मात्र तो अद्याप स्वीकारण्यात आला नाही. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या त्या अजुनही कॉंग्रेसमध्येच आहेत. या मागणीनंतर पक्षाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी त्यांना विचारणा केली नाही हे विशेष..

सोलापूर : नामदार दिलीप वळसे-पाटील यांची सोलापूरच्या पालकमंत्रीपदावरून मंगळवारी तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. त्यास कारणीभूत ठरली कॉंग्रेसच्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी केलेली पालकमंत्री हटावची मागणी. फुलारे यांनी या संदर्भात थेट मुख्यमंत्री उद्वव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याकडेच वळसे-पाटील यांना बदलण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती.

श्री. वळसे-पाटील यांनी स्पष्टीकरणही केले होते
राज्यात सत्ताधारी असलेल्या सहकारी पक्षाच्या नगरसेविकेनेच ही मागणी केल्याने त्याचे राज्यभर पडसाद उमटले होते. त्याचा परिणाम सोलापूर कॉंग्रेसवर होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान नूतन पालकमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या नियुक्तीचे फुलारे यांनी स्वागत केले असून, एक धाडसी पालकमंत्री सोलापूरला दिल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. ठाकरे व श्री. पवार यांचे निवेदनाद्वारे आभार मानले आहे. दरम्यान श्री. वळसे पाटील यांनी पालकमंत्री हटाऔ संदर्भात बातम्या प्रसिद्ध झाल्यावर त्यांची भूमिका मांडली होती.  कोरोना संसर्गाच्या कालावधीत सोलापूर दौऱ्यावर आलो तर प्रशासकीय यंत्रणेवर ताण पडेल आणि नियोजन विस्कळीत होईल, असे त्यांनी म्हटले होते. दरम्यान मंगळवारी अचानक त्यांच्या जागी डाॅ. आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली. 

अशी केली होती मागणी 
लॉकडाऊनच्या काळात शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांचे हाल होत आहेत. जिल्हा प्रशासन आणि पोलिसांमध्ये समन्वय दिसत नाही. या काळात पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील गायब आहेत. सोलापूर जिल्ह्यासाठी तत्काळ नवा पालकमंत्री नियुक्त करावा. कोरोनाचा विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने लॉकडाऊन केले. सोलापूर शहरातील सर्व व्यवहार बंद झाले आहेत. महापालिका, रुग्णालये, अत्यावश्‍यक वस्तूची सेवा देणारी दुकाने सुरू असल्याचे जिल्हाधिकारी सांगत आहेत. पण कुणाचा कुणाला ताळमेळ दिसत नाही. दूध विक्री करणाऱ्या माणसाला रस्त्यावर अडवले जाते. भाजीपाला विक्री करणाऱ्याला हुसकावून लावले जाते. पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांना पेट्रोल दिले जात नाही. मेडिकलच्या इर्मजन्सीसाठी जाणाऱ्या लोकांना पेट्राल दिले जात नाही. सोलापूरच्या विविध भागात हजारो मजूर बिनकामाचे बसले आहेत. त्यांना खायला अन्न नाही. सरकारने मोफत गहू, तांदूळ, दाळ देतो म्हणून सांगितले. कुठे आहे धान्य? लोकांच्या अडचणी कशा दूर होणार. लोक रस्त्यावर आल्यावर अडचणी दूर करणार काय? सोलापूरच्या जनतेला लवकरात लवकर धान्य मिळाले पाहिजे. यासाठी पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी नियमित बैठका घेतला पाहिजेत, असे निवेदनात म्हटले होते. 

सोपल, ढोबळे, देशमुखांचे केले कौतुक 
पालकमंत्री वळसे पाटील सध्या कुठेच दिसत नाहीत. सोलापुरात काही वर्षापूर्वी दंगल झाली होती. कर्फ्यु लागला होता. विजयसिंह मोहिते-पाटील आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांनी सोलापुरात ठाण मांडून परिस्थिती हाताळली होती. दिलीप सोपल, लक्ष्मणराव ढोबळे, आमदार विजयकुमार देशमुख यांनीही पालकमंत्री म्हणून अनेक कठीण काळात चांगले काम केले. या लोकांना आमच्या शहराचे गल्ली बोळ माहित आहेत. वळसे-पाटील आता पुण्यात बसून आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्स करुन अधिकाऱ्यांना सूचना देत आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख बाहेर पडून काम करीत असताना आमचे पालकमंत्री घरात बसलेत. वळसे-पाटलांनी सोलापुरात येऊन स्वत:च्या आरोग्याची काळजी घेत सोलापूर शहरात, ग्रामीण भागात जाऊन पाहणी करायला हवी होती. त्यांना ते जमलेले नाही. त्यांना तत्काळ हटवा. या भागातील माहिती असणाऱ्या नेत्याला पालकमंत्री करा, हा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला होता. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr jitendra aavhad appoint as a gaurdian minister of solapur on tuesday