शाळेत जाताना पायात चप्पल नाही, गणितात नापास व इंग्रजी समजत नाही म्हणून सायन्स सोडले अन्‌ आज 'ते' आहेत...

अक्षय गुंड 
Tuesday, 8 September 2020

सातव्या इयत्तेत गणित विषयात नापास झालेल्या व इंग्रजी समजत नाही म्हणून सायन्स शाखा सोडून पळून जाणारा हा मुलगा नंतर विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रात आपल्या नवनवीन प्रयोगाने दबदबा निर्माण केला. खेडेगावातील "मुऱ्या' ते "डॉ. मुरहरी केळे' हा बदल, तसेच वीज मंडळात कनिष्ठ अभियंता ते अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक असा त्यांनी केलेला उत्तुंग प्रवास, त्यांचा हा संघर्षमय आलेख सर्वांसाठी प्रेरणादायी असाच आहे. 

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : ज्याच्या आयुष्यात फक्त अज्ञानरूपी अंधार होता, पण तो अंधार दूर करण्यासाठी गावात वीज न पोचल्यामुळे विजेच्या दिव्यांऐवजी रॉकेलच्या चिमणीच्या प्रकाशात अभ्यास करून, अनवाणी पायाने, काट्याकुट्यातून शाळा गाठून, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मराठवाड्याचा एक सुपुत्र स्वतःच्या जीवनातील अंधार दूर करून लाखो लोकांच्या घराघरात प्रकाश वाटणारा "प्रकाशयात्री' बनला आहे. डॉ. मुरहरी सोपान केळे असे त्यांचे नाव. 

"मुऱ्या' ते "डॉ. मुरहरी'... 
सातव्या इयत्तेत गणित विषयात नापास झालेल्या व इंग्रजी समजत नाही म्हणून सायन्स शाखा सोडून पळून जाणारा हा मुलगा नंतर विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रात आपल्या नवनवीन प्रयोगाने दबदबा निर्माण केला. खेडेगावातील "मुऱ्या' ते "डॉ. मुरहरी केळे' हा बदल, तसेच वीज मंडळात कनिष्ठ अभियंता ते अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक असा त्यांनी केलेला उत्तुंग प्रवास, त्यांचा हा संघर्षमय आलेख सर्वांसाठी प्रेरणादायी असाच आहे. 

अनवाणी पायाने काट्याकुट्यातून, चिखल तुडवत शाळेचा रस्ता पार करत 
मराठवाडा भागातील उस्मानाबादसारख्या मागास जिल्ह्यातील वाशी तालुक्‍यातील केळेवाडी या अतिशय दुर्गम खेड्यातून प्रतिकूल परिस्थितीचा बाऊ न करता, येणाऱ्या समस्यांना सामोरे जात शिक्षण घेतले. स्वतःच्या गावच्या व सध्या अनेक राज्यांच्या खेडोपाड्यातील गोरगरिबांच्या घरात प्रकाश देण्याचे काम करणारे म्हणून डॉ. मुरहरी केळे यांचे नाव घेतले जाते. आई-वडील दोघेही शेतमजूर. घरची परिस्थिती अत्यंत बिकट. घरात अठराविश्वे दारिद्य्र. कुटुंबीयांना अनेक हालअपेष्टांना सामोरे जावे लागत असे. या सर्व गोष्टींची जाण मुरहरी केळे यांना होती. त्यामुळे त्यांनी या परिस्थितीलाच आपलेसे करत, महापुरुषांचे विचार डोळ्यासमोर ठेवत, "इच्छा असेल तर मार्ग दिसेल' या उक्तीप्रमाणे कष्ट, जिद्द व चिकाटीच्या जोरावर अथक परिश्रम घेतले. अनेक संकटांना तोंड देत त्यांनी शिक्षण घेतले. घरापासून शाळा सात किलोमीटर अंतरावर होती. अनवाणी पायाने काट्याकुट्यातून, चिखल तुडवत ते शाळेचा रस्ता पार करत शाळेत जात असत. परंतु शिकण्याची त्यांची जिद्द प्रबळ होती. घरी शेळीमेंढ्या पालन असल्याने सुटीच्या दिवशी ते शेळ्यामेंढ्या राखण्यासाठी जात असत. घरात वारकरी संप्रदायाचे वातावरण असल्याने शिक्षणाबरोबरच भजन-कीर्तनात ते सहभागी असायचे. 

घरच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत सुरू केले शिक्षण 
आपले शिक्षणच आपली घरची परिस्थिती बदलू शकते व या हलाखीच्या परिस्थितीतून बाहेर काढू शकते, असा आत्मविश्वास त्यांना असल्याने त्यांनी जोमाने अभ्यास केला. घरापासून शाळा दूर असल्याने दहावीत असताना गावात वीज नसल्याने शेवटचे दोन महिने अक्षरशः त्यांनी शाळेत राहूनच अभ्यास केला. पुढे अकरावी सायन्स या शाखेत प्रवेश घेतला; परंतु इंग्रजी जमत नाही म्हणून माघारी आले. पण आपण ध्येयापासून दूर चाललो आहोत, याचे भान ठेवत घरच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी पुन्हा नव्या उमेदीने त्याच शाखेतून सुरवात केली. 

कनिष्ठ अभियंता, उपकार्यकारी अभियंता ते मुख्य अभियंता असा प्रवास 
विद्युत अभियांत्रिकीचे शिक्षण विशेष प्रावीण्यासह पूर्ण करून ते वीज मंडळात 1991 साली कनिष्ठ अभियंता या पदावर कोकणात चिपळूण येथे रुजू झाले. "केले तर काहीच अशक्‍य नाही' हे त्यांना चांगले उमजले होते. त्यामुळे त्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रातील पदवीसह व्यवस्थापन, कायदेविषयक, पत्रकारिता, संगणकीय, ऊर्जा अंकेक्षण आदींसह पीएचडी ही सर्वोच्च पदवी संपादन करून वीज मंडळातील "डॉ. श्रीकांत जिचकार'च झाले. कनिष्ठ अभियंता, उपकार्यकारी अभियंता ते मुख्य अभियंता असा प्रवास करत त्यांनी वीज मंडळात आपल्या कार्याचा सर्वच विभागांत वेगळाच असा ठसा उमटविला. वाणिज्य विभागात मुख्य अभियंता असताना त्यांची वीजबिलावर असणारी सही कौतुकाचा विषय असे. 

मोठा अधिकारी, पण पाय जमिनीवरच 
डॉ. मुरहरी केळे यांनी वीज क्षेत्रासह शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य व प्रशासकीय क्षेत्रात अनेक नवनवे प्रयोग करून आपली चुणूक दाखवली आहे. त्यामुळे त्यांची अनेक संस्थांनी राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर दखल घेऊन अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. अशा संवेदनशील अध्यात्मिक, साहित्यिक व एवढा मोठा अधिकारी असताना देखील ते आपले पाय जमिनीवर घट्ट रोवून सामाजिक कामात कार्यरत दिसतात. 

राज्य वीज मंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पदावर नेमणूक 
डॉ. केळे यांनी भिवंडी येथील मे. टोरेंट पॉवर येथे, मध्यप्रदेश वीज मंडळात संचालक (तांत्रिक) पदावर काम केले होते. तेथे त्यांनी सौभाग्य यौजना प्रभावीपणे राबविल्यामुळे भारत सरकारतर्फे कंपनीला 100 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले होते. त्यांच्या विविध कामांची दखल त्रिपुरा या राज्याने घेतली असून, या राज्यात वीज मंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक या पदावर नेमणूक केली आहे. एखाद्या अभियंत्याची इतर राज्यात अध्यक्षपदी नेमणूक होण्याची बहुतेक ही पहिलीच वेळ असावी. हा मान डॉ. मुरहरी केळे यांच्या रूपाने महाराष्ट्राला मिळाला आहे. 

आंतरराष्ट्रीय सीमापार कुटुंबांना प्रकाश वाटण्याचे काम 
लहानपणी शाळेत जात असताना हवेतून जाणाऱ्या विमानाचे धूर बघणाऱ्या मुरहरी केळे यांनी आज विमानातूनच अनेक राज्यांत, देशांत जाऊन अनेक नवनवीन प्रयोग केले आहेत. ज्यांच्या कित्येक पिढ्या अंधारात खितपत पडलेल्या होत्या व ज्यांनी चिमणीच्या, कंदिलाच्या प्रकाशात दहावीपर्यंत अभ्यास केला त्यांनी भारतातील महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, त्रिपुरा, मिझोराम, मणिपूर आदी राज्यांतील गरिबांच्या झोपड्यांमध्ये उजेड पेरला. विविध राज्यांसह बांगलादेश व नेपाळ या देशात विजेची निर्यात करून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सीमापार अनेक कुटुंबांना प्रकाश वाटण्याचे काम करणारे म्हणून डॉ. मुरहरी केळे यांच्याकडे पाहिले जाते. 

साहित्य क्षेत्रातही भरीव कामगिरी 
याचबरोबर त्यांनी साहित्य क्षेत्रातही मोठे काम केले असून, "जगी ऐसा बाप व्हावा' या चरित्रग्रंथाचे लेखन केले आहे. याशिवाय "अहिल्यादेवी होळकर', "संतवाणी', "शब्दशिल्प', "नानी' या मराठी पुस्तकांशिवाय "पॉवर डिस्ट्रिब्युशन फ्रेंचायझी' या विषयावर नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या संस्थेद्वारा दोन इंग्रजी पुस्तके प्रकाशित केली आहेत. अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्यामुळे त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविण्यातही आले आहे. त्यांची प्रवचन-कीर्तनाची आवड, "मला आई पाहिजे' या मराठी चित्रपटात "रहिम चाचा' ही भूमिका व उस्मानाबाद येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनातील गाजलेला परिसंवाद यावरून या वेगळ्या व्यक्तिमत्त्वाची चुणूक लक्षात येते. हलाखीच्या परिस्थितीतून वाट काढत पुढे आलेले डॉ. मुरहरी केळे यांचा प्रवास सर्वांसाठी आदर्शवत असाच आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Kele studied on the light of the lantern today he is managing director in the power board